ज्युनियर बॅडमिंटन वर्ल्ड चॅम्पियनशिप : फिलिपिन्सचा हाँगकाँगला धक्का
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
येथे सुरू असलेल्या बीडब्ल्यूएफ वर्ल्ड ज्युनियर बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये भारताने गट ह मधील लढतीत आणखी एक सफाईदार प्रदर्शन करीत लंकेचा पराभव करून बाद फेरी गाठण्याच्या दिशेने आगेकूच केली.
भारताला दुसरे मानांकन असून गट ह मध्ये अव्वल स्थान मिळविण्यासाठी फेव्हरिट असून दुसऱ्या लढतीत लंकेवर भारतीय कनिष्ठ संघाने 45-27, 45-21 असा विजय मिळविला. सोमवारी लंकेने संयुक्त अरब अमिरातवर चुरशीच्या लढतीत मात केली होती. इतर अव्वल संघांत 14 वेळचे चॅम्पियन चीन व माजी चॅम्पियन दक्षिण कोरिया यांनीही आपापल्या गटात दुसरे विजय मिळविले तर फिलिपिन्सने हाँगकाँगला 4-25, 45-28, 45-43 असा पराभवाचा धक्का देत खळबळ माजविली. गट ड मध्ये खेळणाऱ्या चीनने इंग्लंडवर 45-22, 45-19 तर दक्षिण कोरियाने पदार्पण करणाऱ्या भूतानचा 45-5, 45-17 असा धुव्वा उडविला.
भारतीय संघाला लंकेविरुद्धच्या लढतीत विजय मिळविण्यासाठी फारसे श्रम पडले नाहीत. नेपाळविरुद्धच्या लढतीत संधी न मिळालेल्या युवा खेळाडूंना या लढतीत भारताने उतरविले होते. लालथानझुआला हमरने मुलांच्या एकेरीत भारताला चांगली सुरुवात करून देताना केनेथ अरुगोडाचा 9-2 असा पराभव केला. त्यानंतर भव्या छाब्र्रा व मिथिलेश पी. कृष्णन यांनी सनुदा अरियासिंघे व थिसात रुपथुंगा यांच्यावर मात करून ही आघाडी 18-6 अशी वाढविली. रिले पद्धतीने स्कोरिंग असलेल्या लढतीत प्रथमच खेळणाऱ्या रक्षिता श्री हिला मात्र मुलींच्या एकेरीत संघर्ष करावा लागला. रानीथमा लियानगेविरुद्ध खेळताना ती 3-8 अशी पिछाडीवर पडली होती. पण नंतरचे सातपैकी सहा गुण जिंकून तिने भारताचा स्कोअर 36-21 असा वाढवला. सी. लालरमसांगा व तारीनी सुर या पुण्यातील ग्रां प्रि स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेल्या जोडीने अरुगोडा व लियानगे यांचा 9-6 असा पराभव करून भारताला हा सेट 45-27 असा जिंकून दिला.
दुसऱ्या सेटमध्ये रौनक चौहानने सुरुवात करून दिली आणि पहिल्या सेटप्रमाणे भारताच्या नवोदित खेळाडूंनी वर्चस्व राखत हा सेट 45-21 असा जिंकून लढतही जिंकली.
अन्य लढतीत जपानने आयर्लंडचा, थायलंडने पोर्तुगालचा, फ्रान्सने इजिप्तचा, अमेरिकेने नॉर्वेचा, चीनने इंग्लंडचा तुर्कीयेने घानाचा, डेन्मार्कने ब्राझीलचा, फिलिपिन्सने हाँगकाँगचा (2-1), कोरियाने भूतानचा, रोमानियाने पोलंडचा, यूएईने नेपाळचा पराभव करून विजय नोंदवले.









