इंग्लंडवर 100 धावांनी विजय: सामनावीर रोहित शर्मा-सूर्यकुमार यादवची शानदार खेळी
जसप्रीत बुमराहने सलग दोन चेंडूवर इंग्लंडला हादरे दिल्यानंतर इंग्लंडचा डाव शेवटपर्यंत सावरलाच नाही. मोहम्मद शमीने सलग दुसऱ्या सामन्यात घातक मारा करत चार विकेट घेतल्या आणि इंग्रजांचा बाजार उठवण्यात मोलाची भूमिका बजावली. शमीने चारपैकी तीन क्लीनबोल्ड विकेट घेत इंग्लंडची दाणादाण उडवली. बुमराहने तीन विकेट घेतल्या. विशेष म्हणजे, भारताचा हा वर्ल्डकपमधील सलग सहावा विजय ठरला आहे.
भारताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत 9 बाद 229 धावांपर्यंत मजल मारली. कर्णधार रोहित शर्माने 87 धावांची महत्वपूर्ण खेळी साकारली. सूर्यकुमार यादव 49 आणि केएल राहुल 39 धावांचे योगदान दिले. यानंतर विजयासाठीच्या 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गतविजेत्या इंग्लंडचा डाव 34.5 षटकांत अवघ्या 129 धावांवर आटोपला. या विजयासह टीम इंडियाने 12 गुणासह पुन्हा अव्वलस्थान पटकावले आहे. तर इंग्लंडचा हा सहा सामन्यातील पाचवा पराभव ठरला. या पराभवासह त्यांचे विश्वचषक स्पर्धेतील आव्हान देखील संपुष्टात आले आहे. 
इंग्लंडचा 129 धावांत खुर्दा
विजयासाठीच्या 230 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमीच्या वेगवान माऱ्यासमोर साहेबांच्या फलंदाजांची पळता भुई झाली. अवघ्या 39 धावांत 4 गडी बाद झाल्याने इंग्लंडचा संघ चांगलाच बॅकफूटवर गेला. सलामीवीर बेअरस्टोने 14 तर डेव्हिड मालनने 16 धावा केल्या. हे दोघे लागोपाठ बाद झाल्यानंतर अनुभवी जो रुट व बेन स्टोक्सला भोपळाही फोडता आला नाही. कर्णधार जोस बटलरने मोईन अलीच्या साथीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला, पण कुलदीप यादवने बटलरला त्रिफाळाचीत केले. त्याने 23 चेंडूत 10 धावा केल्या. कर्णधार माघारी परतल्यानंतर मोईन अलीने लियाम लिव्हिंगस्टनच्या साधीने डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. दोघांची जोडीही जमली होती, पण मोहम्मद शमीने मोईन अलीला तंबूत पाठवले. मोईन अलीला 31 चेंडूत फक्त 15 धावा करता आल्या. यानंतर लिव्हिंगस्टोनने 2 चौकारासह 27 धावांचे योगदान दिले. इतर तळाच्या फलंदाजांनी निराशा केल्याने इंग्लंडचा डाव 129 धावांत आटोपला. वोक्सने 20 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 10 धावा केल्या. विलीने नाबाद 16 तर आदिल रशीदने 13 धावा केल्या.
प्रारंभी, इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बटलरचा हा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवताना भारताच्या आघाडीच्या तीन फलंदाजांना 40 धावांत माघारी पाठवले. गिल, विराट आणि श्रेयस अय्यर यांना दुहेरी धावसंख्याही पार करता आली नाही. शुभमन गिलने 13 चेंडूत एका चौकाराच्या मदतीने 9 धावा केल्या. विराट कोहलीला 9 चेंडूचा सामना केल्यानंतरही खाते उघडता आले नाही. यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत विराट पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला. श्रेयस अय्यरने 16 चेंडूचा सामना केला, पण फक्त चार धावा काढून तंबूत परतला. एका बाजूला विकेट पडत असताना कर्णधार रोहित शर्मा याने संयमी फलंदाजी केली.

रोहितची 87 धावांची झुंजार खेळी
आघाडीचे तीन फलंदाज झटपट तंबूत परतल्यानंतर रोहित शर्माने केएल राहुलच्या साथीने भारताचा डाव सावरला. रोहित शर्मा आणि राहुल यांनी चौथ्या गड्यासाठी 91 धावांची भागिदारी झाली. 40 धावांवर तीन विकेट गेल्यानंतर रोहित आणि राहुल यांनी डाव सावरला. राहुलने 58 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 39 धावांचे योगदान दिले. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात तो बाद झाला. केएल राहुल बाद झाल्यानंतर रोहित शर्माही फारकाळ मैदानात टिकला नाही. रोहित शर्माने 101 चेंडूत 87 धावांचे योगदान दिले. रोहितच्या खेळीमध्ये 10 चौकार आणि तीन षटकारांचा समावेश होता. आदिल रशीदने त्याला बाद केले.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवनेने भारताची धावसंख्या वाढवण्याचा प्रयत्न केला. पण रविंद्र जडेजाकडून त्याला साथ मिळाली नाही. जडेजाने 13 चेंडूत फक्त 8 धावा केल्या. यानंतर आलेला मोहम्मद शमीही एका धावेवर बाद झाला. यानंतर सूर्याने जसप्रीत बुमराहाला साथीला घेत डावाला आकार दिला. अखेरीस मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात सूर्या तंबूत परतला. सूर्यकुमारने 47 चेंडूत 4 चौकार व 1 षटकारासह 49 धावांची महत्वाची खेळी केली. सूर्या बाद झाल्यानंतर जसप्रीत बुमराह आणि कुलदीप यादव यांनी अखेरपर्यंत झुंज दिली. जसप्रीत बुमराहने 25 चेंडूत 16 तर कुलदीप यादवने 13 चेंडूत 9 धावा केल्या. यामुळे भारताला 9 बाद 229 धावापर्यंत मजल मारता आली.
