पाकिस्तानचे 8 वायुतळ उद्ध्वस्त, अनेक सैनिकी चौक्या नष्ट, शेकडो ड्रोन्स, क्षेपणास्त्रे भस्मसात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
एका बाजूला भारताचा मार आणि दुसऱ्या बाजूला हताशा यांच्या कैचीत सापडलेल्या पाकिस्तानची अवस्था भारत-पाकिस्तान संघर्षाच्या चौथ्या दिवशी अधिकच दयनीय झाली आहे. पाकिस्तानकडून करण्यात आलेला हल्ल्याचा प्रत्येक प्रयत्न भारताने हाणून पाडला असून पाकिस्तानवर क्षेपणास्त्रांचे आक्रमण करुन त्याचे 8 महत्वाचे वायुतळ उध्वस्त केले आहेत. तसेच त्याची आणखी दोन युद्ध विमाने जमीनदोस्त झाली आहेत. भारताच्या सीमा सुरक्षा दलानेही सीमावर्ती भागातील पाकिस्तानच्या लष्करी चौक्यांचा चकणाचूर केला आहे. त्यामुळे प्रारंभी गुर्मी दाखविणारा पाकिस्तान आता नरमाईची असहाय भाषा बोलू लागला आहे.
भारताच्या अचूक आणि सटीक क्षेपणास्त्र हल्ल्याने अक्षरश: जेरीला आलेल्या पाकिस्तानने भारतातील धार्मिक स्थळे आणि नागरी वस्त्या यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करुन आपल्या हीन संस्कृतीचे दर्शन जगाला घडविले आहे. शनिवारी रात्रीपासून दुपारपर्यंत पंजाब आणि जम्मू-काश्मीर येथील हिंदू आणि शीखांच्या चार धर्मस्थळांवर ड्रोन हल्ला करण्याचा त्याने प्रयत्न केला. हा हल्ला भारताकडूनच होत असल्याचा कांगावाही करुन पाहिला. तथापि, भारताने हे सर्व हल्ले निकामी ठरविले आहेत. पाकिस्तानने जम्मू, श्रीनगर, पठाणकोट आणि अवंतीपुरा येथील भारतीय वायुतळ आणि सेनातळांवर ड्रोन्स आणि क्षेपणास्त्रांचा मारा करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारताच्या अत्याधुनिक वायुसंरक्षण यंत्रणेने पाकिस्तानचा हा प्रयत्न आकाशातच उधळून लावला. पाकिस्तानच्या रेंजर्सनी जम्मू, सांबा, अखनूर आणि अवंतीपुरा येथील नागरी वस्त्यांवर उखळी तोफांचा मारा केला. राजस्थानातील जैसलमेर आणि गुजरातमधील कच्छ येथेही काही घरांची हानी पाकिस्तानाचा गोळीबार आणि तोफांच्या माऱ्यात झाल्याचे वृत्त आहे. मात्र, भारताची विशेष जीवीत हानी झालेली नसल्याचे दिसून येत आहे.
पाकिस्तानचा उतरु लागला पारा
गेल्या चार दिवसांच्या संघर्षाच्या आढावा घेता स्थिती अशी दिसून येते, की पाकिस्तानचे हल्ल्याचे प्रयत्न भारताने अयशस्वी ठरविले आहेत. तथापि, भारताची क्षेपणास्त्रे अडविण्यात मात्र, पाकिस्तान सपशेल अपयशी ठरला आहे. अशा प्रकारे, आक्रमण आणि स्वसंरक्षण अशा दोन्ही आघाड्यांवर मार खात असलेल्या पाकिस्तानाला आता नरमाईची भाषा करावी लागत आहे. पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी शांततेचे पिल्लू सोडण्याचा प्रयत्न केला आहे. भारताने हल्ले थांबविल्यास आम्हीही थांबण्यास तयार आहोत, असे प्रतिपादन त्यांनी केले. भारताने मात्र अद्याप या प्रस्तावात्मक वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
भेदरलेल्या पाकिस्तानची चलबिचल
पाकिस्तानवर आक्रमण करण्यासाठी भारताने अशा शस्त्रांचा आणि अस्त्रांचा उपयोग केला आहे, की त्यामुळे त्याची तारांबळ उडाली आहे. ज्या चीनी आणि तुर्की शस्त्रयंत्रणांवर पाकिस्तानने भिस्त ठेवली होती, त्या भारताच्या माऱ्यात चूर चूर होताना दिसत आहेत. त्यामुळे भेदरलेल्या पाकिस्तानला आता नेमके कोणते धोरण अवलंबवावे, हे समजेनासे झाले असून प्रत्याघात की शांतता अशा द्विधा मन:स्थितीत तो सापडला असल्याचे मत अनेक संरक्षणतज्ञांनी व्यक्त केले आहे.

