वृत्तसंस्था/ कोलकाता
एएफसी आशिया चषक पात्र फेरीच्या फुटबॉल स्पर्धेत शनिवारी येथे झालेल्या सामन्यात यजमान भारताने अफगाणचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या विजयामुळे भारताने आपल्या गटात आपले स्थान अधिक मजबूत केले आहे.
एएफसी आशिया चषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाने आतापर्यंत पाचवेळा तर अलिकडच्या कालावधीत सलग दुसऱयांदा आपला सहभाग दर्शविला आहे. 2019 साली झालेल्या या स्पर्धेत भारताला प्राथमिक गटातच पराभव पत्करावा लागला होता. शनिवारच्या सामन्यात भारतीय संघाचा अनुभवी आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू सुनील छेत्रीने दुखापतीच्या कालावधीत आपल्या संघाचा पहिला गोल नोंदविला. सुनील छेत्रीचा हा 83 वा आंतरराष्ट्रीय गोल असून तो आता सर्वाधिक गोल नोंदविणाऱया फुटबॉलपटूंच्या यादीत तिसऱया स्थानावर आहे. अर्जेंटिनाचा मेसी दुसऱया स्थानावर आहे. या सामन्यात 85 व्या मिनिटाला झुबेर अमिरीने अफगाणचा गोल नोंदविला. सामना संपण्यास काही मिनिटे बाकी असताना साहेल अब्दुल समदने अफगाणच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचा दुसरा आणि निर्णायक गोल नोंदविला. या स्पर्धेतील यापूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने कंबोडियाचा 2-0 असा पराभव केला होता. मात्र अफगाणला या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात हाँगकाँगकडून पराभव पत्करावा लागला आहे.. आता भारताचा या स्पर्धेतील शेवटचा सामना हाँगकाँगबरोबर 14 जूनला होणार आहे.









