28 गोल्डसह एकूण 107 पदकांची कमाई करत पटकावले चौथे स्थान : नेमबाजी, अॅथलेटिक्स, तिरंदाजीत सर्वाधिक सुवर्णपदके
वृत्तसंस्था/ हांगझाऊ
आशियातील सर्वात मोठी विविध खेळांची स्पर्धा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एशियन गेम्सचा शनिवारी (7 ऑक्टोबर) समारोप झाला. भारतीय पथकाने शनिवारी अखेरीस बुद्धिबळ स्पर्धा खेळली. भारताच्या महिला बुद्धिबळ संघाने या स्पर्धेत रौप्य पदक जिंकून भारताचे अभियान यशस्वीरित्या संपवले. या स्पर्धेत भारताने एकूण 28 सुवर्ण, 38 रौप्य व 41 कांस्यपदकासह एकूण 107 पदके आपल्या नावे केली. विशेष म्हणजे, आशियाई स्पर्धेच्या इतिहासातील भारताची आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यासह भारताने स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आपली मोहीम समाप्त केली. चीनने पहिले, जपानने दुसरे तर दक्षिण कोरियाने तिसरे स्थान पटकावले.
तिरंदाजीत गोल्डन धमाका, ज्योती ,ओजसला गोल्ड

शनिवारची सकाळ भारतीयांसाठी सुवर्णमय ठरली. भारताच्या ज्योति सुरेखा वेन्नमने तिरंदाजीमध्ये महिलांच्या कंपाऊंड प्रकारातील अंतिम सामन्यात शानदार प्रदर्शन करत दणदणीत विजय साकारला. ज्योतिने दक्षिण कोरियाच्या की चे वोनला 149-145 असे पराभूत करत सुवर्णपदक पटकावले. कोरियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. विशेष म्हणजे, ज्योतीचे या स्पर्धेतील तिसरे सुवर्णपदक आहे. दरम्यान, साताऱ्याच्या आदिती स्वामीने कंपाऊंड वैयक्तिक फेरीत विजय मिळवत कांस्यपदक पटकावले. आदितीने इंडोनेशियाच्या खेळाडूचा 146-140 असा पराभव केला. विशेष म्हणजे, आदिती सध्या फक्त 17 वर्षांची असून तिने या स्पर्धेत दोनच दिवसापूर्वी सांघिक प्रकारात सुवर्णपदक जिंकले होते. तसेच तिरंदाजीत नागपूरच्या ओजस देवतळने अंतिम फेरीत चमकदार कामगिरी करत मायदेशी सहकारी अभिषेक वर्माचा 149-147 असा पराभव केला. या विजयासह ओजसने सुवर्णपदक पटकावले तर अभिषेकला रौप्यपदक मिळाले. ओजसने आर्चरी मिक्स टीम कम्पाउंड इव्हेंटमध्ये तसेच आर्चरी मेन्स कम्पाउंड टीम इव्हेंटमध्येसुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिले आहे. यासह भारताने तिरंदाजीत 5 गोल्डसह 2 रौप्य व 2 कांस्य जिंकत अभिमानास्पद कामगिरी साकारली.
कबड्डीत महिला व पुरुष संघांचा डंका

भारतीय महिला कबड्डी संघाने चुरशीच्या अंतिम लढतीत चिनी तैपेईचा 26-25 असा निसटता पराभव करत जेतेपदाला गवसणी घातली. उभय संघातील अंतिम सामना चांगलारच चुरशीचा झाला. पहिल्या सत्रात भारतीय महिलांनी 14-9 अशी आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या सत्रात चिनी तैपेईने जोरदार पुनरागमन करत भारताला चांगलीच टक्कर दिली. सामना संपण्यास 9 मिनिटे बाकी असताना भारतीय संघ ऑलआऊट झाला व तैपेई संघाने 22-22 अशी बरोबरी साधली. मात्र अखेरच्या क्षणी भारतीय महिलांनी आपला खेळ उंचावत ही लढत 26-25 अशी जिंकत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
पुरुष गटात भारताने इराणचे कडवे आव्हान मोडून काढत सुवर्णपदकाला गवसणी घातली. शेवटच्या सेकंदापर्यंत रोमहर्षक झालेल्या सामन्यात भारताने इराणचा 33-29 असा पराभव केला. विशेष म्हणजे, भारताने गेल्या एशियन गेम्समधील पराभवाचे उट्टे काढत इराणकडून सुवर्णपदक हिसकावून घेतले. सामना सुरू झाला त्यावेळी भारतीय संघ पहिल्या हाफमध्ये 6-9 असा पिछाडीवर होता. मात्र भारतीय संघाने आपला खेळ उंचावत पहिला हाफ संपेपर्यंत 17-13 अशी आघाडी घेतली. दुसऱ्या हाफमध्ये देखील इराणने भारताला चांगलीच टक्कर दिली. नेक टू नेक सुरू असलेल्या सामन्यात इराणने 25-25 अशी बरोबरी देखील साधली होती. मात्र सामना संपायला शेवटची 5 मिनिटे शिल्लक असताना इराणने भारताचे शेवटपर्यंत टेन्शन वाढवले होते. त्यांनी 28-28 अशी बरोबरी साधली. मात्र याचवेळी भारताच्या पवनच्या डू ऑर डाय रेडवेळी गोंधळ झाला. पवनने इराणच्या कोणत्याही बचावपटूने स्पर्श करण्यापूर्वी ऑऊट ऑफ लाईन गेल्याचा दावा केला. यानंतर रेफ्रीने भारत आणि इराण या दोघांनाही एक एक गुण दिला. मात्र यानंतर दोन्ही संघाचे खेळाडू आणि प्रशिक्षकांनी वाद घातला. त्यामुळे सामना काही काळ थांबवण्यात आला होता. अखेर अवघी काही मिनिटे शिल्लक सामना पुन्हा सुरू झाला अन् भारताने मागील एशियन गेम्समधील पराभवाचे उट्टे काढत हा सामना 33-29 असा जिंकत सुवर्णपदक जिंकले.
क्रिकेटमध्ये टीम इंडियाने जिंकले गोल्ड