आठ तळांवर अचूक हल्ले
भारताने शनिवारी सकाळपासून पाकिस्तानच्या अत्यंत महत्वाच्या वायुतळांना लक्ष्य बनविण्यास प्रारंभ केला. यासाठी भारताने अचूक मारा करणारी भेदक क्षेपणास्त्रे उपयोगात आणली. लांब पल्ल्याच्या या क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानचे 8 वायुतळ आणि लष्करी तळ उध्वस्त केले. दारुगोळ्याची आणि शस्त्रास्त्रांची काही गोदामेही भारताने भस्मसात करण्यात यश मिळविले आहे, असे वृत्त आहे.
कोणते आठ तळ उध्वस्त…
रफिकी, मुरीद, चकलाला, रहीम यार खान, सुक्कूर, चुनियान, पासरुर आणि सियालकोट असे पाकिस्तानचे आठ वायुदळ उध्वस्त करण्यात आले आहेत. त्यामुळे पाकिस्तानने आपले संपूर्ण वायुक्षेत्र बंद केले होते. चार वायुतळांवर हल्ले झाल्याची कबुली स्वत: पाकिस्ताननेही दिली आहे. या सर्व वायुतळांवरुन आगीचे प्रचंड लोळ उठतानाचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. ही अपरिमित हानी लपविण्याच्या उद्देशाने पाकिस्तानने देशभरात इंटरनेट सेवाही बंद केली आहे.

दोन विमानेही कोसळली
भारताच्या वायुक्षेत्राचा भंग करुन भारतात घुसविण्यात आलेली पाकिस्तानची दोन युद्धविमानेही भारताने पाडविली आहेत, असे वृत्त आहे. या व़ृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला नसला, तरी विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार 2 जेट विमाने पडली आहेत. विमाने हानीग्रस्त झाल्यानंतर त्यांच्या चालकांनी विमानातून उडी घेतली असून त्यांचा शोध दुपारपर्यंत केला जात होता. संरक्षण विभागाच्या पत्रकार परिषदेत मात्र, या घटनेचा उल्लेख करण्यात न आल्याने हे अनधिकृत वृत्त आहे.

सीमेवर सैन्याची जमवाजमव
पाकिस्तानने सीमेवर आपल्या सैनिकांची जमवाजमव करण्यास प्रारंभ केला आहे, असे भारताच्या संरक्षण विभागाने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले आहे. याला प्रत्युत्तर म्हणून भारतानेही आपली सेना आघाडीवर आणली आहे. भारत प्रारंभापासूनच पाकिस्तानचा कोणताही पवित्रा हाणून पाडण्यासाठी सज्ज आहे, असे प्रतिपादन या पत्रकारपरिषदेत करण्यात आले.
