दुसऱया वनडेत 5 गडी राखून सहज बाजी, शार्दुल ठाकुरचे 38 धावात 3 बळी
हरारे / वृत्तसंस्था
फलंदाजीत संजू सॅमसन (नाबाद 43) व गोलंदाजीत शार्दुल ठाकुर (38 धावात 3 बळी) यांनी रण गाजवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने येथील दुसऱया वनडेत यजमान झिम्बाब्वे संघाचा 5 गडी राखून धुव्वा उडवला आणि 3 सामन्यांची ही मालिका 2-0 अशा एकतर्फी फरकाने जिंकली. प्रारंभी झिम्बाब्वेला 38.1 षटकात सर्वबाद 161 अशा किरकोळ धावसंख्येवर गुंडाळल्यानंतर भारताने 25.4 षटकात 5 बाद 167 धावांसह सहज विजय संपादन केला. झिम्बाब्वेतर्फे सीन विल्यम्सने सर्वाधिक 42 धावांचे योगदान दिले.

पहिल्या वनडेप्रमाणेच ही लढतही एकतर्फी झाली. पण, झिम्बाब्वेला सर्वबाद 161 धावांवर समाधान मानावे लागल्यानंतर केएल राहुलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला देखील फलंदाजीचा फारसा सराव मिळणार नाही, असेच संकेत होते. अपवाद म्हणून मध्यफळीतील पडझडीमुळे भारताला विजयासाठी थोडीफार प्रतीक्षा जरुर करावी लागली. पण, तरीही यजमान संघ भारताला अगदीच अडचणीत आणू शकला नाही.
प्रारंभी, दीपक चहरच्या गैरहजेरीत शार्दुल ठाकुरने 3 बळी घेत झिम्बाब्वेच्या डावाला जोरदार सुरुंग लावला आणि यातून ते अखेरपर्यंत सावरु शकले नाहीत. शार्दुलने 12 व्या षटकात यजमान संघाला दोन धक्के दिले. त्यानंतर शिखर धवन व शुभमन गिल यांनी पहिल्या वनडेची पुनरावृत्ती करत येथेही जोरदार वर्चस्व गाजवले. धवनने 21 चेंडूत 33 तर तिसऱया स्थानावर फलंदाजीला उतरलेल्या शुभमन गिलने 34 चेंडूत 33 धावांचे योगदान दिले. धवनच्या साथीला केएल राहुल सलामीला उतरला. पण, त्याला एका धावेवर तंबूत परतावे लागले.
ल्यूक जाँग्वेने (2-33) इशान किशन (6) व सेट झालेल्या शुभमन गिलला लागोपाठ षटकात बाद केले आणि यानंतर भारताची 4 बाद 97 अशी स्थिती होती. मात्र, 36 षटकात केवळ 65 धावांची आवश्यकता असल्याने दीपक हुडा व सॅमसन यांनी संयमी फलंदाजीवर भर देत 56 धावा जोडल्या आणि विजय सुनिश्चित केला. विजयासाठी 9 धावांची गरज असताना हुडाला रझाने त्रिफळाचीत केले. पण, सॅमसनने 26 व्या षटकात लेगस्पिनर इनोसन्ट काईयाला षटकार खेचत भारताच्या सलग दुसऱया विजयावर शिक्कामोर्तब केले.
संक्षिप्त धावफलक
झिम्बाब्वे ः 38.1 षटकात सर्वबाद 161 (सीन विल्यम्स 42 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 42, रियान बर्ल 47 चेंडूत 3 चौकार, 1 षटकारासह 39. अवांतर 18. शार्दुल ठाकुर 7 षटकात 3-38, सिराज, प्रसिद्ध कृष्णा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, दीपक हुडा प्रत्येकी 1 बळी).
भारत ः 25.4 षटकात 5 बाद 167 (संजू सॅमसन 39 चेंडूत 3 चौकार, 4 षटकारांसह नाबाद 43, शिखर धवन 21 चेंडूत 4 चौकारांसह 33, शुभमन गिल 34 चेंडूत 6 चौकारांसह 33, दीपक हुडा 36 चेंडूत 3 चौकारांसह 25. अवांतर 20. ल्यूक जाँग्वे 4 षटकात 2-33, चिवंगा, व्हिक्टर, सिकंदर रझा प्रत्येकी 1 बळी)
उभय संघातील तिसरा व शेवटचा सामना उद्या सोमवार दि. 22 रोजी होईल.









