वृत्तसंस्था/बेंगळूर
याआधीच उपांत्य फेरी गाठलेल्या भारताला मंगळवारी येथे सॅफ स्पर्धेच्या शेवटच्या साखळी सामन्यात बलाढ्या कुवेतचा सामना करावा लागणार असून ही स्पर्धेतील त्यांची सर्वात कठीण परीक्षा राहणार आहे. दोन विजयांतून सहा गुणांसह भारताप्रमाणेच कुवेतनेही उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे आणि श्री कांतिरवा स्टेडियमवरील मंगळवारचा सामना ‘अ’ गटात अव्वल स्थान कुणाला प्राप्त होईल ते ठरवेल. याशिवाय आजच्या दुसऱ्या सामन्यात पाकिस्तान आणि नेपाळ आमनेसामने येणार आहेत. दोन्ही संघ आधीच त्यांचे दोन सामने गमावल्याने उपांत्य फेरीच्या स्पर्धेतून बाहेर पडलेले आहेत. भारताने पाकिस्तानचा 4-0 असा धुव्वा उडवला, पण नेपाळवर 2-0 असा विजय मिळवताना त्यांना कठोर परिश्रम करावे लागले. विक्रमी आठ सलग सामन्यांमध्ये भारताने गोल स्वीकारलेला नसून यावरून त्यांचा बचाव चांगला राहिल्याचे दिसून येते. तथापि, मध्यफळी आणि आघाडीफळीला कुवेतसारख्या मजबूत संघाविऊद्ध आपली कामगिरी उंचवावी लागेल. नेपाळच्या बचावाला भेदण्यासाठी भारताला एका तासापेक्षा जास्त काळ संघर्ष करावा लागला होता आणि कुवेत अधिक संघटित आणि अनुभवी असल्याने त्यांचा बचाव आणखी भक्कम अडथळे निर्माण करू शकतो. गोल करण्याच्या बाबतीत भारताचे प्रमुख शस्त्र अजूनही सुनील छेत्री आहे, ज्याने पाकिस्तानविऊद्ध हॅट्ट्कि केली आणि त्यानंतर नेपाळविऊद्ध सलामीचा गोल केला. छेत्रीवरील ओझे कमी करण्यासाठी आपल्यासह इतर खेळाडूंनी लक्ष्य भेदण्याची गरज आहे, असे सहाल अब्दुल समदने म्हटलेले आहे. बलवान प्रतिस्पर्ध्यांविऊद्ध खेळण्याच्या आधी गोल करणाऱ्या अनेक खेळाडूंचा शोध घेणे भारतासाठी अत्यावश्यक आहे. कारण असे प्रतिस्पर्धी छेत्रीला आवश्यक जागा व मोकळीक देणार नाहीत. दुसरीकडे, आजवरच्या कामगिरीचा विचार करता भारताविऊद्ध 2-1 असे पारडे जड असलेल्या कुवेतने आतापर्यंत या स्पर्धेत अतिशय शिस्तबद्ध खेळ केला आहे. नेपाळ आणि पाकिस्तानवर त्यांनी अनुक्रमे 3-1 आणि 4-0 ने मिळविलेल्या विजयातून ते दिसून आलेले आहे. येथील परिस्थितीशी जुळवून घेण्यास त्यांना वेळ लागलेला असला, तरी भारताविऊद्ध तोच फॉर्म कायम ठेवण्याची इच्छा बाळगून ते मैदानात उतरतील.
लेबनॉन उपांत्य फेरीत
लेबनॉनने बेंगळूर येथील श्री कांतिरवा स्टेडियमवर झालेल्या बंगबंधू सॅफ स्पर्धेतील सामन्यात भूतानचा 4-1 असा पराभव करून सलग दुसरा विजय मिळवला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. लेबनॉनने पूर्ण जोमाने खेळ केला आणि पहिल्या सत्रामध्येच चार गोल नोंदवून प्रतिस्पर्ध्यांना खचवून टाकले. लेबनॉन संघाचे आता सहा गुण, तर बांगलादेश आणि मालदीवचे तीन गुण झालेले आहेत. भूतानने अद्याप त्यांचे खाते उघडले नसून ते गुणतालिकेच्या तळाशी आहेत.
सामना सुरू झाल्यानंतर 40 सेकंदांच्या आत
क्रॉसबारच्या किंचित वरून गेलेल्या अली टेनिचच्या फटक्याने पुढे काय घडेल याची जाणीव करून दिली आणि त्याप्रमाणे भूतानवर अनेक आक्रमणे झाली. 11 व्या मिनिटाला अली अल हजने मारलेला फटका भूतानच्या गोलरक्षकाने निष्फळ ठरविल्यानंतर परत आलेला चेंडू मोहम्मद सादेकने गोलमध्ये टाकून लेबनॉनला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अली अल हजने 23 व्या मिनिटाला ही आघाडी वाढविली, तर 35 व्या मिनिटाला खलील बादेरने तिसरा गोल आणि महदी झेनने मध्यांतराच्या किंचित आधी चौथा गोल नोंदवला.
मालदीवरील 3-1 विजयामुळे बांगलादेशच्या आशा जिवंत
सॅफ फुटबॉल स्पर्धेतील सामन्यात हमजा मोहम्मदने (17 व्या मिनिटाला) मालदीवला आघाडीवर नेल्यानंतर बांगलादेशने रकीब हुसेन (42 वे मिनिट), तारिक काझी (67 वे मिनिट) आणि शेख मोर्सलिन (90 वे मिनिट) यांनी केलेल्या गोलांच्या जोरावर 3-1 ने विजय मिळविला आणि ‘ब’ गटात तीन महत्त्वाचे गुण मिळवले. पहिल्या सामन्यात भूतानवर 2-0 असा विजय मिळवल्याने मालदीवचेही तीन गुण झाले आहेत. आता मालदीव आणि बांगलादेश या दोन्ही संघांना 28 रोजी आपापल्या शेवटच्या साखळी सामन्यामध्ये लेबनॉन आणि भूतानविऊद्ध खेळावे लागणार असून त्यावेळी त्यांच्यासाठी विजय आवश्यक राहणार आहे. लेबनॉनचेही तीन गुण झालेले आहेत. विजय अनिवार्य असतानाही सामन्याच्या सुऊवातीच्या टप्प्यात बांगलादेशने फारशी तत्परता दाखवली नाही. मालदीवने या बेफिकिरीचा पुरेपूर वापर करून हमजाच्या माध्यमातून आघाडी मिळविली. त्यानंतर बांगलादेशच्या खेळाडूंना अधिक सक्रिय होण्याची गरज जाणवली आणि ते त्यांच्या चालींमधूनही दिसून आले. जेव्हा जेव्हा मालदीवने आपल्या गोलसंख्येत भर घालण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांनी झटपट प्रतिहल्ले केले. अनुभवी रकीब हा बांगलादेशने दिलेल्या झुंजीचा सूत्रधार राहिला आणि त्याने फ्री किकवर हेडर मारून बरोबरी साधून दिली.









