गिलचे दमदार शतक, कोहलीचे अर्धशतक, भारत 3 बाद 289
वृत्तसंस्था/ अहमदाबाद
येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू असलेल्या चौथ्या आणि कसोटी सामन्यात यजमान भारताने शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी पाहुण्या ऑस्ट्रेलियाला चोख प्रत्युत्तर देताना पहिल्या डावात 3 बाद 289 धावा जमवल्या. तत्पुर्वी ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावांचा डोंगर उभा केला होता. भारताच्या डावात सलामीचा फलंदाज शुभमन गिलने दमदार शतक (128) तर विराट कोहलीने नाबाद अर्धशतक (59) झळकवले.

चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेत भारताने पहिले दोन सामने जिंकल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंदोरची तिसरी कसोटी जिंकून आपले आव्हान जिवंत ठेवले होते. अहमदाबादच्या चौथ्या कसोटीत फलंदाजीस अनुकूल असलेल्या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 480 धावा झोडपल्या. उस्मान ख्वाजा आणि कॅमेरुन ग्रीन यांनी दमदार शतके झळकवली पण ऑस्ट्रेलियाच्या इतर फलंदाजांना या खेळपट्टीवर अश्विनच्या फिरकीने चकविले. ख्वाजाने 180 तर ग्रीनने 114 तसेच लेयॉन आणि मर्फी या शेवटच्या फलंदाजांनी अनुक्रमे 34 आणि 41 धावांचे योगदान दिले. अश्विन 6 बळी मिळवले तर शमीने 2 तसेच जडेजा आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
ऑस्ट्रेलियन संघाने 480 धावांचा डोंगर निर्माण करून भारतीय संघावर दडपण आणण्याचा प्रयत्न केला. भारताने बिनबाद 36 या धावसंख्येवरून शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवसाला पुढे प्रारंभ केला. उपाहारापर्यंतच्या पहिल्या सत्रात भारताने रोहित शर्माच्या रुपात एकमेव गडी गमवताना 129 धावापर्यंत मजल मारली. या सत्रामध्ये भारताने 93 धावांची भर घातली. उपाहारावेळी शुभमन गिल 65 तर पुजारा 3 धावावर खेळत होते. या पहिल्या सत्रामध्ये गिलने आत्मविश्वासाने फलंदाजी केली. रोहित शर्मासमवेत त्याने 21 षटकात पहिल्या गड्यासाठी 74 धावांची भागीदारी केली. रोहितने या सत्रात बऱ्यापैकी फटकेबाजी केली. स्टार्कच्या गोलंदाजीवर त्याने स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार खेचला. ऑस्ट्रेलियन संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज कुहेनमनच्या चेंडूवर बॅकफूटवरून फटका मारण्याच्या नादात शर्मा झेलबाद झाला. लाबुसेनने याचा अचूक झेल टिपला. शर्माने 58 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 35 धावा जमवल्या. मात्र गिलला ऑस्ट्रेलियन गोलंदाजीसमोर फटकेबाजी करताना विशेष अवघड गेले नाही. गिलने 90 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. भारताचे शतक 29 व्या षटकात फलकावर लागले. तसेच गिलने पुजारासमवेत दुसऱ्या गड्यासाठी अर्धशतकी भागीदारी 88 चेंडूत उपाहारापूर्वी नोंदवली. ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज मर्फीचे चेंडू या खेळपट्टीवर संथपणे बऱ्याच प्रमाणात वळत होते. मर्फीच्या एका चेंडूवर गिलने मारलेला फटका यष्टीरक्षक कॅरेच्या हाताला लागून मागे गेल्याने ऑस्ट्रेलियाने गिलला बाद करण्याची ही संधी गमावली. गिलने आपल्या पहिल्या 40 धावा जलद घेतल्या पण त्यानंतर त्याला आपले अर्धशतक पूर्ण करण्यासाठी 10 धावा घेताना बरेच चेंडू खेळावे लागले.
