संयुक्त राष्ट्रांचा ‘मिसिंग दि मोमेन्ट ऑफ अपॉरच्युनिटी’ या अहवालानुसार मागील वर्षी जगभरात निर्माण झालेल्या विजेचा 74 टक्के वाटा सौर आणि पवन आणि इतर पर्यावरणपूर्वक स्रोतांमधून आला होता. आंतरराष्ट्रीय अक्षय ऊर्जा संस्थेच्या ऊर्जाखर्च अहवालानुसार मागील वर्षी सर्वात स्वस्त वीज स्रोत म्हणजे सौर ऊर्जा, पवन ऊर्जा आणि नवीन जलविद्युत प्रकल्प हेच ठळकपणे समोर आले आहे. हवामान बदलावर नियंत्रण ठेवण्यात अद्याप जागतिक स्तरावर म्हणावे असे यश मिळतांना दिसत नाही. अशा पार्श्वभूमीवर संपूर्ण जगात शाश्वत ऊर्जा निर्माण करून ती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न होत आहेत हे अत्यंत स्वागतार्ह आहे असे अहवालात म्हंटले आहे.
ऑगस्ट 2022 मध्ये संयुक्त राष्ट्रांतर्फे आयोजित पॅरिस आंतरराष्ट्रीय परिषदेत भारताने 2030 सालापर्यंत एकूण वीज क्षमतेच्या 50 टक्के वीज निर्मिती ‘शाश्वत ऊर्जा’ या माध्यमातून करण्याचे लक्ष साध्य करण्याचे वचन दिले होते. 2025 मधील जून महिन्याच्या 30तारखेलाच भारताने आपले 50 टक्के ऊर्जा निर्मिती शाश्वत ऊर्जा स्रोतातून पार करण्याचे लक्ष यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. ही एक अत्यंत अभिमानस्पद कामगिरी आहे. कारण 2030 पर्यंत जे लक्ष पूर्ण करायचे होते ते पाच वर्षे आधीच पूर्ण करून आपल्या आगामी कामगिरीची जणू चुणूकच भारताने दाखवली आहे. भारताच्या एकूण वीज क्षमतेत सध्या ‘थर्मल पॉवर’ म्हणजेच पेट्रोल, डिझेल, कोळसा आदी जाळून जी ऊर्जा निर्मिती केली जाते ती 240गिगा वॅट इतकी आहे. याचे एकूण वीज उत्पादनात प्रमाण 49.92 टक्के तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत या माध्यमातून जून 2025ला एकूण 48.27 टक्के ऊर्जा निर्मिती करण्यात आली.
शाश्वत ऊर्जा माध्यमातून विक्रमी 224 गिगा वॅट इतकी ऊर्जा निर्मिती करून ‘स्वच्छ’ ऊर्जा क्षेत्रांतील आपल्या दमदार कामगिरीची चुणूकच भारताने दाखवून दिली आहे. अणुउर्जेतून भारताने 8.7 गिगा वॅट इतकी ऊर्जा निर्मिती केली आहे. हे प्रमाण एकूण वीज क्षमतेच्या 1.81 टक्के इतके आहे. सध्या ‘स्वच्छ’ ऊर्जा स्रोतामधून एकूण वीज क्षमतेच्या 50.08 इतकी वीज निर्मिती केली जाते आहे. यामध्ये हायड्रोपॉवर म्हणजेच जलविद्युत प्रकल्पांमधून 49.38 गिगा वॅट इतकी ऊर्जा निर्मिती केली जाते. हे प्रमाण 10.19 टक्के इतके आहे. सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा या मधून 184.62 गिगा वॅट इतकी वीज निर्मिती केली जाते. पारंपरिक ऊर्जेच्या अतिवापराने होणाऱ्या प्रदूषणामुळे हवामान बदलांच्या दुष्परिणामांना सारे जग सामोरे जाते आहे. ‘स्वछ’ ऊर्जा निर्मितीतूनच या जटिल प्रश्नावर मार्ग निघणार आहे. तंत्रज्ञान प्रगतीचा वेग अफाट आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सेंटर्स, इलेक्ट्रिकल वाहने आणि हिट पम्प आदींमुळे विजेची मागणी खूपच वाढली आहे. शिवाय उष्णतेच्या लाटांमुळे वातानुकूलित यंत्रणा वापरण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. या सगळ्यांसाठी लागणारी वीज अपारंपरिक ऊर्जा स्रोतांमधून देण्याचे प्रयत्न जगभर सुरु आहेत. भारतानेही सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा निर्मितीत वाढ करण्याच्या दृष्टीने योजना आखल्या आहेत. त्याची फळे येत्या पाच वर्षांत नक्कीच दिसू लागतील. कर्नाटकात पावगड येथे आशियातील सर्वात मोठा सोलर पॉवर पार्क उभारला गेला आहे. भारताने प्रदूषणाचे प्रमाण कमी कमी करण्याची वाटचाल 2015पासून सुरु केली. आणि आता अपारंपरिक ऊर्जा निर्मितीत आघाडी घेऊन आपल्या क्षमतेचे दर्शन घडवले आहे. पेट्रोल आणि डिझेल आयातीवर 75 टक्के रक्कम खर्च केली जाते. हे वास्तव लक्षांत घेता ऊर्जा क्षेत्रांत आत्मनिर्भरता येण्याच्या दृष्टीने शाश्वत ऊर्जेतील ही कामगिरी अत्यंत आश्वासक वाटते. पारंपारिक ऊर्जा स्रोतापेक्षा सौर ऊर्जा 41 टक्के स्वस्त पडते तर पवन ऊर्जा 53 टक्के स्वस्त पडते. या पार्श्वभूमीवर 50 टक्के स्वच्छ ऊर्जा निर्मितीचा टप्पा भारताच्या जीडीपीलाही बळकटी देणारा आणि विकासाला चालना देणारा आहे.
प्रा. डॉ. गिरीश नाईक, कोल्हापूर