पाकिस्तानच्या अनेक चौक्या उध्वस्त
शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून पाकिस्तानने सातत्याने भारताच्या चौक्यांवर आणि नागरी वस्त्यांवर सीमावर्ती भागात गोळीबार आणि उखळी तोफांचा मारा चालविला होता. लेह पासून भूजपर्यंतच्या 1,500 किलोमीटरच्या सीमारेषेवर 26 स्थानी पाकिस्तानने गोळीबाराचा प्रयत्न केला. या गोळीबारात भारतातील काही घरांची हानी झाली. जम्मूमध्ये दोन घरे जळल्याचे वृत्त आहे. तथापि, भारतानेही पाकिस्तानच्या या कुरापतीला चोख प्रत्युत्तर दिले असून पाकिस्तानी सैन्याच्या अनेक चौक्या नष्ट केल्या आहेत. रात्रभर दोन्ही बाजूकडूंन हा गोळीबार होत होता. भारताने पाकिस्तानच्या चौक्या नष्ट केल्याचे अनेक व्हिडीओही प्रसिद्ध केले आहेत. पाकिस्तानी सैनिकांनी बंकर्समध्ये आश्रय घेतला आहे. पण भारताने विशेष बाँब्जचा उपयोग करुन काही बंकर्सही उडविल्याने पाकिस्तानी सैनिकांची जीवीत हानी झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, पाकिस्तानने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. संपूर्ण सीमारेषेवर सीमा सुरक्षा दल सज्ज आहे.
मदरसा विद्यार्थ्यांवर मदार
आघाडीवरचे सैनिक अपयशी ठरल्यास पाकिस्तानातील 1 लाखांहून अधिक मदरसांमधील विद्यार्थ्यांना युद्धाच्या खाईत लोटण्याची योजना पाकिस्तानने सज्ज केल्याचे वृत्त आहे. मदरसातील विद्यार्थी इस्लाम धर्माच्या रक्षणासाठी युद्धात उतरु शकतात. ही आमची संरक्षणाची दुसरी फळी आहे, अशी घोषणा पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा असीफ यांनी पाकिस्तानच्या संसदेत केल्याने खळबळ उडाली आहे. पाकिस्तानच्या या वक्तव्याचा जगभर निषेध केला जात आहे.
पाकिस्तानकडून अफवांचा बाजार
सशस्त्र संघर्षात भारताकडून पिछेहाट स्वीकारावी लागलेल्या पाकिस्तानने आता अफवांचा बाजार भरविण्यास प्रारंभ केला आहे. भारताचे वायुतळ पाकिस्तानी क्षेपणास्त्रांनी ध्वस्त केले आहेत. भारताच्या नागरीकांना आणि सैनिकांना पळता भुई थोडी होत आहे, भारताचे सेना तळ उध्वस्त करण्यात येत आहेत, इत्यादी अफवा पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांकडूनच पसरविण्यात येत आहेत. तथापि, भारताच्या एकाही सेना आस्थापनाला धक्का लागलेला नाही. काही आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले होते. तथापि, सर्व हल्ले निकामी करण्यात आले आहेत, असे भारताच्या पत्रकार परिषदेत प्रवक्त्या सोनिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी स्पष्ट केल्याने पाकिस्तानच्या अफवांमधील हवा निघाली आहे.
पाकिस्तान लष्कराचा चेहराही दहशतवादी…
पाकिस्तानकडून अफवा पसरविणारा लष्करी प्रवक्ता लेफ्टनंट जनरल अहमद असीफ चौधरी हा स्वत:च एक दहशतवादी असल्याचे स्पष्ट झाले आहे. तो पाकिस्तानच्या आयएसआयचा जनसंपर्क अधिकारीही आहे. तो पाकिस्तानातील अणुसंशोधक सुलतान बशिरुद्दीन मोहम्मद याचा पुत्र आहे. बशिरुद्दीन मोहम्मद हाही दहशतवादीच होता. त्याने पाकिस्तानचे इतर देशांकडून अवैधरित्या मिळविलेले अणुतंत्रज्ञान दहशतवाद्यांना हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने यासाठी ओसामा बिन लादेन याची भेटही घेतली होती. तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या दहशतवाद्यांच्या सूचीत अग्रक्रमावर होता. अहमत चौधरी हा स्वत:ही कट्टर इस्लामवादी दहशती मनोवृत्तीचा असून अशा व्यक्तीकहे पाकिस्तानच्या लष्कराने प्रवक्तेपदाचे महत्वाचे उत्तरदायित्व दिल्याने पाकिस्तानचे लष्कर असे दहशतवाद्यांच्या तालावरच नाचते, हे स्पष्ट होत असल्याचे तज्ञांचे मत आहे. चौधरी याच्या विरोधात अनेक देशांमध्ये दहशतवादी कृत्ये केल्याचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे आपला दहशतवादाशी संबंध नाही, हा पाकिस्तान लष्कराचा दावा किती खोटा आणि भ्रामक आहे, हे स्पष्टपणे दिसून येत आहे.
