यू-19 सॅफ फुटबॉल : डॅनी लैशरामची हॅट्ट्रिक, जाजोचे 2 गोल
वृत्तसंस्था/ युपिया, अरुणाचल प्रदेश
दक्षिण आशियाई फुटबॉल फेडरेशन (सॅफ) यू-19 चॅम्पियनशिपमध्ये भारतीय संघाने विजयी सलामी देताना लंकेचा 8-0 असा एकतर्फी धुव्वा उडविला. भारत हा या स्पर्धेचा विद्यमान विजेता आहे. गोल्डन ज्युबिली स्टेडियमवर झालेल्या या गट ब मधील सामन्यात भारताने पूर्ण वर्चस्व राखले होते. भारतातर्फे डॅनी मीतेई लैशरामने (26, 31, 50) हॅट्ट्रिक नेंदवली. या स्पर्धेतील ही पहिलीच हॅट्ट्रिक आहे. याशिवाय प्रशान जाजोने (17, 62) दोन, मोहम्मद अरबाश (40), ओमांग दोडम (48), कर्णधार सिंगामयुम शमी (81) यांनी प्रत्येकी एक गोल नोंदवला.
अरुणाचल प्रदेशमध्ये पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा होत असल्याने स्थानिक प्रेक्षकांनी त्याला मोठा प्रतिसाद दिला होता. अचूक पास, कौशल्यपूर्ण हालचाली, सततचा दबावाच्या जोरावर भारताने पूर्णपणे वर्चस्व गाजविले. लंकन खेळाडू फक्त भारतीय खेळाडूंचा पाठलाग करताना दिसत होते. भारतीय खेळाडूंनी लंकेला सतत दडपणाखाली ठेवत त्यांची बचावफळी विस्कळीत करून टाकली. 17 व्या मिनिटाला प्रशान जाजोने भारताचा पहिला गोल नोंदवल्यानंतर पूर्वार्धात चार गोल नोंदवले. उत्तरार्धात त्यात आणखी चार गोलांची भर घालत शानदार विजय नोंदवला.









