भारताच्या स्थायी प्रतिनिधीने पाकिस्तानला घेरले : जगासमोर दहशतवादी चेहरा उघड
वृत्तसंस्था/न्यूयॉर्क
दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या शत्रूराष्ट्राला चोख प्रत्युत्तर देत भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत (युएनएससी) पाकिस्तानची शाब्दिक ‘चिरफाड’ केली. पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा उघड करताना पहलगाममध्ये पर्यटकांवर केलेला गोळीबार… त्यानंतर केलेली निष्पाप नागरिकांची हत्या… तसेच प्रार्थनास्थळांना लक्ष्य केल्यानंतरही प्रवचन देणे हा पाकिस्तानचा ढोंगीपणा आहे, असा थेट आरोप करत भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तानला दहशतवादाच्या मुद्यावर ‘आरसा’ दाखवला.
दहशतवादाला आश्रय दिल्याबद्दल भारताने शुक्रवारी सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा तीव्र निषेध केला. यादरम्यान, 2008 च्या मुंबई हल्ल्यांसह आणि गेल्या महिन्यात पहलगाममध्ये पर्यटकांच्या क्रूर सामूहिक हत्येसह दशकांपासून सुरू असलेल्या दहशतवादी हल्ल्यांमुळे इस्लामाबादचा दहशतवादी चेहरा उघड झाला. सशस्त्र संघर्षात नागरिकांच्या संरक्षणावर केंद्रित चर्चेदरम्यान संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतनेनी हरीश यांनी पाकिस्तानचा पर्दाफाश केला.
हरीश यांनी नागरिक, मानवतावादी कार्यकर्ते, पत्रकार आणि माध्यम व्यावसायिकांना येणाऱ्या धोक्यांना तातडीने तोंड देण्याची गरज अधोरेखित करतानाच जबाबदारी वाढविण्याच्या यंत्रणेचे आवाहन केले. ‘पाकिस्तानी प्रतिनिधीच्या अनेक मुद्यांवरच्या निराधार आरोपांना मी उत्तर देण्यास बांधील आहे,’ असेही त्यांनी ठणकावले.
सिंधू जलवाटप करार स्थगितच राहणार
सिंधू पाणी करारावर भाष्य करताना हरीश यांनी भारताने 65 वर्षांपूर्वी सद्भावनेने सिंधू पाणी करारावर स्वाक्षरी केली होती. पण पाकिस्तान गेल्या अनेक वर्षांपासून या भावनेचे उल्लंघन करत आहे. आता पाकिस्तान दहशतवाद संपवत नाही तोपर्यंत हा करार स्थगित राहील, असे आंतरराष्ट्रीय समुदायासमोर पुन्हा एकदा स्पष्ट केले.
भारताने गेल्या अनेक दशकांपासून आपल्या सीमेवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांचा सामना केला आहे. यामध्ये मुंबई शहरावर झालेल्या 26/11 च्या भयानक हल्ल्यापासून ते एप्रिल 2025 मध्ये पहलगाममध्ये निष्पाप पर्यटकांच्या क्रूर सामूहिक हत्येपर्यंतचा समावेश आहे. पाकिस्तानी दहशतवादाचे बळी प्रामुख्याने नागरिक आहेत, कारण त्याचे उद्दिष्ट आपल्या समृद्धी, प्रगती आणि मनोबलावर हल्ला करणे आहे. अशा देशाने आपल्या नागरिकांच्या सुरक्षेवरील चर्चेत भाग घेणे हे आंतरराष्ट्रीय समुदायाचा अपमान असल्याचेही हरीश म्हणाले.
22 एप्रिल रोजी पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव शिगेला पोहोचल्यानंतर तो लष्करी संघर्षात रुपांतरित झाला. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाला होता, त्यातील बहुतेक पर्यटक होते. या हल्ल्याचा बदला घेताना भारताने 7 मे रोजी पहाटे ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईमध्ये पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये 9 ठिकाणी दहशतवादी लाँच पॅड नष्ट केल्यानंतर पाकिस्तानने भारतीय लष्करी तळांवर हल्ले करण्यास सुरुवात केल्यामुळे लष्करी संघर्ष वाढला. पाकिस्तानचा हल्ला हाणून पाडत भारतानेही पुन्हा चोख प्रत्युत्तर दिले आणि त्यांच्या 11 हवाई तळांवर हल्ला केला. 10 मे रोजी शस्त्रसंधीची घोषणा करत दोन्ही बाजूंनी एकमेकांवरील हल्ले थांबवण्याचे मान्य केले होते.