बलुचिस्ताननेही उघडली आघाडी
पाकिस्तानची सेना आता भारत आणि बलुचिस्तान यांच्या कात्रीत सापडल्याचे दिसत आहे. बलोच लिबरेशन आर्मी या स्वातंत्र्यवादी संघटनेने जवळपास बलुचिस्तानचे स्वातंत्र्यच घोषित केले आहे. क्वेट्टा शहरावर ताबा मिळविल्याचा दावा या संघटनेने केला असून या शहरातील पाकिस्तानी सेनेने 8 तळ उध्वस्त करण्यात आले आहेत. अनेक पाकिस्तानी सैनिकांनी पळ काढला असल्याचेही बोलले जाते. पाकिस्तानने आपली सेना बव्हंशी भारताच्या सीमेवर हलविली असून त्यामुळे बलुची संघटनांना पाकिस्तानला ठोकण्याची संधी प्राप्त झाली आहे.
अफगाणिस्तानने केला पाकिस्तानचा पर्दाफाश
पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला पाकिस्तानने केलाच नव्हता, असा कांगावा आजही पाकिस्तान करीत आहे. तथापि, अफगाणिस्तानने पाकिस्तानचा पर्दाफाश केला आहे. भारतावर क्षेपणास्त्र हल्लाही केला नाही, असा पाकिस्तानचा दावा आहे. पण अफगाणिस्तानने पाकिस्तानला या दोन्ही बाबतीत खोटे पाडले असल्याने पाकिस्तानची ही तिसऱ्या आघाडीवर कोंडी झाल्याचे दिसत आहे.
फताह क्षेपणास्त्र नष्ट
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने अब्दाली आणि फताह या क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. त्यांच्यापैकी फताह हे क्षेपणास्त्र त्याने शनिवारी सकाळी भारताच्या श्रीनगर विमानतळावर सोडण्याचा प्रयत्न केला. तथापि, ते हरियाणातील हिस्सार येथेच पाडविण्यात आले. या क्षेपणास्त्राचे तुकडे आणि मधला भाग सापडला असून त्याचे परीक्षण करण्यात येईल, अशी माहिती देण्यात आली आहे.
क्षेपणास्त्रांचे लाँचपँड नष्ट
पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील पंजाब प्रांत येथे पाकिस्तानने प्रस्थापित केलेली क्षेपणास्त्रे डागणारी अनेक लाँचपॅडस् सीमा सुरक्षा दलाने नष्ट केली आहेत. दलाने याची व्हिडीओग्राफी आणि छायाचित्रेही प्रसिद्ध केली आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधली लाँचपॅडस् नष्ट केल्याने भारतात दहशतवाद्यांची घुसखोरी होण्याचा धोका नियंत्रित झाला आहे. गुरुवारपासून सीमा सुरक्षा दलाने पाकिस्तानच्या अनेक चौक्या नष्ट केल्याने पाकिस्तानची कोंडी झाली आहे. पाकिस्तानची संघर्ष करण्याची शक्ती यामुळे कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे.