गिलचे शतक
उपाहारानंतर भारतीय संघाने आपली स्थिती अधिकच मजबूत केली. चहापानावेळी भारताची स्थिती 2 बाद 188 अशी समाधानकारक होती. या कालावधीत शुभमन गिलने आपले कसोटीतील दुसरे शतक झळकवले. खेळाच्या दुसऱ्या सत्रात भारताने 59 धावांची भर घालताना पुजाराच्या रुपात दुसरा फलंदाज गमवला. अहमदाबादची खेळपट्टी दुसऱ्या सत्रातही फिरकीला अनुकूल होत असल्याने गिलने त्याचा फायदा अधिक घेतला. मात्र 70 च्या घरात गिल अधिक वेळ राहिला. दरम्यान त्याने 90 च्या घरात प्रवेश केल्यानंतर तो अधिक आत्मविश्वासाने फलंदाजी करत असल्याचे दिसून आले. नाथन लायनच्या चेंडूवर त्याने पॅडल स्कूपचा चौकार ठोकून आपले शतक पूर्ण केले. गिलने 194 चेंडूत 1 षटकार आणि 10 चौकारासह 100 झळकवल्या. गिलला पुजाराकडून चांगली साथ लाभली. या जोडीने दुसऱ्या गड्यासाठी 113 धावांची शतकी भागीदारी केली. 75 षटकानंतर दुसरा चेंडू बदलण्यात आला. यानंतरच गिलने आपले शतक पूर्ण केले. मात्र चहापानापूर्वीच्या शेवटच्या षटकात पुजारा मर्फीच्या गोलंदाजीवर पायचित झाला. त्याने 121 चेंडूत 3 चौकारासह 42 धावा जमवल्या. चहापानावेळी गिल 103 धावावर खेळत होता तर कोहलीने आपले खाते उघडले नव्हते.
खेळाच्या शेवटच्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराने गोलंदाजीत वारंवार बदल केला पण त्याला माफक यश मिळाले. गिल आणि कोहली यांनी तिसऱ्या गड्यासाठी 58 धावांची भागीदारी केली. लायनच्या गोलंदाजीवर गिल चुकीचा फटका मारण्याच्या नादात पायचित झाला. त्याने 235 चेंडूत 1 षटकार आणि 12 चौकारासह 128 धावा जमवल्या. भारताची स्थिती यावेळी 3 बाद 245 अशी होती. गिल बाद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दुसरा नवा चेंडू घेतला. कोहली आणि जडेजा यांनी खेळाच्या शेवटच्या सत्रात सावध फलंदाज करत संघाची अधिक पडझड होऊ दिली नाही. दिवसअखेर कोहली 128 चेंडूत 5 चौकारासह 59, तर जडेजा 54 चेंडूत 1 षटकारासह 16 धावांवर खेळत आहे. या जोडीने चौथ्या गड्यासाठी अभेद्य 44 धावांची भागीदारी केली आहे. कोहलीने आपले अर्धशतक 107 चेंडूत 5 चौकारांच्या मदतीने झळकवले. कोहलीचे कसोटीतील हे 29 वे अर्धशतक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये कोहलीचे 15 डावानंतरचे हे पहिले अर्धशतक असून त्याला फलंदाजीचा सूर मिळाल्याचे जाणवते. त्याचप्रमाणे कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 2000 धावांचा टप्पा ओलांडणारा चेतेश्वर पुजारा हा भारताचा चौथा फलंदाज ठरला आहे. या कसोटीतील खेळाच्या तिसऱ्या दिवसअखेर भारतीय संघ 191 धावांनी पिछाडीवर असून त्यांचे 7 गडी खेळावयाचे आहेत.
संक्षिप्त धावफलक : ऑस्ट्रेलिया प. डाव 167.2 षटकात सर्वबाद 480, भारत प. डाव 99 षटकात 3 बाद 289 (रोहित शर्मा 35, शुभमन गिल 128, चेतेश्वर पुजार 42, विराट कोहली खेळत आहे 59, रविंद्र जडेजा खेळत आहे 16, अवांतर 9, लायन 1-75, कुहेनमन 1-43, मर्फी 1-45).









