पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स दौऱ्याचे फलित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या फ्रान्स दौऱ्यात स्कॉर्पियन पाणबुडी खरेदीचा करार करण्यात आला आहे. भारत फ्रान्सकडून आणखी तीन स्कॉर्पियन पाणबुड्या विकत घेणार आहे. त्याचप्रमाणे राफेल विमान खरेदी आणि युद्ध विमानाची भारतात निर्मिती करण्यासंबंधीही करार करण्यात आले आहेत.

हे हजारो कोटी रुपयांचे करार आहेत. येत्या पाच वर्षांमध्ये ते पूर्ण केले जाणार आहेत. यांपैकी पाणबुडी कराराची सविस्तर माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पाणबुड्या भारतातच मुंबईच्या माझगाव डॉकमध्ये निर्माण केल्या जाणार आहेत. आतापर्यंत अशा पाच पाणबुड्या निर्माण करण्यात आल्या असून आणखी एक येत्या वर्षभरात नौदलाला मिळणार आहे. या पाणबुड्या निर्माण करण्याचे तंत्रज्ञानही भारतातला हस्तांतरीत केले जाणार असल्याने हा करार महत्वाचा आहे.
सध्या 16 पाणबुड्या
सध्या भारताच्या नौदलात 16 पारंपरिक पाणबुड्या आहेत. अद्यापही भारताला 18 अत्याधुनिक पाणबुड्यांची आवश्यकता आहे. फ्रान्सकडून तंत्रज्ञानाचे हस्तांतरण झाल्यानंतर भारताचे तंत्रज्ञ या पाणबुड्यांची निर्मिती स्वबळावर देशातच करु शकणार आहेत. त्यामुळे त्यांच्या निर्मितीचा खर्च बराच कमी होणार आहे.
स्कॉर्पियनचे वैशिष्ट्या
स्कॉर्पियन पाणबुडी 1,565 टन वजनाची आहे. हे नाव हिंदी महासागरात आढळून येणाऱ्या शॉर्क माशावरुन ठेवण्यात आले आहे. या पाणबुडीवर घातक आणि प्रभावी शस्त्रसंभार असून त्याद्वारे शत्रूच्या युद्धनौका आणि पाणबुड्या यांच्यावर अचूक प्रहार करता येतो. समुद्राच्या पाण्याखालून जाणारी क्षेपणास्त्रे यावर बसविण्यात आली आहेत. पाणबुड्यांची लांबी 220 फूट तर उंची 40 फूट आहे. ती समुद्राच्या पृष्ठभागावर 11 सागरी मैल या वेगाने प्रवास करु शकते. तर समुद्रात खोल गेल्यानंतर ती 20 सागरी मैल इतका वेग गाठण्याची तिची क्षमता आहे. ती एकदा इंधन भरल्यानंतर समुद्रात 50 दिवसांपर्यंत राहू शकते. ही पाणबुडी शत्रूच्या युद्ध साधनांची गुप्त माहिती काढण्यातही सक्षम आहे. अशा पाणबुड्या पुरेशा प्रमाणात मिळाल्यास भारताच्या नौदलाचे सामर्थ्य वाढणार आहे.









