वृत्तसंस्था/ रांची
येथे सुरू असलेल्या महिलांच्या आशियाई चॅम्पियन करंडक हॉकी स्पर्धेतील झालेल्या सामन्यात भारतीय महिला हॉकी संघाने मलेशियाचा 5-0 अशा गोल फरकाने एकतर्फी पराभव केला. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडूंनी आपल्या दर्जेदार खेळाचे दर्शन घडविले.
या स्पर्धेतील गेल्या शुक्रवारी झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने थायलंडचे आव्हान 7-1 अशा गोलफरकाने संपुष्टात आणले होते. भारतीय महिला हॉकी संघाने या स्पर्धेत सलग दुसरा विजय मिळवून आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. मलेशिया विरूद्धच्या सामन्यात भारतीय संघातील आघाडी आणि मध्य फळीतील खेळाडूंनी योग्य समन्वय राखत मलेशियाची बचाव फळी पूर्ण खिळखिळी केली. या सामन्यात भारतीय संघातील वंदना कटारियाने 2 गोल तर संगीता कुमारी, ज्योती आणि लालरेमसियामी यांनी प्रत्येकी 1 गोल केला. सामना सुरू झाल्यानंतर 7 व्या मिनिटाला भारताचे खाते वंदनाने उघडले. 21 व्या मिनिटाला वंदनाने संघाचा आणि वैयक्तिक दुसरा गोल केला. संगीता कुमारीने 28 व्या तर लालरेमसियामीने 29 व्या मिनिटाला असे 2 गोल करून मध्यंतरापूर्वीच आपल्या संघाला 4-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धातील खेळाला प्रारंभ झाल्यानंतर भारताचा 5 वा गोल ज्योतीने 38 व्या मिनिटाला नोंदवून मलेशियाचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले. या सामन्यात भारतीय संघाने पेनल्टी स्ट्रोकवरील गोल करण्याची संधी गमावल्याने त्यांना हा सामना 6-0 असा जिंकता आला नाही.
या स्पर्धेतील झालेल्या अन्य एका सामन्यात चीनने थायलंडचा 6-0 अशा गोल फरकाने पराभव करत आपला पहिला विजय नोंदविला. चीनला या स्पर्धेतील आपल्या सलामीच्या सामन्यात दक्षिण कोरियाकडून हार पत्करावी लागली होती. त्याचप्रमाणे अन्य एका सामन्यात जपानने या स्पर्धेतील आपला सलग दुसरा विजय नोंदविताना दक्षिण कोरियाचे आव्हान 4-0 असे एकतर्फी संपुष्टात आणले. 2013, 2016 आणि 2018 साली झालेल्या या स्पर्धेत भारताने अंतिम फेरी गाठली होती. तर 2016 साली भारतीय महिला हॉकी संघाने ही स्पर्धा जिंकताना अंतिम सामन्यात चीनचा पराभव केला होता.









