पंत, अय्यर यांची अर्धशतके, तैजुल इस्लाम, शकीब यांचे प्रत्येकी चार बळी, पुजाराच्या सात हजार धावा
मिरपूर/ वृत्तसंस्था
यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतची आक्रमक फलंदाजी तसेच श्रेयस अय्यरच्या सावध खेळीच्या जोरावर येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या क्रिकेट कसोटीत शुक्रवारी दुसऱया दिवशी भारताने यजमान बांगलादेशवर पहिल्या डावात 87 धावांची आघाडी घेतली. पंत आणि अय्यर यांनी पाचव्या गडय़ासाठी 159 धावांची शतकी भागीदारी केली. दिवसअखेर बांगलादेशने दुसऱया डावात बिनबाद 7 धावा जमवल्या होत्या.

या कसोटीत पहिल्या दिवशी गोलंदाजांनी 10 गडी बाद केले होते. दुसऱया दिवशीही पुन्हा गोलंदाजांनीच वर्चस्व गाजविल्याने दिवसभरात 10 गडी बाद झाले. बांगलादेशचा पहिला डाव 227 धावावर आटोपल्यानंतर भारताने शुक्रवारी बिनबाद 19 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. खेळपट्टीवर चेंडू अधिक फिरत असल्यामुळे बांगलादेशच्या गोलंदाजांनी याचा फायदा उठवला. डावातील 14 व्या षटकात तैजुल इस्लामने कर्णधार राहुलला पायचित केले. स्वीपचा फटका मारण्याच्या नादात तो बाद झाला. राहुलने 1 चौकारासह 10 धावा जमवल्याने त्याचा खराब फॉर्म या डावातही कायम राहिला. त्यानंतर तैजुल इस्लामने गिललाही राहुलप्रमाणेच चकवले. गिल तैजुलच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने 1 षटकार आणि 1 चौकारासह 20 धावा जमवल्या. दरम्यान तैजुल इस्लामने भारताला आणखी एक धक्का दिला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात शतक झळकवणारा चेतेश्वर पुजारा तैजुल इस्लामच्या चेंडूवर मोमिनूल हककरवी झेलबाद झाला. पुजाराने 55 चेंडूत 2 चौकारासह 24 धावा जमवल्या. तैजुलचे चेंडू खूपच खाली राहत असल्याने भारतीय फलंदाजांना फलंदाजी करणे अवघड जात होते.
दुसऱया दिवशीच्या खेळातील पहिले सत्र बांगलादेशचा डावखुरा फिरकी गोलंदाज तैजुल इस्लामचे होते, असे म्हणावे लागेल. उपाहारानंतर माजी कर्णधार कोहली पुन्हा एकदा मोठी खेळी करू शकली नाही, तस्कीन अहमदच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. त्याने 73 चेंडूत 3 चौकारासह 24 धावा जमविल्या. भारताची स्थिती यावेळी 4 बाद 94 अशी केविलवाणी झाली होती. उपाहारापासून ते चहापानापर्यंतच्या सत्रात सामन्याची स्थिती समतोल वाटत नव्हती पण त्यानंतर पंतच्या फटकेबाजीने सामन्याचे चित्र पालटले. पंतला अय्यरकडून चांगली साथ मिळाली. पंतने आक्रमक फटकेबाजी करण्यावर अधिक भर दिला आणि त्याला यशही मिळाले. तैजुल इस्लामच्या गोलंदाजीवर त्याने 2 उत्तुंग षटकार तसेच मेहदी हसन मिराजला 2 षटकार आणि कर्णधार शकीब अल हसनच्या गोलंदाजीवर एक षटकार खेचला. पंतने अय्यरसमवेत पाचव्या गडय़ासाठी 159 धावांची भागीदारी केली. पंतने 104 चेंडूत 5 षटकार आणि 7 चौकारासह 93 धावा झळकवल्या. पंतचे शतक 7 धावांनी हुकले. पंतने किमान दोन षटकार एकहाती मारले. मेहदी हसनच्या बाहेर जाणाऱया चेंडूवर फटका मारण्याच्या नादात पंत नुरुल हसनकरवी झेलबाद झाला.

