वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारतीय पॅरा बॅडमिंटन स्टार सुकांत कदमने एसएल-4 श्रेणीत प्रतिष्ठित जागतिक रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर झेप घेतली आहे. हा एक महत्त्वाचा टप्पा असून त्याने जागतिक क्रमवारीत प्रथमच शिखरावर पोहोचण्याचा मान मिळवला आहे. ही कामगिरी त्याच्या अथक समर्पणाचे आणि अलिकडच्या वर्षात आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण उच्च दर्जाच्या कामगिरीचे प्रतिबिंब आहे. सुकांतच्या अव्वल स्थानावर पोहोचण्यामागे जागतिक पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप आणि आशियाई पॅरा गेम्समधील अनेक पदकांसह उल्लेखनीय कामगिरीची मालिका आहे. अलिकडेच त्याने स्पॅनिश पॅरा बॅडमिंटन आंतरराष्ट्रीय 2025 मध्ये सुवर्णपदक जिंकले. भविष्याकडे पाहता सुकांत आगामी चायना पॅरा बॅडमिंटनअग्रस्थान टिकवून ठेवण्यासाठी व भविष्यातील प्रमुख स्पर्धांपूर्वी अमूल्य अनुभव मिळविण्यासाठी आणखी मजबूत कामगिरी करण्याचे त्याचे लक्ष्य आहे. 2026 च्या आशियाई खेळात सुवर्ण मिळवून पॅरा बॅडमिंटनमध्ये भारताचे स्थान आणखी उंचावण्याचे त्याचे ध्येय आहे.
जुलैमध्ये सुकांतने ब्रिटीश आणि आयर्लंड पॅरा बॅडमिंटन इंटरनॅशनल 2025 मध्ये पुरुषांच्या एकेरीत एसएल-4 प्रकारात स्थान मिळवले आणि अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी त्याने शानदार खेळ केला. त्याने उपांत्य फेरीत भारताच्या नवीन शिवकुमारचा सरळ सेटमध्ये (21-14, 21-19) असा पराभव केला. अंतिम सामन्यात सुकांतने फ्रान्सच्या पॅरालिम्पिक चॅम्पियन लुकास मजूरचा सामना केला आणि झुंजार लढत दिली पण त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.









