वृत्तसंस्था/ लंडन
इंग्लंडविऊद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात शानदार विजय मिळवल्यानंतर शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव झाला. यात महान सचिन तेंडुलकरचाही समावेश राहिला. यामुळे त्यांना पाच सामन्यांची मालिका बरोबरीत आणता आली.
‘कसोटी क्रिकेट… पूर्णपणे रोमांचक मालिका 2-2, कामगिरी 10 पैकी 10 भारताचे सुपरमेन, काय शानदार विजय,’ असे तेंडुलकरने ट्विट केले. भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने संघाचे सातत्य आणि कामगिरीचे कौतुक केले. वॉशिंग्टन, जडेजा, पंत यांच्यासाठी ही मालिका अपवादात्मक राहिली आहे. या तऊण संघाकडून खूप सातत्य दाखविण्यात आले आहे, अशी प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली.
माजी फलंदाज वसीम जाफरने ‘एक्स’वर लिहिले, ‘मालिका बरोबरीत सुटली, पण भारताने चौकारांच्या संख्येचा विचार करता अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफी जिंकली आहे’. संघाच्या प्रयत्नांचे कौतुक करताना भारताचा माजी कर्णधार आणि महान फिरकीपटू अनिल कुंबळेने म्हटले आहे, ‘भारत चांगले खेळला. किती छान मालिका झाली. दोन्ही संघांतील सहभागी खेळाडूंना शुभेच्छा. मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी त्यांचे धैर्य दाखवत जबरदस्त कामगिरी केली. शुभमन गिल आणि टीमचे एका उत्तम मालिकेसाठी अभिनंदन’.
भारताचा फलंदाज सूर्यकुमार यादवनेही अविश्वसनीय विजयाबद्दल संघाचे कौतुक केले आहे. ‘किती उत्तम कामगिरी. या टीमला शेवटपर्यंत लढताना आणि मजबूत पद्धतीने शेवट करताना पाहणे खूप आवडले’, असे त्याने म्हटले आहे. अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणेने म्हटले आहे की, कसोटी क्रिकेट यापेक्षा चांगले असू शकत नाही. तणावपूर्ण शेवट, दबावाचे क्षण आणि धैर्याचे प्रदर्शन. माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने सिराजचे कौतुक करताना ‘सिंहाच्या काळजासह लोखंडी शरीर-मोहम्मद सिराज’ असे ट्विट केले आहे.
माजी फिरकी गोलंदाज हरभजन सिंगने लिहिले आहे, ‘सिराज आणि प्रसिद्ध यांच्याकडून चमकदार कामगिरी. आमच्यासाठी हा एक शानदार विजय. उत्तम कसोटी सामना, भारतीय संघाच्या प्रत्येक सदस्याचे अभिनंदन, तुम सब ने जीता दिल’. इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉननेही, ‘मी अशी अविश्वसनीय मालिका कधीच पाहिलेली नाही,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.