आशियाई क्रीडा स्पर्धेतील पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारताला सुवर्णपदक मिळाले. अंतिम लढत भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात झाली. अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करत 18.2 षटकात 5 बाद 112 धावा केल्या, पण तेव्हा नेमके पावसामुळे सामना थांबवावा लागला. पाऊस इतका जोरदार होता की पुन्हा मॅच होणे शक्य नव्हते. अखेरीस आयसीसी टी-20 क्रमवारीच्या आधारे भारताला विजेता घोषित करण्यात आले. या क्रमवारीत टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे. तर, अफगाणिस्तान दहाव्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे, भारतीय पुरुष क्रिकेट संघ प्रथमच एशियन गेम्समध्ये सहभागी होण्यासाठी आला होता. भारताने पहिल्याच प्रयत्नात इतिहास रचला आणि सुवर्णपदक जिंकले. अफगाण संघाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पुरुष संघाच्या आधी महिलांमध्ये भारतीय संघाने श्रीलंकेचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले होते.
सात्विक-चिरागने रचला इतिहास, बॅडमिंटनमध्ये प्रथमच सुवर्ण

शनिवारी बॅडमिंटन खेळात पुरुष दुहेरीच्या अंतिम सामन्यात भारताच्या चिराग शेट्टी आणि सात्विक साईराज या जोडीने सुवर्ण जिंकले. सुवर्णपदकाच्या सामन्यात या सामन्यात भारतीय जोडीने कोरियाच्या किम वोंग आणि चोई सोल या जोडीला 21-18 आणि 21-16 असा पराभवाचा दणका दिला. विशेष म्हणजे, आशियाई स्पर्धेच्या इतिहासात बॅडमिंटनमध्ये प्रथमच भारताला सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी ना एकेरी, दुहेरीच्या वैयक्तिक किंवा संघाच्या बॅडमिंटन खेळात भारताने कधीच सुवर्ण जिंकले नव्हते. त्यामुळे हे सुवर्ण भारतासाठी निश्चितच खूपच खास आहे.
कुस्तीत दीपक पुनियाला रौप्य

भारताचा कुस्तीपटू दिपक पुनियाने 86 किलो फ्रिस्टाईल प्रकारात रौप्यपदक जिंकले. सुवर्णपदकाच्या सामन्यात इराणच्या हसन याजदानचार्दीने दीपकचा 10-0 असा एकतर्फी पराभव केला. त्यामुळे पुनियाला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. पहिल्या हाफमध्ये हसनने आठ गुण घेत आघाडी घेतली होती. यानंतर दुस्रया हाफमध्ये त्याने 2 गुण घेत पुनियाचा 10-0 असा पराभव केला. यासह आशियाई स्पर्धेत भारताने कुस्तीत एक रौप्य व पाच कांस्य अशी सहा पदके जिंकली. एकाही कुस्तीपटूला सुवर्णपदक जिंकता आले नाही.
107 पदके जिंकत भारत चौथ्या स्थानी
शंभर पदकांचे लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाने 23 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर या कालावधीत विविध खेळांमध्ये भाग घेत 28 सुवर्णपदके, 38 रौप्य व 41 कांस्यपदके अशी एकूण 107 पदके जिंकली. यापूर्वी भारताची सर्वोत्तम कामगिरी 2018 इंचेऑन आशियाई स्पर्धेतील होती. त्यावेळी भारताने 70 पदके जिंकली होती. दरम्यान, स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी भारताच्या खात्यात तब्बल 12 पदके जमा झाली. यामध्ये सहा सुवर्णपदके, चार रौप्य व दोन कांस्यपदकाचा समावेश आहे. पदकतालिकेत चीनने 200 सुवर्णासह 382 पदके मिळवत आपला दबदबा कायम राखला. त्यानंतर जपान व दक्षिण कोरियाने सर्वाधिक पदके जिंकली. भारतीय संघाने 1962 जकार्ता एशियन गेम्सनंतर आपली सर्वोत्तम कामगिरी करताना हे चौथे स्थान पटकावले. याशिवाय, भारताची ही आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी एशियन गेम्समध्ये कधीही भारताने शंभर पदके जिंकली नव्हती.
अॅथलेटिक्स, नेमबाजी, तिरंदाजीत सर्वाधिक पदके
यंदाच्या आशियाई स्पर्धेत भारतीय शूटर्सनी 7 सुवर्णपदकासह एकूण 22 मेडल जिंकली. अॅथलेटिक्समध्ये भारताने 6 सुवर्णपदकासह एकूण 29 मेडल मिळवली तर तिरंदाजीत भारताने 5 गोल्डसह एकूण 9 पदके जिंकण्याचा पराक्रम केला. याशिवाय, स्क्वॅश, क्रिकेट, कब•ाr, हॉकीतही भारताला पदके मिळाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीय संघाचे अभिनंदन
आशियाई क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. ऐतिहासिक कामगिरीबद्दल पंतप्रधान मोदींनी महिला कब•ाr संघ आणि तिरंदाजी संघाचे देखील विशेष कौतुक केले. भारतीय खेळाडूंनी 100 पदकांचा संकल्प पूर्ण केला आहे, आमचे खेळाडू आज जगात कोणाहीपेक्षा कमी नाहीत. त्यांची मेहनत आणि समर्पण देशाला अभिमानास्पद आहे, असे ट्विट त्यांनी केले आहे.









