अतिरिक्त फिरकी गोलंदाज खेळवायचा की, वेगवान गोलंदाज हा भारतासमोर प्रश्न
वृत्तसंस्था/ दुबई
बुधवारी येथे होणाऱ्या यजमान संयुक्त अरब अमिरातीविऊद्धच्या (यूएई) आशिया चषक सामन्यात तिसरा फिरकी गोलंदाज खेळवायचा की, तज्ञ वेगवान गोलंदाजाला हा प्रश्न भारतासमोर असून पुरेसा समतोल आणणाऱ्या अष्टपैलू खेळाडूंना खेळविण्याचा यापूर्वी वापरलेला फॉर्म्युला पुन्हा एकदा वापरण्यावर भारताचा भर राहणार आहे.
पदभार स्वीकारल्यापासून मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी बहुकौशल्ये असलेल्या खेळाडूंवर भर दिला आहे, विशेषत: अशा खेळाडूंवर जे फलंदाजीची खोली वाढवू शकतात, जेणेकरून संघ 8 व्या क्रमांकापर्यंत धावा काढू शकेल. यूएईविऊद्धचा सामना 14 सप्टेंबर रोजी पाकिस्तानविऊद्ध होणाऱ्या मोठ्या सामन्याच्या दृष्टीने सराव असेल. या कथित कमकुवत संघाचा सामना करताना भारतीय संघ व्यवस्थापनाला स्पर्धेत सातत्याने मैदानात कसल्या प्रकारचा संघ उतरवायचा याची कल्पना येईल. यूएईचा विचार करता हा अनेक खेळाडूंसाठी सर्वांत मोठा सामना असेल. सहसदस्य देशाच्या क्रिकेटपटूच्या दृष्टीने जसप्रीत बुमराहचा सामना करणे किंवा शुभमन गिलला गोलंदाजी करणे ही सामान्य घटना नाही आणि आशिया चषक त्यांना उच्चभ्रू वातावरणाच्या जवळ आणतो.
भारतीय संघाचा विचार करता संजू सॅमसनला खेळवायचे की, जितेश शर्माला हे कोडे सध्या तरी सुटले आहे असे दिसते. कारण विदर्भाच्या यष्टीरक्षकाच्या फिनिशर म्हणून कौशल्याचे पारडे केरळच्या खेळाडूच्या वरच्या फळीतील धडाक्यापेक्षा भारी ठरल्याचे दिसते. शुभमन गिलने क्रमवारीत पुन्हा प्रवेश केल्याने निश्चितच रणनीतीमध्ये बदल करण्यास भाग पाडले आहे. कारण सॅमसन हा मनमोकळेपणे फटकेबाजी करणारा खेळाडू असूनही योग्य संघरचनेची गरज असल्याने त्याला बाहेर बसावे लागण्याची शक्यता आहे. सॅमसन हा वरच्या तीन स्थानांच्या पलीकडे विचारात घेता येण्याजोगा पर्याय नाही आणि गिल आणि अभिषेक शर्मा फलंदाजीची सुऊवात करणार असल्याने एकमेव तिसरा क्रमांक उपलब्ध होतो. परंतु तिलक वर्मा त्या स्थानावर अपवादात्मक ठरला असून आयसीसी टी-20 फलंदाजांच्या क्रमवारीत तो दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. कर्णधार सूर्यकुमार यादव तिसऱ्या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस येणे स्वाभाविक आहे.
