डेन्मार्कने 3-2 फरकाने हरविल्याने ‘जागतिक गट – 2’मध्ये रवानगी
वृत्तसंस्था/ इलेरोड-डेन्मार्क
डेव्हिस चषक स्पर्धेतील भारतीय टेनिस संघ 2019 मध्ये नवीन पद्धती लागू झाल्यानंतर प्रथमच घसरून जागतिक गट-2 मध्ये पोहोचला आहे. डेन्मार्कने ‘प्ले-ऑफ’ लढतीत त्यांना 3-2 ने पराभूत केल्यामुळे हा प्रसंग ओढवला आहे. जागतिक क्रमवारीत नवव्या क्रमांकावर असलेल्या होल्गर रूनने यजमानांना एकहाती हा विजय मिळवून देताना तीन सामने जिंकले.
या लढतीत खरे तर 1-1 अशी बरोबरी झाली होती आणि भारताला दुहेरीत विजय मिळवायचा होता. पण युकी भांब्री आणि रोहन बोपण्णा जोडीला ऊन आणि जोहान्स इंग्लायडसन या जोडीपुढे टिकाव धरता आला नाही आणि त्यांना अवघ्या 65 मिनिटांत 2-6, 4-6 असा पराभव पत्करावा लागला.
जागतिक गट-1 मध्ये राहण्यासाठी भारताला दोन्ही परतीचे एकेरी सामने जिंकणे आवश्यक होते. त्यात नागलने जोरदार लढत दिली, परंतु परतीच्या पहिल्या एकेरीमध्ये 1 तास 37 मिनिटे लढत चालल्यानंतर त्याला 5-7, 3-6 असा पराभव पत्करावा लागला. या पराभवाने डेन्मार्कला 1-3 अशी अभेद्य आघाडी मिळवून दिली आणि भारताला जागतिक गट-2 मध्ये ढकलले.
त्यानंतर फारशा महत्त्व न राहिलेल्या लढतीत प्रज्नेश गुणेश्वरनने एल्मर मोएलरविऊद्ध 1 तास 39 मिनिटे चाललेल्या सामन्यात 6-4, 7-6 (7-1) असा विजय मिळवला. शुक्रवारी नागलने ऑगस्ट होमग्रेनला 4-6, 6-3, 6-4 असे हरविले होते आणि ही लढत 2 तास 27 मिनिटे चालली होती, तर भांब्रीने सुऊवातीच्या एकेरीत 2-6, 2-6 असा पराभव पत्करला होता.