संक्षिप्त धावफलक : भारत 50 षटकांत 9 बाद 229 (रोहित शर्मा 87, केएल राहुल 39, सुर्यकुमार यादव 49, बुमराह 16, विली 45 धावांत 3 बळी, ख्रिस वोक्स व आदिल रशीद प्रत्येकी दोन बळी, मार्क वूड एक बळी)
इंग्लंड 34.5 सर्वबाद 129 (बेअरस्टो 14, मालन 16, जोस बटलर 10, मोईन अली 15, लिव्हिंगस्टोन 27, शमी 22 धावांत 4 तर बुमराह 32 धावांत 3 बळी, कुलदीप यादव 2 तर जडेजा 1 बळी).
रोहित शर्मा 18 हजारी मनसबदार
इंग्लंडविरुद्ध सामन्यात रोहित शर्माने 48 धावा पूर्ण केल्या, त्यावेळी एक मोठा माईलस्टोन त्याने पार केला. तो भारताकडून 18000 आंतरराष्ट्रीय धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर अव्वलस्थानी आहे. सचिनने कारकीर्दीत एकूण 34,357 धावा केल्या आहेत. यानंतर दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याच्या नावावर 26,121 धावा आहेत.
तसेच या सामन्यात 87 धावांची खेळी साकारत रोहितने 2023 मध्ये 1000 धावा देखील पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा अशी कामगिरी करणारा तो चालू वर्षातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यादीत पहिला क्रमांक भारताचा युवा सलामीवीर शुभमन गिल याचा आहे. गिलने चालू वर्षात आतापर्यंत 1334 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकावर लंकेचा पथूम निसंका आहे, ज्याने यावर्षी 1062 धावा केल्या आहेत.
भारतासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
34357 – सचिन तेंडुलकर
26121 – विराट कोहली
24064 – राहुल द्रविड
18433 – सौरव गांगुली
18001 – रोहित शर्मा
कर्णधार म्हणून रोहितचा 100 वा सामना
भारताचा कर्णधार म्हणून रोहितचा 100 वा सामना आहे. 100 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये भारताचे कर्णधारपद भूषवणारा तो सातवा खेळाडू ठरला आहे. आतापर्यंत महेंद्रसिंग धोनी (332), मोहम्मद अझरुद्दीन (221), विराट कोहली (213), सौरव गांगुली (196), कपिल देव (108) आणि राहुल द्रविड (104) हे एकमेव खेळाडू आहेत, ज्यांनी 100 किंवा त्याहून अधिक सामन्यात भारतीय संघाचे कर्णधार पद भूषविले आहे. या यादीत आता रोहितचा समावेश झाला आहे.
विराट विश्वचषकात पहिल्यांदाच शुन्यावर बाद
क्रिकेट विश्वचषकाच्या इतिहासात विराट पहिल्यांदाच शुन्यावर बाद झाला आहे. विशेष म्हणजे, विराट 34 व्यांदा शून्यावर बाद झाला आहे. त्याने या बाबतीत सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. सचिनने 782 डावांमध्ये 34 वेळा शुन्यावर बाद झाला होता तर विराटने केवळ 539 डावांमध्ये 34 वेळा शुन्यावर बाद झाला आहे. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विराट जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. प्रत्येक सामन्यात त्याने धावा केल्या आहेत. इंग्लंडविरुद्ध लढतीत क्षेत्ररक्षणाद्वारे विराटवर इंग्लिश खेळाडूंनी दबाव आणला. जोस बटलरने मिड-विकेटवर विराटसाठी दोन क्षेत्ररक्षक ठेवले होते. डेव्हिड विलीच्या गोलंदाजीवर विराटने फ्लिक केला पण तो क्षेत्ररक्षकाकडे गेला. विराटचे खातेही उघडता आले नाही. यानंतर त्याने कव्हर ड्राईव्ह मारला पण तोही क्षेत्ररक्षकाने रोखला. कोहलीने पुढच्या षटकातही कव्हर ड्राइव्ह खेळला पण मालनने चेंडू रोखला. सलग 8 डॉट बॉल खेळल्यानंतर विराटला आता स्वत:वर नियंत्रण ठेवता आले नाही. यानंतर नवव्या चेंडूवर कोहलीने मिड ऑफच्या डोक्यावरुन शॉट मारण्याचा प्रयत्न केला, चेंडू व्यवस्थित बॅटवर आला नाही आणि स्टोक्सच्या हातात झेल गेला.
तब्बल 20 वर्षानंतर भारताचा इंग्लंडवर विजय
भारताने 20 वर्षांनंतर विश्वचषकात इंग्लंडचा पराभव केला आहे. भारताने याआधी 2003 च्या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडला पराभूत केले होते. यानंतर 2011 मध्ये दोन्ही संघांमधील सामना बरोबरीत सुटला होता. त्याचवेळी 2019 च्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला पराभवाचा सामना करावा लागला होता.









