मर्डेका चषक फुटबॉलचा ड्रॉ जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मर्डेका चषक फुटबॉल स्पर्धेचा ड्रॉ मलेशिया फुटबॉल संघटनेने मंगळवारी जाहीर केला असून भारताची उपांत्य लढत यजमान मलेशियाविरुद्ध होणार आहे.
हा सामना 13 ऑक्टोबर रोजी कौलालंपूरमधील बुकिट जलाल नॅशनल स्टेडियमवर खेळविण्यात येईल. दुसरी उपांत्य लढत पॅलेस्टाईन व लेबनॉन यांच्यात त्याच दिवशी होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मलेशियाविरुद्ध होणारी ही विक्रमी 32 वी लढत असेल. 2011 मध्ये कोलकाता येथे या दोन संघातील शेवटची लढत झाली होती. त्यावेळी भारताने मलेशियावर 3-2 अशी मात केली होती. 2001 नंतर भारतीय फुटबॉल संघ प्रथमच मर्डेका चषक स्पर्धेत सहभागी होत आहे. या स्पर्धेत भाग घेण्याची ही भारताची एकूण 18 वी वेळ असेल. 1959 व 1964 या वर्षी भारताने या स्पर्धेत उपविजेतेपद मिळवित आजवरची सर्वोत्तम कामगिरी नोंदवली आहे. उपांत्य लढत जिंकणाऱ्या संघांत 17 ऑक्टोबर रोजी जेतेपदासाठी लढत होईल तर उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या संघांत तिसऱ्या क्रमांकासाठी लढत होईल.









