वृत्तसंस्था/ राऊरकेला (ओडिशा)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो लिग हॉकी स्पर्धेतील येथे झालेल्या पहिल्या सामन्यात सुगजितसिंगच्या दोन गोलांच्या जोरावर भारतीय हॉकी संघाने विद्यमान विश्वविजेता जर्मनीचा 3-2 अशा गोलफरकाने पराभव केला.
गेल्या जानेवारीत भारतात झालेल्या आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या पुरुषांच्या विश्वचषक हॉकी स्पर्धेत यजमान भारताचे उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यातील पराभवामुळे आव्हान लवकर संपुष्टात आले होते. शुक्रवारी येथे झालेल्या सामन्यात 26 वर्षीय सुगजित सिंगने 31 व्या आणि 42 व्या मिनिटाला असे दोन मैदानी गोल जर्मनीविरुद्ध नोंदवले. भारतीय हॉकी संघाचा कर्णधार हरमनप्रित सिंगने 30 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर संघाचे खाते उघडले. हॉकी प्रो लिग स्पर्धेत आतापर्यंत कर्णधार हरमनप्रित सिंगने सर्वाधिक गोल नोंदवून संयुक्त आघाडी घेतली आहे.
जर्मनीविरुद्धच्या सामन्यात 42 मिनिटापर्यंत भारताने 3-0 अशी आघाडी मिळवली होती. 44 व्या मिनिटाला पॉल फिलिप कॉफमनने जर्मनीचे खाते उघडले. सामना संपण्यास तीन मिनिटे बाकी असताना मिचेल स्ट्रूथहॉपने जर्मनीचा दुसरा गोल केला. या सामन्यात जर्मनीला सहा पेनल्टी कॉर्नर्स मिळाले पण त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. या सामन्यात भारताला चार पेनल्टी कॉर्नर मिळाले त्यापैकी एका कॉर्नरवर भारताने गोल केला. हरमनप्रित सिंगकडे भारतीय संघाचे नेतृत्व विश्वचषक हॉकी स्पर्धेनंतरही कायम ठेवण्याचा निर्णय हॉकी इंडियाने घेतला. दरम्यान ऑस्ट्रेलियन हॉकी प्रशिक्षक ग्रॅहम रिड यांनी मात्र विश्वचषक हॉकी स्पर्धेतील भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर आपल्या पदाचा राजीनामा स्वखुषीने दिला होता. शुक्रवारच्या सामन्यात पाचव्या मिनिटाला भारताच्या हरमनप्रित सिंगला पंचांनी पिवळे कार्ड दाखवले. या सामन्यासाठी भारतीय संघातील वरिष्ठ अनुभवी खेळाडू मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, अमित रोहिदास व गोलरक्षक कृष्णन फाटक यांना वगळण्यात आले होते. आता भारतीय हॉकी संघाचा प्रो लिग हॉकी स्पर्धेतील पुढील सामना बलाढ्या ऑस्ट्रेलियाबरोबर रविवारी तर त्यानंतर पुन्हा जर्मनी बरोबरचा परतीचा सामना येत्या सोमवारी खेळवला जाणार आहे.









