एएफसी फुटसाल आशिया चषक पात्रता फेरी
वृत्तसंस्था / अर्डीया (कुवेत)
येथे सुरू असलेल्या 2026 च्या एएफसी फुटसाल आशिया चषक पात्र फेरीच्या अ गटातील दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 10-1 असा दणदणीत पराभव केला. या सामन्यात भारतीय संघाची कामगिरी अत्यंत निकृष्ट झाली. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत ऑस्ट्रेलियाने भारतावर 6-1 अशी आघाडी मिळविली होती. सामना सुरू झाल्यानंतर केवळ पाचच मिनिटांत ऑस्ट्रेलियाने आपली पकड मजबूत करण्यास प्रारंभ केला. ऑस्ट्रेलियाच्या आघाडी फळीतील खेळाडूंनी पाचव्या मिनिटाला दोन गोल केले. स्कॉट रोगेन आणि मिचेल कोटा यांनी 1 गोल नोंदविले तर 11 व्या मिनिटाला कोरी सिव्हेलने ऑस्ट्रेलियाचा तिसरा गोल केला. 15 व्या मिनिटाला भारताचा एकमेव गोल सिऑन डिसोजाने नोंदविला. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या आघाडी फळीने केवळ तीन मिनिटांत आणखी तीन गोल केले. टिलेर गार्नर, जॉर्डन गुरेरो आणि वेड गिव्होनेली यांनी हे गोल केले. मध्यंतरानंतरच्या पहिल्याच मिनिटाला इचेन डिमेलोने ऑस्ट्रेलियाचा सातवा गोल नोंदविला. ऑस्ट्रेलियाचा आठवा गोल 32 व्या मिनिटाला कॉर्डीने केला. सिवेलने यासामन्यातील आपला दुसरा गोल नोंदविला. गुरेरोने ऑस्ट्रेलियाचा दहावा गोल नोंदवून भारताचे आव्हान एकतर्फी संपुष्टात आणले.
या स्पर्धेत भारताची स्थिती सध्या अवघड असून आता कुवेत आणि मंगोलिया यांच्यातील सामन्याच्या निर्णयावर भारताचे या स्पर्धेतील भवितव्य अवलंबून राहील. या सामन्यात कुवेतने विजय मिळविला किंवा हा सामना बरोबरीत राहिला तर मात्र भारताचे या स्पधेतील आव्हान संपुष्टात येईल. भारताचा या स्पर्धेतील प्राथमिक गटातील सामना मंगोलियाबरोबर बुधवारी होत आहे.