भारताची ही जोडी फुटल्यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांना तळाचे फलंदाज लवकर गुंडाळण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागले नाहीत. अक्षर पटेल केवळ 4 धावावर बाद झाला. शकीब अल हसनने त्याला झेलबाद केले. श्रेयस अय्यर शतक झळकवेल असे वाटत असताना तो शकीबच्या गोलंदाजीवर पायचित झाला. अय्यरने 105 चेंडूत 2 षटकार आणि 10 चौकारासह 87 धावा झळकवल्या. शकीब अल हसनने अश्विनला 12 धावावर पायचित केले. तैजुल इस्लामने उमेश यादवला दासकरवी झेलबाद केले. त्याने 3 चौकारासह 14 धावा जमवल्या. मोहमद सिराज 7 धावावर बाद झाला. उनादकटने 2 चौकारासह नाबाद 14 धावा केल्या. भारताचा डाव 86.3 षटकात 314 धावावर आटोपला. बांगलादेशतर्फे तैजुल इस्लाम आणि शकीब अल हसन यांनी प्रत्येकी 4 तर तस्कीन अहमद आणि मेहदी हसन मिराजने प्रत्येकी एक गडी बाद केला. भारतीय संघाने पहिल्या डावात 87 धावांची आघाडी घेतल्यानंतर बांगलादेशने दुसऱया डावात 6 षटकात बिनबाद 7 धावा जमवल्या. अंधूक प्रकाशामुळे पंचांनी खेळ लवकर थांबविला. नजमूल हुसेन 5 तर झाकीर हसन 2 खेळत आहेत.
संक्षिप्त धावफलक – बांगलादेश प. डाव 73.5 षटकात सर्वबाद 227, भारत प. डाव 86.3 षटकात सर्वबाद 314 (पंत 93, अय्यर 87, राहुल 10, गिल 20, पुजारा 24, कोहली 24, अश्विन 12, उनादकट नाबाद 14, उमेश यादव 14, अक्षर पटेल 4, सिराज 7, शकीब अल हसन 4-79, तैजुल इस्लाम 4-74, तस्कीन अहमद 1-58, मेहदी हसन मिराज 1-61), बांगलादेश दु. डाव 6 षटकात बिनबाद 7 (नजमूल हुसेन शांतो खेळत आहे 5, झाकीर हसन खेळत आहे 2).
पुजाराच्या 7000 धावांचा टप्पा

भारतीय संघातील मध्यफळीत खेळणारा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजाराने कसोटी क्रिकेटमधील आपला 7000 धावांचा टप्पा ओलांडताना ऑस्ट्रेलियाचे दिवंगत माजी क्रिकेटपटू सर डोनाल्ड ब्रॅडमन यांना मागे टाकले.
दुसऱया दिवशी पुजाराने भारताच्या डावातील 19 व्या षटकात शकीब अल हसनच्या चेंडूवर स्वीपचा फटका मारत तीन धावा घेत हा टप्पा गाठला. ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू दिवंगत सर डोनाल्ड ब्रॅडमन यांनी कसोटी क्रिकेटमध्ये 6996 धावा जमवल्या होत्या. पुजाराने त्यांना आता मागे टाकले आहे. कसोटीमध्ये 7000 धावांचा टप्पा ओलांडणारा पुजारा हा भारताचा आठवा फलंदाज आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावसकर, व्हीव्हीएस लक्ष्मण, विराट कोहली, सौरव गांगुली आणि वीरेंद्र सेहवाग यांनी हा पराक्रम केला आहे. सचिन तेंडुलकरने कसोटी क्रिकेटमध्ये 329 डावात 15,921 धावांचा केलेला विक्रम अद्याप अबाधित आहे.









