वृत्तसंस्था/ अँटवर्प
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या प्रो हॉकी लीग स्पर्धेतील शनिवारी झालेल्या पहिल्या सामन्यात पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक पी.आर. श्रीजेशने बेल्जियमचा पेनल्टी स्ट्रोक थोपविल्याने भारतीय संघाने ऑलिम्पिक चॅम्पियन्स बेल्जियमला 5-4 अशा गोलफरकाने पराभवाचा धक्का दिला.
भारतीय हॉकी संघाने हा सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये जिंकला. या सामन्यात शेवटची आठ मिनिटे बाकी असताना बेल्जियमने भारतावर 3-1 अशी आघाडी मिळविली होती. पण त्यानंतर भारताने शेवटच्या आठ मिनिटांच्या कालावधीत दर्जेदार आणि आक्रमक खेळ करत आणखी दोन गोल नोंदविल्याने निर्धारित वेळेत हा सामना 3-3 असा बरोबरीत राहिला. त्यानंतर पंचांनी पेनल्टी शूटआऊटचा अवलंब केला. पेनल्टी शूटआऊटमध्ये गोलरक्षक श्रीजेशने बेल्जियमच्या निकोलास डी केर्पेलचा फटका अडविल्याने दोन्ही संघ 4-4 असे बरोबरीत राहिले त्यानंतर आकाशदीप सिंगने पेनल्टी शूटआऊटमधील शेवटच्या फटक्यावर गोल नोंदविल्याने भारताने या सामन्यात बेल्जियमचा 5-4 अशा गोलफरकाने पराभव केला.
या सामन्यात 18 व्या मिनिटाला समशेर सिंगने भारताचे खाते उघडले. 21 व्या मिनिटाला सेंड्रिक चार्लेरने बेल्जियमला बरोबरी साधून दिली. सामन्याच्या दुसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांना प्रत्येकी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत होते. 36 व्या मिनिटाला बेल्जियमचा दुसरा गोल सिमॉन गोनॉल्डने नोंदविला. यानंतर काही मिनिटातच बेल्जियमने आपला तिसरा गोल पेनल्टी कॉर्नरवर नोंदवित भारतावर 3-1 अशी आघाडी मिळविली होती. बेल्जियमचा हा तिसरा गोल केर्पेलने केला. सामना संपण्यास आठ मिनिटे बाकी असताना भारताला आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळाला. हरमनप्रित सिंगने या पेनल्टी कॉर्नरवर भारताचा दुसरा गोल केला. भारताच्या जर्मनप्रित सिंगने शॉर्ट कॉर्नरवर भारताचा तिसरा गोल नोंदवून निर्धारित वेळेत आपल्या संघाला 3-3 अशी बरोबरी साधून दिली होती.









