4-0 फरकाने मात, हरमनप्रीतचे 2 गोल
वृत्तसंस्था/ चेन्नई
कर्णधार हरमनप्रीत सिंगने नेंदवलेल्या दोन गोलांच्या बळावर भारताने येथे सुरू असलेल्या आशियाई चॅम्पियन्स करंडक हॉकी स्पर्धेत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर 4-0 असा एकतर्फी विजय मिळविला आणि राऊंड रॉबिन फेरीअखेर 13 गुणांसह अव्वल स्थान मिळविले. अन्य सामन्यात मलेशियाने दक्षिण कोरियाचा एकमेव गोलने पराभव करीत 12 गुणांसह दुसरे स्थान मिळविले तर जपानने चीनवर 2-1 अशा गोलफरकाने मात केली. पाक संघ पराभूत झाल्याने जपानला उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली असून पाकचे आव्हान समाप्त झाले आहे.
सामन्याआधीच भारताने या स्पर्धेच्या उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले होते. भारताने आत्मविश्वासाने खेळ करीत या सामन्यात पाकवर पूर्ण वर्चस्व राखले. पाकला मात्र धावपळ करावी लागत होती. भारताला मिळालेल्या पहिल्या पेनल्टी कॉर्नरवर हरमनप्रीत सिंगने पाकचा गोलरक्षक अकमल हुसेनच्या डाव्या बाजूला जबरदस्त फ्लिक करीत गोल नोंदवला. पहिले सत्र संपण्याच्या ठोक्याला त्याने हा गोल नोंदवला. 23 व्या मिनिटाला भारताला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळाला. यावेळी जबरदस्त ड्रॅगफ्लिक करीत हरमनप्रीतने अकमलच्या पायातून चेंडू गोलपोस्टमध्ये मारला.
भारताने सतत आक्रमण करीत पाकवर दबाव कायम ठेवत 30 व्या मिनिटाला लागोपाठ दोन पेनल्टी कॉर्नर्स मिळविले. पण या दोन्ही वेळेस हरमनप्रीतला यश मिळू शकले नाही. यातील दुसऱ्या कॉर्नरसाठी भारताने व्हिडिओ रेफरल घेतला. चेंडू गोलपोस्टच्या दिशेने जात असताना पाकिस्तानी खेळाडूने पायाने चेंडू अडवल्याचा भारताचा दावा होता. पण रेफरीनी भारताचे अपील फेटाळून लावले. मध्यंतराला भारताने 2-0 अशी आघाडी राखली होती.
तिसऱ्या सत्रातील सहाव्या मिनिटाला भारताने तिसरा पेनल्टी कॉर्नर मिळविला. यावेळी जुगराज सिंगने कोणतीही चूक न करता गोल नोंदवत भारताची आघाडी 3-0 अशी केली. 43 व्या मिनिटाला पाकला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्यांचा हा दुसरा पेनल्टी कॉर्नर होता. पण त्याचा त्यांना लाभ घेता आला नाही. 55 व्या मिनिटाला आकाशदीपने मनदीप सिंगकडून मिळालेल्या चेंडूला डिफ्लेक्ट करीत मैदानी गोल नोंदवला. भारताने या सामन्यात एकूण पाच पेनल्टी कॉर्नर्स मिळविले आणि त्यापैकी तीनवर गोल नोंदवण्यात यश मिळविले.
त्याआधी झालेल्या एका लढतीत मलेशियाने दक्षिण कोरियाचा एकमेव गोलने पराभव करून राऊंड रॉबिन फेरीची विजयी सांगता केली. पाच सामन्यातील त्यांचा हा चौथा विजय असून 12 गुणांसह त्यांनी भारतानंतर दुसरे स्थान मिळविले. मलेशिया व कोरिया दोघांनीही याआधीच उपांत्य फेरी गाठली असल्याने या निकालाचा त्यावर काही परिणाम झाला नाही. 22 व्या मिनिटाला अबू कमाल अझराइने मलेशियाचा एकमेव गोल नोंदवला. त्यांनी ही आघाडी अखेरपर्यंत कायम राखत विजय साकार केला.
दुसऱ्या एका सामन्यात जपानने चीनचा 2-1 असा पराभव केला. पाकिस्तान भारताकडून मोठ्या फरकाने पराभूत झाल्याने जपानला या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळण्याची संधी मिळाली आहे.
भारत-जपान, मलेशिया-द.कोरिया यांच्यात उपांत्य लढती
दरम्यान, भारतीय संघाने पाकला नमवत 13 गुणासह अव्वलस्थान कायम राखले. आता. दि. 11 रोजी भारत व जपान यांच्यात उपांत्य सामना होईल. तर दुसरीकडे मलेशिया व द. कोरिया यांच्यात दुसरी उपांत्य लढत होईल. यानंतर दि. 12 रोजी अंतिम सामना रंगणार आहे.
भारत अपराजित
मागील सामन्यात गतविजेत्या आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी चॅम्पियन दक्षिण कोरियाचा 3-2 असा पराभव करून भारताने उपांत्य फेरीत आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने आपल्या मोहिमेची सुरुवात चीनविरुद्ध 7-2 असा आणि जपानविरुद्ध 1-1 अशी बरोबरी साधून केली. त्यांनी त्यांच्या तिसऱ्या सामन्यात मलेशियाचा 5-0 असा पराभव केला. यानंतर पाकला नमवत भारतीय संघाने गुणतालिकेत आपले अव्वलस्थान पटकावले. या स्पर्धेत आतापर्यंत भारत हा एकमेव अपराजित संघ आहे.









