भारताचा भाग दाखविला आपल्या नकाशात
वृत्तसंस्था/ बीजिंग
चीनने भारताची पुन्हा एकदा कुरापत काढण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, या वेळी तो सीमारेषेवर सैनिकांच्या माध्यमातून नसून नकाशाच्या माध्यमातून आहे. चीनने आपला नवा नकाशा प्रसिद्ध केला असून त्यात भारताच्या स्वामित्वातील अरुणाचल प्रदेश आणि संपूर्ण अक्साई चीन प्रदेश दाखविण्यात आला आहे.
सोमवारी चीनकडून हा नवा नकाशा प्रसिद्ध करण्यात आला. अचूक नकाशा असे त्याचे वर्णन करण्यात आले आहे. त्यात केवळ भारताचाच भाग नव्हे, तर तैवान आणि दक्षिण चीन समुद्राचाही समावेश आहे. अक्साई चीन हा प्रदेश भारताचा लडाख प्रदेश आहे. 1962 च्या युद्धात आणि त्याही आधीपासून चीनने लडाखच्या 50 हजार हून अधिक चौरस किलोमीटर भूमी आपल्या घशात घातली होती. ही सर्व भूमी या नव्या नकाशात चीनच्या मालकीची असल्याचे दाखविण्यात आले आहे. तथापि, या सर्व भूभागावर कायदेशीररित्या भारताचे स्वामित्व आहे.
अरुणाचल प्रदेशला चीन दक्षिण तिबेटचा भाग समजतो. संपूर्ण तिबेटवर आपला अधिकार आहे, अशीही चीनची समजूत आहे. 1960 पूर्वीच चीनने तिबेटमध्ये बेकायदेशीरपणे आपले सैन्य घुसवून त्याचा ताबा मिळविला होता. त्याच्या निषेधार्थ तेथील बौद्ध धार्मिक नेते दलाई लामा यांनी भारतात आश्रय घेऊन दूरस्थ सरकार स्थापन केले होते. तिबेट घशात घातल्यानंतर चीनने अरुणाचल प्रदेशवर आपला अधिकार सांगण्यास प्रारंभ केला. भारताने चीनच्या या दाव्याचा नेहमीच विरोध केला असून लडाख आणि अरुणाचल प्रदेश हे भारताचे भाग असल्याचे स्पष्ट केले आहे. दोन्ही देशांमधील मॅकमोहन नामक सीमारेषा अद्याप अधिकृत सीमारेषा मानण्यात आलेली नाही. ही प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणून ओळखली जाते.
हेतूपुरस्सर कृत्य
भारताला भडकाविण्यासाठी चीन नेहमीच सीमावाद उकरुन काढत असतो. 1962 च्या पूर्वीपासून, विशेषत: तिबेट विनासायास कब्जात आल्यानंतर चीनची सीमा भारताच्या सीमेला भिडली आणि भारताची कुरापत काढण्याची संधी चीनला प्राप्त झाली. जवाहरलाल नेहरु यांच्या नेतृत्वातील भारताच्या सरकारांनी चीनसंबंधीच्या धोरणात अनेक गंभीर चुका केल्याने चीनला शिरजोर होण्याची संधी मिळाली, असे अनेक जाणकारांनी सप्रमाण दाखवून दिले आहे. चीनचा भारताच्या अरुणाचल प्रदेश, लडाख आणि सिक्कीम या तीन प्रदेशांवर डोळा आहे, ही बाब आतापर्यंत अनेकदा स्पष्ट झालेली आहे. भारत आपल्या धोरणावर ठाम आहे.









