वृत्तसंस्था/ अम्मान, जॉर्डन
जॉर्डनमधील अम्मान शहरात सुरू असलेल्या वरिष्ठ आशियाई कुस्ती स्पर्धेत सुनील कुमारने भारताचे पदकांच्या आघाडीवर खाते उघडले आहे. मंगळवारी स्पर्धेत ग्रीको-रोमन शैलीतील पाच वजन गटांमध्ये जोरदार लढती झाल्या. भारताच्या सुनील कुमारने (87 किलो) उल्लेखनीय कामगिरी करत चीनच्या जियाक्सिन हुआंगला 3-1 अशा फरकाने हरवून देशासाठी कांस्यपदक निश्चित केले.
पदकापर्यंतच्या प्रवासादरम्यान सुनीलने ताजिकिस्तानचा कुस्तीपटू सुखरोब अब्दुल खैववर 10-1 असा शानदार विजय मिळवला, परंतु उपांत्य फेरीत इराणच्या यासिन अली याझदीविऊद्ध तो कमी पडला. यासिनने 3-1 असा विजय मिळवला आणि सुनीलची सुवर्णपदकासाठी प्रयत्न करण्याची इच्छा संपुष्टात आली.
सुनीलचे आशियाई कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेतील हे पाचवे वरिष्ठ पदक असून त्याने 2019 मध्ये रौप्यपदक मिळवले होते आणि ग्रीको-रोमन कुस्तीमध्ये भारताची 27 वर्षांची सुवर्णपदकाची प्रतीक्षा 2020 मधील आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत संपविली होती. या भारतीय कुस्तीपटूने 2022 आणि 2023 मध्येही सलग कांस्यपदके जिंकली. उर्वरित चार भारतीय ग्रीको-रोमन कुस्तीपटू नितीन (55 किलो), उमेश (63 किलो), सागर ठकरन (77 किलो) आणि प्रेम (130 किलो) यापैकी नितीन, उमेश आणि प्रेम त्यांच्या संबंधित पात्रता फेरीच्या पुढे जाऊ शकले नाहीत, तर सागरला क्वॉर्टरफायनलमध्ये जॉर्डनच्या अमरो सादेहविऊद्ध तांत्रिक श्रेष्ठतेमुळे पराभव पत्करावा लागला.









