वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चीनमधील चेंगडू येथे सुरू असलेल्या 15 आणि 17 वर्षाखालील वयोगटाच्या आशियाई बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेत जगशेर सिंग खंगुरा, बोरनील आकाश चांगमई आणि तन्वी शर्मा यांनी आपल्या गटातून उपांत्य फेरी गाठली असल्याने भारताच्या या स्पर्धेतील तीन पदके निश्चित झाली आहेत.
मुलांच्या 15 वर्षाखाली वयोगटातील एकेरी उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात भारताच्या जगशेर सिंग खंगुराने चीनच्या मा झुआनचा केवळ 28 मिनिटात 21-14, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये फडशा पाडत उपांत्य फेरी गाठली आहे. त्याचप्रमाणे अन्य एका सामन्यात भारताच्या बोरनील आकाशने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात कोरियाच्या पार्क जंग बीनचा 21-19, 22-20 अशा गेम्समध्ये पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. मुलींच्या 17 वर्षाखालील वयोगटातील एकेरीच्या सामन्यात भारताच्या तन्वी शर्माने चीन तैपेईच्या लियाओ ची हिचा 20-22, 21-15, 21-15 असा पराभव करत उपांत्य फेरी गाठली आहे. मुलींच्या 17 वर्षाखालील वयोगटातील दुहेरीच्या सामन्यात भारताच्या तन्वी आणि रसिका यांना चीनच्या यांग आणि फू यांनी 20-10, 22-20 अशा गेम्समध्ये पराभूत करत पुढील फेरी गाठली.









