वृत्तसंस्था/ हांगाझोऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत स्क्वॅश या क्रीडा प्रकारात भारताची तीन पदके निश्चित झाली आहेत. बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाला इराणने बरोबरीत रोखले. तर महिलांच्या सांघिक प्रकारात भारताने मंगोलियाचा पराभव केला.
स्क्वॅश या क्रीडा प्रकारात पुरुष एकेरीमध्ये भारताच्या सौरभ घोषालने आपली विजयी घोडदौड कायम राखताना मंगळवारी झालेल्या सामन्यात जपानच्या सुकुईचा 11-5, 12-10, 11-3 अशा गेम्समध्ये पराभव केला. दरम्यान मिश्र दुहेरीत भारताच्या अनहात सिंग आणि अभय सिंग यांनी यांग येवोनसु आणि ली यांचा 11-4, 8-11, 11-1, असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. त्याचप्रमाणे अन्य एका मिश्र दुहेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताच्या अनुभवी दीपिका पल्लिकल आणि हरिंदरपाल सिंग सिद्धू यांनी फिलिपिन्सच्या अरी बॅडो आणि गार्सिया यांच्यावर 7-11, 11-5, 11-4 अशी मात करत उपांत्य फेरी गाठली आहे. मात्र महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत सेतोमी वटांबेने भारताच्या तन्वी खन्नाचा 11-5, 11-6, 14-12 असा पराभव केला. भारताच्या सौरभ घोषालने 2014 च्या इंचॉन आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते.
बुद्धिबळ
बुद्धिबळ या क्रीडा प्रकारात भारताच्या पुरुष संघाला मंगळवारी झालेल्या पाचव्या फेरीच्या लढतीत इराणने 2-2 असे बरोबरीत रोखले. तर महिलांच्या सांघिक प्रकारात द्वितीय मानांकित भारताने पाचव्या फेरीच्या लढतीत मंगोलियाचा 4-0 असा पराभव केला. भारतीय महिला संघाच्या विजयामध्ये कोनेरु हंपी आणि आर. वैशाली यांचा वाटा महत्त्वाचा आहे. या क्रीडा प्रकारात सांघिकमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला संघांनी प्रत्येकी समान आठ गुण घेत दुसरे स्थान मिळवले आहे.
पुरुषांच्या सांघिक विभागातील पाचव्या फेरीच्या लढतीत इराणच्या पी. मेगसुडलूने भारताच्या डी. गुकेशचा पराभव करत पराभव केला तर दुसऱ्या एका लढतीत भारताच्या आर. प्रग्यानंदने इराणच्या तेबातेबाईचा पराभव केला. विदित गुजराती आणि पी. हरीकृष्णा यांनी आपले डाव बरोबरीत राखले. त्यामुळे ही लढत 2-2 अशी बरोबरीत राहिली. सांघिक प्रकारातील गुणतक्त्यात इराण 9 गुणासह पहिल्या स्थानावर आहे.
महिलांच्या सांघिक विभागात भारताच्या वंटीका अगरवालने तसेच 16 वर्षीय सविता श्रीने मंगोलियाच्या अनुक्रमे उलझिली आणि बयारजर्गल यांचा पराभव केला. अन्य लढतीत टॉप सिडेड चीनने कझाकस्तानचा 2.5-1.5 अशा गुणांनी पराभव करत गुणतक्त्यात 9 गुणासह आघाडीचे स्थान मिळविले आहे.









