15 टन मदत साहित्यासह बचाव कर्मचाऱ्यांचे पथक रवाना : वैद्यकीय पथकाचाही समावेश
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
प्रलयंकारी भूकंपामुळे उद्ध्वस्त झालेल्या म्यानमारला सावरण्यासाठी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे. मोदी सरकारने विशेष मोहिमेंतर्गत म्यानमारला 15 टन मदत साहित्य आणि 80 बचाव कर्मचारी पाठवले असून त्याला ‘ऑपरेशन ब्रह्मा’ असे नाव देण्यात आले आहे. याचदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्यानमार पीपल्स गव्हर्नमेंटचे प्रमुख जनरल मिन आंग ल्हाईंग यांच्याशी चर्चा केली. जवळचा मित्र आणि शेजारी देश म्हणून भारत या कठीण काळात म्यानमारच्या जनतेसोबत खंबीरपणे उभा आहे, असे पाठबळ त्यांनी व्यक्त केले.
भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सोशल मीडियावर भारताच्या मदतीसंबंधीची माहिती दिली. म्यानमारच्या लोकांना तात्काळ मानवतावादी मदतीची पहिली खेप पाठवण्यात आली आहे. भारतीय हवाई दलाच्या सी-130 विमानात ब्लँकेट, ताडपत्री, स्वच्छता किट, स्लीपिंग बॅग्ज, सौर दिवे, अन्न पॅकेट्स आणि स्वयंपाकघरातील संच आहेत. विमानात शोध आणि बचाव पथकाव्यतिरिक्त एक वैद्यकीय पथक देखील असल्याचे त्यांनी सांगितले. भूकंपग्रस्त म्यानमारमधील परिस्थितीवर आम्ही सातत्याने लक्ष ठेवून पुढील मदत पाठवली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मोदींचा म्यानमारच्या लष्करप्रमुखांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी म्यानमारमधील लष्कराच्या नेतृत्वाखालील सरकारचे प्रमुख मिन आंग ल्हाईंग यांच्याशी संवाद साधला. देशात झालेल्या विनाशकारी भूकंपामुळे झालेल्या विध्वंसाला तोंड देण्याच्या त्यांच्या प्रयत्नांमध्ये भारत एकजुटीने उभा असल्याचे मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर दोघांमधील संवादाबाबतची माहिती दिली. भारत ‘ऑपरेशन ब्रह्मा’ अंतर्गत आपत्तीग्रस्त भागात आपत्ती मदत साहित्य, मानवतावादी मदत, शोध आणि बचाव पथके पाठवत असल्याचे त्यांनी संवादामध्ये स्पष्ट केले आहे. तसेच मी सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी प्रार्थना करतो. भारत सर्वतोपरी मदत करण्यास तयार आहे. यासंदर्भात आम्ही आमच्या अधिकाऱ्यांना तयार राहण्यास सांगितले आहे. तसेच, परराष्ट्र मंत्रालयाला म्यानमार आणि थायलंडच्या सरकारांशी संपर्कात राहण्याची सूचनाही पंतप्रधानांनी केली आहे.









