वृत्तसंस्था/ कोलकाता
2026 च्या फिफाच्या विश्व करंडक फुटबॉल स्पर्धेच्या तसेच 2027 च्या एएफसी आशिया चषक प्राथमिक संयुक्त राऊंड दोनमधील पात्रतेच्या भारताच्या तीन सामन्यापैकी दोन सामने भुवनेश्वर आणि गुवाहटी येथे होणार आहेत. सदर माहिती अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनच्या प्रवक्त्याने दिली आहे. गेल्या जूनमध्ये भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर आंतरखंडीय चषक फुटबॉल स्पर्धा यशस्वीपणे भरवली गेली होती.
2023 च्या फुटबॉल हंगामात भारताच्या वरिष्ट राष्ट्रीय पुरुषांच्या फुटबॉल संघाचा सामना भरवण्याची संधी भुवनेश्वरला दुसऱ्यांदा मिळाली आहे. आता भुवनेश्वरमध्ये हा पात्र फेरीचा सामना यजमान भारत आणि एएफसी आशिया चषक चॅम्पियन्स कतार यांच्यात 21 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे. भुवनेश्वरमध्ये या सामन्यांना निश्चितच प्रचंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान पात्र फेरीच्या सामन्यांसाठी दुसऱ्या ठिकाणाची निवड केली जात नसल्याबद्दल अखिल भारतीय फुटबॉल फेडरेशनवर काही फुटबॉल शौकिनांनी प्रसार माध्यमांशी संपर्कात येऊन टीका केली आहे. या पात्र फेरीच्या स्पर्धांना ओरिसा शासनाकडून पूर्ण सहकार्य दिले जाईल अशी ग्वाही ओरिसाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिली आहे.
2026 च्या फिफा विश्व करंडक फुटबॉल स्पर्धा आणि 2027 च्या एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेसाठी भुवनेश्वरच्या कलिंगा स्टेडियमवर खेळवला जाणारा हा सामना संयुक्त पात्र फेरीचा म्हणून ओळखला जाईल. भारताचा अ गटात समावेश असून यामध्ये कुवेत, कतार आणि मंगोलिया व अफगाणमधील पात्र फेरीच्या राऊंड एकमधील सामन्यातील विजेयी संघाचा समावेश राहिल. भारतीय फुटबॉल मोहिमेला 16 नोव्हेंबरपासून कुवेत सामन्याने प्रारंभ होणार आहे.









