वृत्तसंस्था/ डब्लिन
जसप्रीत बुमराहच्या प्रभावी पुनरागमनामुळे उत्साहित झालेला भारतीय संघ आज रविवारी येथे आयर्लंडविऊद्ध दुसरा ‘टी20’ आंतरराष्ट्रीय सामना खेळणार असून त्यावेळी हवामान चांगले राहील आणि संघाच्या युवा फलंदाजांना आपले कौशल्य दाखवण्याची संधी मिळेल अशी आशा ते बाळगून असतील. बुमराहच्या नेतृत्वाखालील माऱ्याने आयर्लंडला मालिकेच्या पहिल्या सामन्यात 7 बाद 139 धावांवर रोखल्यानंतर संततधार पावसामुळे मधल्या फळीतील फलंदाजांना त्यांची योग्यता सिद्ध करण्याची संधी मिळाली नव्हती.
दोन्ही संघ दुसरा सामना पूर्ण खेळण्यास मिळेल, अशी आशा बाळगून असतील. येत्या काही वर्षांत भारतीय फलंदाजीचे नेतृत्व करण्याची अपेक्षा ज्यांच्याकडून आहे त्या शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड आणि रिंकू सिंग या खेळाडूंना खेळपट्टीवर पुरेसा वेळ मिळेल अशी आशाही संघ व्यवस्थापन बाळगून असेल. पहिल्या सामन्यात चांगली सुऊवात करूनही लवकर बाद झालेला सलामीवीर यशस्वी जैस्वाल आणि वेस्ट इंडिजमधील शानदार कामगिरीनंतर खातेही न उघडता बाद झालेला तिलक वर्मा यांचे मोठा डाव खेळण्याकडे लक्ष असेल.
वरच्या फळीत नवोदित खेळाडू भरलेले असताना सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि हार्दिक पंड्यासारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत अनुभवी यष्टिरक्षक-फलंदाज संजू सॅमसनमुळे मधल्या फळीला थोडी अनुभवाची मजबुती मिळालेली आहे. त्याशिवाय अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदरकडेही पुरेसा अनुभव आहे. दुखापतीनंतर 11 महिन्यांनी परतलेल्या बुमराहने पहिल्याच सामन्यात 2 बळी मिळवले. ‘टी20’मध्ये पदार्पण करणाऱ्या प्रसिद्ध कृष्णासमवेत त्याने प्रभावी गोलंदाजी केली.
एकंदर परिस्थिती पाहता नाणेफेक महत्त्वाची भूमिका बजावू शकते आणि त्याबाबतीत भारत शुक्रवारी भाग्यवान ठरला होता. दुसऱ्या बाजूने अनेक वरिष्ठ खेळाडू नसतानाही पुरेशा मजबूत असलेल्या भारताला आव्हान द्यायचे असेल, तर आयर्लंडला फलंदाजीच्या जोरावर चांगली कामगिरी करावी लागेल. बुमराहने जसे भारताचे नेतृत्व करताना शानदार कामगिरी केली तशी कामगिरी आयर्लंडचा अनुभवी खेळाडू पॉल स्टर्लिंगला करावी लागेल. आयरिश संघाला अँड्य्रू बालबर्नी, जोशुआ लिटल, क्रेग यंग व जॉर्ज डॉकरेलसारख्यांकडूनही बऱ्याच अपेक्षा असतील.
संघ : भारत-जसप्रीत बुमराह (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, संजू सॅमसन, जितेश शर्मा, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, प्रसिद्ध कृष्णा, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आवेश खान.
आयर्लंड : अँड्य्रू बालबर्नी (कर्णधार), हॅरी टेक्टर, लॉर्कन टकर, रॉस अडायर, मार्क अॅडायर, कर्टिस कॅम्फर, गॅरेथ डेलेनी, जॉर्ज डॉकरेल, फिओन हँड, जोश लिटल, बॅरी मॅककार्थी, बेन व्हाइट, क्रेग यंग, थिओ व्हॅन वेरकॉम.