एमएच-60 आरसंबंधी अमेरिकेसोबत 1.17 अब्ज डॉलर्सचा करार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अमेरिकेने भारतासोबतच्या एका महत्त्वपूर्ण संरक्षण व्यवहाराला मंजुरी दिली आहे. यामुळे समुद्रात भारताच्या नौदलाचे सामर्थ्य वाढणार आहे. अमेरिकेच्या विदेश विभागाने भारताला एमएच-60 आर सीहॉक हेलिकॉप्टर्ससाठी संबंधित उपकरणांच्या विक्रीसाठी मंजुरी देण्याचा निर्णय घेतला आहे. या उपकरणांसाठी 1.17 अब्ज डॉलर्सचा करार होणार आहे. बिडेन प्रशासनाने यासंबंधी अमेरिकन काँग्रेसला माहिती दिली आहे. एमएच-60आर हेलिकॉप्टर्सना 6 मार्च रोजी भारतीय नौदलाच्या ताफ्यात सामील करण्यात आले होते.
उपकरणांच्या विक्रीची प्रस्तावित योजना, भारताची पाणबुडीविरोधी युद्धक्षमतांचे आधुनिकीकरण करत वर्तमान आणि भविष्यातील धोक्यांना रोखण्याच्या क्षमतेत सुधारणा करणार असल्याचे संरक्षण सुरक्षा सहकार्य संस्थेने अमेरिकेच्या संसदेला एका अधिसूचनेद्वारे कळविले आहे.
बिडेन प्रशासनाने भारताला प्रमुख संरक्षण उपकरणांच्या विक्रीची मंजुरी स्वत:चा 4 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी दिली आहे. 5 नोव्हेंबर रोजी झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत विजय मिळविल्यावर डोनाल्ड ट्रम्प हे 20 जानेवारी रोजी अमेरिकेचे 47 वे अध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत.
भारताने मांडला होता प्रस्ताव
अधिसूचनेनुसार भारताने 30 ‘मल्टीफंक्शनल इन्फॉर्मेशन डिस्ट्रीब्युशन सिस्टीम-जॉइंट टॅक्टिकल रेडिओ सिस्टीम्स’ (एमआयडीएस-जेटीआरएस) खरेदी करण्याचा प्रस्ताव दिला होता. या विक्रीत मुख्यत्वे करार हा ‘लॉकहीड मार्टिन रोटरी अँड मिशन सिस्टीम’सोबत होणार आहे. याच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक सहाय्य आणि व्यवस्थापन निरीक्षणासाठी तात्पुरत्या स्वरुपात अमेरिकन प्रशासन 20 किंवा करारात सामील कंपन्यांच्या 25 प्रतिनिधींना भारत दौरा करावा लागणार असल्याचे अधिसूचनेत म्हटले गेले आहे.
एमएच-60आर हेलिकॉप्टर बेजोड
लॉकहीड मार्टिनकडून निर्मित एमएच-60आर हेलिकॉप्टर्सचा वापर अमेरिकेच्या नौदलासोबत अनेक देशांचे नौदल करते. हे हेलिकॉप्टर 95 टक्के उ•ाण तत्परता आणि उपलब्धतेला सक्षम करते, ही क्षमता अन्य कुठल्याही सागरी हेलिकॉप्टरमध्ये नाही. एमएच-60आर सीहॉक नौदलाला पाणबुडीविरोधी युद्ध आणि पृष्ठभागविरोधी युद्धात अभूतपूर्व क्षमता प्रदान करते. या हेलिकॉप्टरमध्ये अत्याधुनिक डिजिटल सेंसर असून त्यात मल्टी-मोड रडार, इलेक्ट्रॉनिक सपोर्ट मेजर सिस्टीम, इलेक्ट्रो-ऑप्टिकल/इन्फ्रारेड कॅमेरा, डेटालिंक, एअरक्राफ्ट सर्वाइवेबिलिटी सिस्टीम, डिपिंग सोनार आणि सोनोबॉय सामील आहे. पूर्णपणे एकीकृत मिशन सिस्टीम डाटावर प्रक्रिया करत समुद्राचा पृष्ठभाग आणि सबसी डोमेनच्या पूर्ण स्थितीचे चित्र तयार करते. यावर असलेल्या शस्त्रास्त्रांमध्ये टॉरपीडो, आकाशातून जमिनीवर मारा करणारी क्षेपणास्त्रs अणि रॉकेट तसेच चालक दलाकडून संचालित गन सामील आहे.









