वृत्तसंस्था/ कैरो (इजिप्त)
येथे झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक शॉर्टगन नेमबाजी स्पर्धेत पदकतक्त्यात भारताने संयुक्त तिसरे स्थान पटकाविताना एकमेव सुवर्णपदक मिळवले. या स्पर्धेत इटलीने 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्यपदकासह पहिले स्थान घेतले आहे.
या स्पर्धेत भारताचा नेमबाज पृथ्वीराज तोंडाइमनची वैयक्तिक गटात पाठोपाठ पदक मिळविण्याची संधी हुकली. पुरुषांच्या ट्रॅप वैयक्तिक नेमबाजीत पृथ्वीराजला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. चालू वर्षाच्या प्रारंभी डोहा येथे झालेल्या विश्व चषक नेमबाजी स्पर्धेत पृथ्वीराजने वैयक्तिक गटात पदक मिळविले होते. पण इजिप्तच्या स्पर्धेत गुरुवारी पृथ्वीराजला पात्र फेरीमध्ये नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले. या क्रीडा प्रकारात टोकीयो ऑलिंपिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता झेकचा नेमबाज जेरी लिपटेकने पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत सुवर्णपदक पटकाविले. तर महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत पोर्तुगालच्या मारिया बॅरोसने सुवर्णपदक मिळविले. पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीत भारताच्या संधूने 14 वे स्थान तर भोवनिशने 19 वे स्थान मिळविले. महिलांच्या ट्रॅक नेमबाजीत भारताच्या श्रेयासी सिंगने 20 वे तर राजेश्वरी कुमारीने 23 वे स्थान मिळविले. आता या स्पर्धेनंतर भारतीय नेमबाज पुढील आठवड्यात अझरबेजानमधील बाकू येथे सुरु होणाऱ्या आयएसएसएफच्या विश्वचषक रायफल आणि पिस्तुल नेमबाजीत भाग घेणार आहेत.









