मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार, फलंदाजीत सुधारित कामगिरीची अपेक्षा
वृत्तसंस्था/ बार्बाडोस
भारत व वेस्ट इंडिज यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज शनिवारी येथे होणार असून त्यावेळी भारतीय संघ आपला निर्धारित फलंदाजी क्रम आहे तसाच राखण्याची शक्यता आहे. मात्र फलंदाजीत बरेच सुधारित प्रदर्शन घडवून तीन सामन्यांच्या मालिकेत अजिंक्य आघाडी घेण्याचे उद्दिष्ट त्यांच्याकडून बाळगले जाण्याची अपेक्षा आहे.
कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना मधल्या फळीतील फलंदाजांना खेळवून पाहताना दुसऱ्या सत्रात फिरकीस पोषक बनलेल्या खेळपट्टीवर किरकोळ अडचणी आल्या असल्या, तरी 115 धावांचे अल्प लक्ष्य असल्याने विजय सुरळीतरीत्या मिळविता आला. तथापि, भारताला पुन्हा एकदा लहान लक्ष्याचा पाठलाग करावा लागला, तरी रोहित शर्मा च शुभमन गिलसह मैदानात उतरेल आणि विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर येईल हे निश्चित आहे.
इशान किशनला त्याच्या प्रभावी अर्धशतकानंतरही मधल्या फळीत चांगली फलंदाजी करून दाखवावी लागेल. कारण के. एल. राहुलने पुनरागमन केल्यास ती जागा श्रीलंकेतील आशिया चषकादरम्यान त्याला सोडावी लागण्याची दाट शक्यता आहे. सध्याच्या वेळापत्रकानुसार, 8 ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे होणार असलेल्या ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या विश्वचषक स्पर्धेतील पहिल्या सामन्यापूर्वी आणखी 11 सामने होणार आहेत. त्यामुळे भारत स्थिर संघरचना ठेवू पाहेल आणि जास्त प्रयोग करणे शक्य होणार नाही.

बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल हे दिवंगत गोलंदाज माल्कम मार्शल आणि ’बिग बर्ड’ जोएल गार्नर यांचे घरगुती मैदान आहे. येथे ’बिग फोर’ (वरील दोन गोलंदाजांच्या जेडीला अँडी रॉबर्ट्स आणि मायकेल होल्डिंग) गोलंदाजीस येण्यापूर्वीच प्रतिस्पर्धी बाजूचे फलंदाज मानसिकदृष्ट्या खचून जात. पण गुऊवारी, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी कॅरेबियन फलंदाजांना चेंडू वळवून आणि उसळी देऊन झटपट बाद केले. हार्दिक पंड्याही नवीन चेंडूवर चांगला दिसला आणि उमरान मलिकने अनेक वेगवान चेंडू टाकले.
वेस्ट इंडिज क्रिकेटचे ते सोनेरी दिवस गेले आहेत आणि भारतातील एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र न ठरल्यानंतर तेथील क्रिकेटच्या लोकप्रियतेला कधी नव्हता इतका धक्का बसला आहे. 50 षटकांच्या स्पर्धेत ‘टी20’ पद्धतीने खेळण्याची विंडीजच्या फलंदाजांची प्रवृत्ती जडेजा आणि कुलदीपविऊद्धच्या अविवेकी फटक्यांच्या निवडीतून दिसून आली आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठीची खेळपट्टी वेगळी राहिली, तरी तिचे स्वरूप एकसारखे असू शकते आणि म्हणूनच भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचे आव्हान स्वीकारण्यास हरकत असता कामा नये.
गुडाकेश मोतीच्या डावखुऱ्या फिरकीचा आणि यानिक कॅरियाच्या लेगब्रेक्सचा सामना करणे ही कठीण नसली, तरी खूप सोपी गोष्ट देखील नाही. फिरकीस पोषक खेळपट्टीवर फिरकीपटूंना तोंड देताना भारतीय फलंदाजांनी फारशी धडाकेबाज कामगिरी हल्ली केलेली नाही आणि त्यामुळे पहिल्या एकदिवसीय सामन्याच्या परिस्थितीची पुनरावृत्ती झाल्यास संघासाठी ही चांगली परीक्षा ठरेल. कारण विश्वचषकातील ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविऊद्धच्या सामन्यांची ठिकाणे चेन्नई आणि लखनौ ही असून तेथील खेळपट्ट्या फिरकीपटूंना मदत करतील. अशा वेळी घरच्या मैदानांसारखी परिस्थिती विदेशात मिळाली, तर ते तयारी करण्याच्या दृष्टीने चांगलेच आहे.
सूर्यकुमार यादवसाठी एकदिवसीय सामन्यात त्याच्या टी20 फॉर्मची पुनरावृत्ती करणे अत्यावश्यक बनलेले आहे. गुऊवारी त्याच्यासमोर त्यादृष्टीने सुवर्णसंधी होती आणि मोतीच्या गोलंदाजीवर स्वीप फटका मारताना बाद होण्यापूर्वी तो चांगल्या स्थितीत दिसला होता. सूर्याला माहीत आहे की, श्रेयस अय्यर तंदुऊस्त झाल्यास आणि के. एल. राहुल परत आल्यास त्याचे स्थान धोक्यात येऊ शकते. आशिया चषकात त्याने चांगली कामगिरी केल्यास आणि खास करून पाकिस्तानविऊद्ध काही महत्त्वपूर्ण धावा केल्यास ही स्थिती बदलू शकते.
गोलंदाजीत पाचवा वेगवान गोलंदाज म्हणून मुकेश कुमारला मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर यांच्या मागे संघात स्थान मिळू शकते. कारण त्याने केलेली अचूक गोलंदाजी पाहता भारताने 15 सदस्यांच्या संघात अतिरिक्त फिरकी गोलंदाज निवडला नाही, तर त्याला वगळणे कठीण होईल.
संघ-वेस्ट इंडिज : शाई होप (कर्णधार), रोव्हमन पॉवेल, अॅलिक अथानाझे, यानिक कॅरिया, किसी कार्टी, डॉमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्झारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडन सिल्स, रुमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेअर, ओशाने थॉमस.
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन, इशान किशन, हार्दिक पंड्या, शार्दुल ठाकूर, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.









