आयसीसी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या इतिहासातील भारताचा विक्रम
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या दीर्घकालिन इतिहासामध्ये भारतीय क्रिकेट संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानबरोबर विक्रमी विजयाची नोंद केली आहे. या स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाने पाकवर आपला आठवा विजय नोंदवून नवा विक्रम नोंदवला आहे.
2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होण्यापूर्वी भारताचा पाकवरील ‘सेव्हन स्टार’ विक्रम अशी नोंद झाली होती. आयसीसीच्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये आतापर्यंत भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या सामन्यांना संपूर्ण जगातून प्रचंड प्रतिसाद आणि उपस्थितीची नोंद झाली आहे. 1952 पासून हे दोन क्रिकेट प्रतिस्पर्धी संघ म्हणून ओळखले जाऊ लागले. 1952 साली अब्दुल कादरच्या नेतृत्वाखाली पाकिस्तान संघाने भारताच्या भूमीवर पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. ही कसोटी मालिका अटीतटीची झाली होती पण त्यानंतर या दोन संघामध्ये क्रिकेट द्वंद्वाला आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत 1992 पासून प्रारंभ झाला. 1992 साली सिडनीच्या मैदानावर भारतीय संघाने पाकिस्तानचा 43 धावांनी पराभव केला होता. त्यावेळी 19 वर्षीय तेंडुलकरने 62 चेंडूत 54 धावा जमवल्या होत्या. त्यानंतर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये प्रत्येवेळी भारतीय संघाकडून पाकला पराभवाला सामोरे जावे लागले.
1996 साली आयसीसीच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळवला होता आणि त्यांचा उपांत्यपूर्व फेरीचा सामना बेंगळूरमध्ये झाला होता. या सामन्यावेळी पाक संघाला दुखापतग्रस्त वासिम अक्रमची उणीव चांगलीच भासली होती. या सामन्यात भारताने 50 षटकात 8 बाद 287 धावा जमवल्या होत्या. सिद्धूने 93 धावांचे योगदान दिले होते तर अजय जडेजाने वकार युनुसच्या गोलंदाजीवर फटकेबाजी केली होती. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल खेळताना वेंकटेश प्रसाद हा पाकचा कर्दनकाळ ठरला होता. या सामन्यात पाकने 50 षटकात 9 बाद 248 धावा जमवल्याने त्यांना हा सामना थोडक्यात गमवावा लागला.
1999 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारत-पाक यांच्यातील सामना मँचेस्टरमध्ये खेळवला गेला होता तर या सामन्यावेळी कारगिल युद्धाची छाया ताजी होती. या सामन्यात राहुल द्रविड आणि अझरुद्दीन यांच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने 50 षटकात 6 बाद 227 धावा जमवत पाकला 228 धावांचे आव्हान दिले होते. त्यानंतर वेंकटेश प्रसादच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकचा डाव 45.3 षटकात 180 धावात आटोपल्याने भारताने हा सामना पुन्हा मोठ्या फरकाने जिंकला होता. वेंकटेश प्रसादने 27 धावात 5 गडी बाद केले होते.
2003 च्या विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकरची फलंदाजी पूर्णपणे बहरली होती. 1996 आणि 1999 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धांमध्ये सचिनची फलंदाजी म्हणावी तशी समाधानकारक झाली नव्हती. 2003 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि पाकचा सामना सेंच्युरियन येथे खेळवला गेला होता. या सामन्यात सचिनने अक्रम, शोएब अख्तर, वकार युनूस यांच्या गोलंदाजीची चांगलीच धुलाई केली होती. या सामन्यात पाकने 7 बाद 273 धावा जमवल्या होत्या तर त्यांच्या सईद अन्वरने शतक झळकवले होते. त्यानंतर भारताच्या डावात सचिन तेंडुलकरने 75 चेंडूत 98 धावा तर युवराज सिंगने नाबाद अर्धशतक नोंदवून भारताला हा सामना सहा गड्यांनी जिंकून दिला होता.
2011 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मोहालीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्य फेरीचा सामना झाला होता. सचिनची ही शेवटची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होती. सचिनने या सामन्यात 85 धावांची खेळी केली होती तर त्याला पाकच्या क्षेत्ररक्षकांकडून चार जीवदाने मिळाली होती. या सामन्यात भारताने 9 बाद 260 धावा जमवल्या होत्या. पाकच्या वहाब रियाजने 46 धावात 5 गडी बाद केले होते. त्यानंतर भारताने पाकला 231 धावात गुंडाळून आणखी एक शानदार विजय नोंदवला होता. भारताच्या पाच गोलंदाजांनी या सामन्यात प्रत्येकी दोन गडी बाद केले होते. युवराज सिंगने युनूस खान आणि आसद शफीक यांचे बळी मिळवले होते. क्रिकेट क्षेत्रामध्ये भारतीय संघाने तब्बल 10 वर्षे आपले वर्चस्व राखले होते.
2015 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत नव्या भारतीय क्रिकेट संघातील विराट कोहली, शिखर धवन आणि सुरेश रैना या दमदार क्रिकेटपटूंनी पाकला आपली ओळख करुन दिली. या स्पर्धेतील झालेल्या उभय संघातील सामन्यात भारताने 50 षटकात 7 बाद 300 धावा जमवल्या होत्या. कोहलीने शानदार शतक (107), शिखर धवन आणि सुरेश रैना यांनी अर्धशतके झळकवली होती. त्यानंतर शमीच्या भेदक गोलंदाजीसमोर पाकचा डाव 224 धावात आटोपल्याने भारतीय संघाने पाकवर या स्पर्धेतील आणखी विजय नोंदवला. शमीने 4 गडी बाद केले होते.
2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक संघाला रोहित शर्मा नावाच्या फलंदाजाची नवी ओळख झाली. या सामन्यात रोहितने 113 चेंडूत 140 धावा झोडपल्या होत्या. तर कोहलीने 77 व के. एल. राहुलने 57 धावांचे योगदान दिले होते. रोहित शर्माने या सामन्यात हसन अलीची गोलंदाजी चांगलीच झोडपली होती. भारताने या सामन्यातही विजय मिळवला. त्यामुळे विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील उभय संघातील क्रिकेट मैदानावरील द्वंद्व कायम राहिले पण भारताने सातत्याने पाकवर मात करण्याचा पराक्रम केला आहे.
2023 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत अहमदाबाद येथे 14 ऑक्टोबर रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या भारत-पाक यांच्यातील सामन्यात यजमान भारताने पाकचा सात गड्यांनी दणदणीत पराभव करून या स्पर्धेच्या इतिहासातील आपली विजयी घोडदौड कायम राखताना विक्रमी आठवा विजय नोंदवला.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पाकचा डाव 42.3 षटकात 191 धावात आटोपला. कर्णधार आझमने अर्धशतक तर रिझवाने 49 व इमाम उल हकने 36 धावांचे योगदान दिले. भारतातर्फे बुमराह, सिराज, पांड्या, कुलदीप आणि रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना भारताने 30.3 षटकात 3 बाद 192 धावा जमवत हा सामना सात गड्यांनी जिंकला. कर्णधार रोहित शर्माने कप्तानी खेळी करताना 6 षटकार आणि 6 चौकारांसह 86 धावा झोडपल्या. गिलने 4 चौकारांसह 16, कोहलीने 3 चौकारांसह 16, श्रेयस अय्यरने 2 षटकार आणि 3 चौकारांसह नाबाद 53 तसेच के. एल. राहुलने नाबाद 19 धावा केल्या.









