आयसीसी संघात शेफाली, श्वेता व पार्श्वी चोप्राचा समावेश
वृत्तसंस्था/ दुबई
महिलांच्या यू-19 टी-20 विश्वचषक स्पर्धेत सहभागी झालेल्या संघातून आयसीसीने स्पर्धेचा संघ निवडला असून त्यात विजेतेपद मिळविलेल्या भारताच्या शेफाली वर्मा, श्वेता सेहरावत व पार्श्वी चोप्रा या तिघींना स्थान मिळाले आहे.
स्पर्धावीर म्हणून निवडलेल्या इंग्लंडच्या ग्रेस स्किव्हर्सला या संघाच्या कर्णधारपदी निवडण्यात आले असून या संघात न्यूझीलंड, लंका, बांगलादेश, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान यांच्या खेळाडूंचाही समावेश आहे. शेफालीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला यू-19 महिला टी-20 विश्वचषक पटकावला. अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडवर 7 गडय़ांनी विजय मिळविला. भारतीय महिलांनी आयसीसी स्पर्धेत मिळविलेले हे पहिलेच विजेतेपद आहे.
सलामीवीर शेफाली वर्मा आक्रमक खेळासाठी ओळखली जात असून तिने यूएईविरुद्ध पॉवरहिटिंगचे प्रदर्शन करताना 34 चेंडू 78 धावा झोडपल्या. त्यात 12 चौकार, 4 षटकारांचा समावेश होता. तिने या स्पर्धेत एकूण 172 धावा जमवित सर्वाधिक धावा जमविणाऱयांत तिसरे स्थान मिळविले. याशिवाय तिने गोलंदाजीतही सात डावांत 4 बळी मिळविले.
दुसरी सलामीवीर श्वेता सेहरावतने शेफाली व रिचा घोष या तिच्यापेक्षा वरिष्ठ खेळाडूंना मागे टाकत 99 च्या सरासरीने व 139.43 च्या स्ट्राईकरेटने सर्वाधिक 297 धावा फटकावल्या. पार्श्वी चोप्राने पहिल्या तीन सामन्यात फक्त 2 बळी मिळविले. पण अखेरच्या टप्प्यात तिने भेदक मारा करीत एकूण 6 सामन्यांत 11 बळी टिपले. सुपरसिक्समधील लंकेविरुद्ध शेवटच्या सामन्यात तिने 5 धावांत 4, त्यानंतर उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध 13 धावांत 2 व अंतिम लढतीत 2 बळी मिळविले. न्यूझीलंडची जॉर्जिया प्लिमर, लंकेची देवमी विहांगा, बांगलादेशची शोरना अक्तर, दक्षिण आफ्रिकेची काराबो मेसो, ऑस्ट्रेलियाची मॅगी क्लार्क व पाकिस्तानची अनोशा नसिर यांचाही या संघात समावेश आहे.