कोणताही दहशतवादी हल्ला हा युद्धच
शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन्ही सेनादलांच्या प्रमुखांशी बैठक घेऊन चर्चा केली आहे. भारताची संघर्षाची सज्जता पूर्ण आहे. पाकिस्तानने आपली गुर्मी आवरती घेतली नाही, तर भारत कोणत्याही परिस्थितीसाठी सज्ज आहे, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे, असा इशारा देण्यात आला आहे. ज्या प्रकारे भारताने पाकिस्तानने केलेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर दिले, त्यावरुन भारताचे वर्चस्व सिद्ध झाले आहे, असाही विचार बैठकीत व्यक्त झाला होता. पाकिस्तान जो पर्यंत संघर्ष ताणता ठेवेल, तोपर्यंत त्याला दणके देत राहण्याचे भारतानचे धोरण असेल, असे या बैठकीत निर्धारित करण्यात आले आहे.
40 फुटांचा खड्डा
पंजाबच्या पठाणकोटनजीकच्या एका खेड्यात पाकिस्तानचे क्षेपणास्त्र पडून मोठा स्फोट झाला. भारताच्या आकाश क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेने पाकिस्तानचे हे क्षेपणास्त्र पाडविले होते. ते फताह क्षेपणास्त्र असावे, असे अनुमान आहे. ते निर्मनुष्य शेतात कोसळल्याने कोणतीही हानी झाली नाही. मात्र स्फोटाचा दणका एवढा होता, की शेतात चाळीस फूट लांबीचा ख•ा पडल्याचे दिसून आले आहे. या ख•dयाची छायाचित्रेही सोशल मिडियावर प्रसिद्ध केली जात असल्याचे दिसून येत आहे.
शनिवारी दिवसभरात…
पाकिस्तानचा हल्ल्याचा प्रयत्न
ड शनिवारी मध्यरात्रीपासूनच पाकिस्तानने भारताच्या चार सेनातळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला होता. भारतावर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागण्यात आली.
पाकिस्तानचे प्रयत्न निष्पळ
ड पाकिस्तानने जवळपास 300 ड्रोन्स भारतावर डागले. पण त्यांच्यातील 99 टक्के ड्रोन्स आदळलेच नाहीत. ते भारताने हवेतच उडविल्याचे दिसून आले.
भारताने पाडविली विमाने
ड पाकिस्तानच्या हल्ल्याच्या प्रयत्नाला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तानची भारताच्या वायुक्षेत्रात घुसलेली दोन युद्ध विमाने पाडविण्यात यश मिळविले
पाकिस्तानच्या तळांवर प्रहार
ड भारताने पाकिस्तानच्या आठ वायुतळांवर जीवघेणा प्रहार केला. या प्रतिहल्ल्यात या तळांची जबर हानी झाली. त्यामुळे चिंतेचे वातावरण पसरले
पंतप्रधान मोदी यांची बैठक
ड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन्ही सेनाप्रमुख आणि संयुक्त सेनाप्रमुखांशी चर्चा करुन भारताचे पुढचे धोरण ठरविले. दहशतवाद हे युद्धच मानण्यात आले.
संरक्षण विभागाची पत्रकार परिषद
ड सकाळी साडेदहा वाजता संरक्षण विभागाने पत्रकार परिषद आयोजित केली. संरक्षण विभागाच्या महिला प्रवक्त्यांनी या परिषदेत घटनाक्रम विशद केला
शस्त्रसंधीची ट्रंप यांच्याकडून घोषणा
ड भारत आणि पाकिस्तान यांनी शस्त्रसंधी करण्याचे मान्य केले आहे, अशी घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष ट्रंप यांनी केली. त्यानंतर वातावरण वेगळे झाले
पाकिस्तानकडून शस्त्रसंधी
ड डोनाल्ड ट्रंप यांच्याकडून शस्त्रसंधी घोषित झाल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्र व्यवहार विभागानेही शस्त्रसंधी घोषित केल्याने संघर्षाला तात्पुरता विराम
भारताकडूनही मान्यता
ड संध्याकाळी सहा वाजता भारताच्या परराष्ट्र विभागाने शस्त्रसंधी झाल्याची घोषणा केली. ही शस्त्रसंधी संध्याकाळी 5 पासून लागू झाल्याचे स्पष्ट झाले









