वृत्तसंस्था/ ट्युरिन
इटलीमध्ये नुकत्याच झालेल्या 2025 च्या खास ऑलिम्पिक विश्व हिवाळी क्रीडा स्पर्धेमध्ये भारताने एकूण 33 पदकांची कमाई करत दमदार यश मिळविले आहे. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी भारताने या स्पर्धेतील चार क्रीडा प्रकारांमध्ये 12 पदकांची कमाई केली.
या स्पर्धेमध्ये भारतीय स्पर्धकांनी 8 सुवर्ण, 18 रौप्य आणि 7 कांस्यपदकांची कमाई केली. भारतीय स्पर्धकांनी स्नोशोईंग क्रीडा प्रकारात शेवटच्या दिवशी 4 पदके मिळवली. या क्रीडा प्रकारात भारताने तत्पूर्वी 6 पदके मिळवली होती. भारतीय संघातील वासू तिवारी, शालिनी चौहान आणि तानिया यांनी 25 मी. स्नोशोईंग प्रकारात प्रत्येकी 1 रौप्यपदक घेतले. या स्पर्धेतील अल्पेनी स्काईंग सेगमेंट या क्रीडा प्रकारात भारतीय स्पर्धकांनी चांगली कामगिरी केली. राधादेवी आणि निर्मलादेवी यांनी इंटरमीडेट स्लेलोम प्रकारात रौप्यपदके घेतली आहेत. अभिषेक कुमारने नोव्हेसी स्लेलोमध्ये रौप्यपदक मिळविले. भारताच्या आकृतीने क्रॉस कंट्री स्काईंगमध्ये दर्जेदार कामगिरी करताना कांस्यपदक मिळविले. फ्लोरबॉल सांघिक प्रकारात भारतीय महिला संघाने कांस्यपदक घेतले. या स्पर्धेत स्नोशोईंग आणि अल्पेनी स्काईंग या प्रकारांमध्ये भारतीय स्पर्धकांनी प्रत्येकी 10 पदकांची कमाई केली.









