मालिका जिंकण्यास यजमान तर बरोबरीत सोडविण्यास ऑस्ट्रेलिया उत्सुक, फलंदाजांच्या कामगिरीत सुधारणा अपेक्षित
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
भारताचे मेगास्टार्स फलंदाज जूनमध्ये होणाऱया डब्ल्यूटीसी अंतिम फेरीत सलग दुसऱयांदा स्थान मिळविण्यासाठी प्रयत्नशील असून तिसऱया कसोटीनंतर निर्माण झालेले डोक्यातील मळभ साफ करण्यासाठी उत्सुक आहेत. भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथी व शेवटची कसोटी आजपासून येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू होत असून मालिकाविजय हेही भारताचे लक्ष्य असेल तर मालिका बरोबरीत सोडविण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक आहे. सकाळी 9.30 पासून सामन्याला सुरुवात होत असून स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून त्याचे प्रक्षेपण होईल.

डब्ल्यूटीसीच्या दृष्टिकोनातून भारतासाठी सोपे समीकरण आहे. ही मालिका 3-1 अशा फरकाने जिंकून अंतिम फेरी निश्चित करणे. असे झाल्यास लंकेच्या न्यूझीलंडमध्ये होणाऱया अवे मालिकेच्या निकालाची प्रतीक्षा करण्याची भारताला गरज लागणार नाही. आतापर्यंत दोन्ही संघांच्या स्पिनर्सनी पूर्णपणे अनुकूल खेळपट्टय़ावर आपल्या संघाच्या बाजू समर्थपणे सांभाळल्यानंतर मोटेराच्या मजबूत व नियमित बाऊन्स असणाऱया खेळपट्टीमुळे फलंदाजांना थोडा दिलासा मिळेल. अडीच दिवसांत सामना संपवण्याची मालिका कोहली व त्याचे सहकारी या सामन्यात तरी बदलण्यासाठी निश्चितच प्रयत्नांची पराकाष्ठा करतील, अशी आशा आहे. तीन दिवसांत संपणारे सामने एकतर्फी व कंटाळवाणे होऊ लागले आहेत. तिसऱया सामन्यातील निकालानंतर तर सर्वच थरांतून खेळपट्टय़ांवर टीका होऊ लागली. दोन्ही संघांच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्त्वाचा असल्याने या मैदानावर त्याची बऱयापैकी हवा निर्माण झाली आहे.

दोन्ही देशांच पंतप्रधानांची उपस्थिती
या सामन्याच्या पहिल्या दिवशी एक लाख प्रेक्षकांची उपस्थिती अपेक्षित असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज पहिल्यांदाच या स्टेडियमवर सामना पाहण्यास उपस्थित राहणार आहेत. या सामन्याची जी हवा निर्माण झाली आहे, ती सार्थ ठरविण्यासाठी मात्र कोहली, कर्णधार रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा यांना माईंडगेमचा हा खेळ व 22 यार्डावरील द्वंद्व जिंकण्यासाठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. मेलबर्नमधील एमसीजीपेक्षा मोठे स्टेडियम असलेल्या या मैदानावर ट्रकपासून डेसिंगरूम 100 मीटर्सवर असून 70 हून अधिक पायऱया आहेत. त्यामुळे कोहली (111), पुजारा (98), रोहित जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर टिकून राहण्याचा प्रयत्न करतील. अक्षर पटेल (185) हा भारताचा मालिकेतील सर्वाधिक धावा जमविणारा दुसरा फलंदाज आहे तर रोहितने सर्वाधिक 207 धावा काढल्या आहेत. यावरून फलंदाजांना या मालिकेत बऱयाच अडचणींना सामोरे जावे लागले आहे, याचा अंदाज येतो.

फलंदाजीस साथ देणाऱया खेळपट्टीवर पहिल्या पाच षटकांतच आधीच्या कसोटीप्रमाणे पहिल्या पाच मिनिटांतच भारतीय फलंदाजांना मोठी फिरक घेणाऱया चेंडूंना सामोरे जावे लागणार नाही. त्यामुळे लियॉन, मर्फी, कुहनेमन यांना खेळताना यावेळी त्यांना सुरुवातीला फार कठीण जाणार नाही, असे वाटते. अनियमित बाऊन्स असणाऱया खेळपट्टीवर फिरकी खेळणे खूपच घातक ठरू शकते. फलंदाजांच्या मनात पुढे सरसावत खेळावे की मागे राहून लेट खेळावे, याबद्दल शंका निर्माण होतात. कोहली व पुजारा यांना अशी गोलंदाजी इतरांपेक्षा चांगल्या पद्धतीने खेळता येते. दर्जेदार प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध मोठय़ा खेळीने त्यांना बऱयाच काळापासून हुलकावणी दिली आहे, त्याची येथे भरपाई करण्याची त्यांना संधी आहे.
भारतीय संघात फक्त एक बदल होणार असून मोहम्मद शमी उमेश यादवसमवेत नवा चेंडू हाताळेल. मोहम्मद सिराजला या सामन्यात विश्रांती दिली जाणार असून वनडे मालिकेसाठी त्याचा उपयोग करण्यात येईल. 17 मार्चपासून ही मालिका सुरू होईल. भारतीय फलंदाजी पहिल्या तीन सामन्यात ढेपाळली असल्याने जादा फलंदाजाला स्थान दिले जाऊ शकते. पण फलंदाजीस अनुकूल खेळपट्टी असल्यास पाच गोलंदाज असणे आवश्यक ठरेल. अक्षर पटेलने फलंदाजीत चमक दाखवली, पण त्याच्या लेगस्पिनचा उपयोगही जास्त करून घेण्यात आला नाही. प्रथमश्रेणी क्रिकेट याच मैदानावर खेळले असल्याने तो या मैदानावर प्रभावी ठरू शकतो. यष्टिरक्षण कोना भरतची फलंदाजीतील कामगिरी अपेक्षापूर्ती करणारी नसल्याने त्याच्या जागी इशान किशनला संधी देण्याबाबत बरीच चर्चा सुरू आहे. मात्र प्रशिक्षक द्रविड यांचा भरतवर विश्वास आहे.
ऑस्ट्रेलियन संघही ऑफस्पिनर मर्फीला वगळून जादा पेसरला (बोलँड किंवा लान्स मॉरिस) स्थान देतो का, हे पहावे लागेल. डब्ल्यूटीसीमधील अंतिम फेरी निश्चित झाली असल्याने हंगामी कर्णधार स्टीव्ह स्मिथ भारतीय संघ मायदेशात अजेय नाही, हे सिद्ध करून दाखविण्यास उत्सुक असेल. इंग्लंडने 2012 मध्ये तसे करून दाखविले होते. मात्र इंदोरमधील कसोटीनंतर ऑस्ट्रेलियन संघाला त्याची पुनरावृत्ती करण्याची संधी मिळाली आहे.
संभाव्य संघ ः भारत ः रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, शुबमन गिल, पुजारा, कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत, इशान किशन, आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जडेजा, शमी, सिराज, उमेश यादव, सूर्यकुमार यादव, जयदेव उनादकट.
ऑस्ट्रेलिया ः स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), बोलँड, ग्रीन, कॅर। हँडस्कॉम्ब, हेड, उस्मान ख्वाजा, कुहनेमन, लाबुशेन, लियॉन, लान्स मॉरिस, मर्फी, रेनशॉ, स्टार्क, स्वेप्सन.
सामन्याची वेळ ः सकाळी 9.30 पासून
थेट प्रक्षेपण ः स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरून.