त्यांच्या पाठोपाठ बहु-कुशल क्रिकेटपटू येतील. पाचव्या क्रमांकावर हार्दिक पंड्या येईल, जो सुरात असलेल्या दिवशी कोणत्याही आघाडीच्या वेगवान गोलंदाजाइतकाच चांगला वेगवान गोलंदाज ठरू शकतो आणि तो एक उत्तम फलंदाजही आहे. त्यानंतर येतो शिवम दुबे, जो संथ खेळपट्टीवरही फिरकी गोलंदाजीचा समाचार घेऊ शकतो. गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मॉर्केल यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे तो नेट सत्रांमध्ये अधिक मध्यमगती गोलंदाजी करत आहे. आरसीबीच्या पहिल्या आयपीएल विजेत्या हंगामात केलेल्या कामगिरीचा विचार करता सातव्या क्रमांकावर यष्टीरक्षक-फलंदाज जितेश हा परिपूर्ण बसतो. गंभीरने नेहमीच आठव्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची खोली पसंत केली आहे. परिणामी, अचूक मारा करणारा डावखुरा फिरकी गोलंदाज आणि उत्तम फलंदाज अक्षर पटेलला त्या स्थानावर स्थान मिळेल. जसप्रीत बुमराह आणि भारताचा सर्वांत यशस्वी टी-20 गोलंदाज अर्शदीप सिंग हे स्वाभाविक पर्याय आहेत, ज्यामुळे फक्त एकच स्थान शिल्लक राहते.
सप्टेंबरमध्ये आशिया चषक होत असल्याने दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या खेळपट्टीचे रूप हिरवेगार आणि ताजे असेल. मार्चमध्ये खेळपट्टी पूर्णपणे जीर्ण झालेली असते. त्या खेळपट्टीपेक्षा जास्त उसळी यावेळी मिळेल. 50 षटकांच्या सामन्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी अकरा खेळाडूंच्या संघात रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव आणि वऊण चक्रवर्ती अशा चार फिरकीपटूंची आवश्यकता होती. बुधवारी केवळ एकाच फिरकीपटूसाठी जागा उपलब्ध असू शकते. आंतरराष्ट्रीय पुनरागमनानंतर टी-20 मध्ये अभूतपूर्व कामगिरी करत आलेला वऊण चक्रवर्ती किंवा ज्याला उत्कृष्ट कौशल्य असूनही नेहमीच डावलले जाते त्या कुलदीप यादवची तिथे निवड होईल. सोमवारी भारताच्या सराव सत्रास संपूर्ण संघ उपस्थित होता. त्यावेळी अभिषेक, जो डावखुरा फिरकी गोलंदाज देखील आहे, तो बराच काळ गोलंदाजी करताना दिसला.
यूएईसाठी ही स्पर्धा कौशल्य दाखविण्याची एक उत्तम संधी आहे आणि अनुभवी प्रशिक्षक लालचंद राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली ते छाप पाडण्यास उत्सुक आहेत. ‘शारजा येथे झालेल्या तीन देशांच्या टी-20 स्पर्धेतून आमची तयारी चांगली झाली होती. एका सामन्यात पाकिस्तानचे पाच खेळाडू 100 पेक्षा कमी धावांत बाद झाले होते. आम्ही तो सामना संपवायला हवा होता’, असे राजपूत यांनी म्हटले आहे. भारताविऊद्ध, आम्हाला माहीत आहे की हा एक कठीण सामना आहे. पण जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम संघांविऊद्ध स्वत:ची चाचणी घेण्याची संधी देखील त्यातून मिळत आहे. हा एक कठीण सामना आहे, पण मी एक मुंबईकर आहे. माझे खेळाडू भारताला हा सामना सोपा जाऊ देणार नाहीत, असे ते म्हणाले.
संघ : भारत-सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, जितेश शर्मा, शिवम दुबे, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वऊण चक्रवर्ती, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग.
संयुक्त अरब अमिरात : मोहम्मद वसीम (कर्णधार), आलिशान शराफू, आर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पराशर, एथन डिसोझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीक मतिउल्ला खान, मोहम्मद फारूख, मोहम्मद जवादुल्ला, मोहम्मद जोहेब, राहुल चोप्रा, रोहिद खान, सिमरनजित सिंह, साउदी खान.
सामन्याची वेळ : रात्री 8 वा.









