लष्करी संघटनेत सहभागी होण्यावर स्थायी प्रतिनिधी ज्युलियन स्मिथ यांचे मोठे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, वॉशिंग्टन
40 देशांची लष्करी संघटना असलेल्या नाटोमध्ये सहभागी होण्याची ऑफर भारताला मिळाली आहे. नाटोमध्ये भारतासाठी दरवाजे खुले असल्याचे अमेरिकेचे राजदूत ज्युलियन स्मिथ यांनी म्हटले आहे. भारताला त्यात रस असेल तर नाटो पूर्णपणे तयार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 4 आणि 5 एप्रिल रोजी ब्रुसेल्समध्ये नाटो देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी स्मिथ यांनी दिलेल्या ऑफरची सध्या जागतिक स्तरावर बरीच चर्चा सुरू आहे.
नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनच्या (नाटो) एका वरिष्ठ अधिकाऱ्याने भारताच्या संघटनेतील सहभागाबाबत मोठी माहिती दिली आहे. अमेरिकेचे स्थायी प्रतिनिधी ज्युलियन स्मिथ यांनी याबाबत पहिली सार्वजनिक टिप्पणी केली आहे. भारतासोबत अधिक चर्चेसाठी संघटना तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रसारमाध्यमांशी बोलताना स्मिथ यांनी उघडपणे हे भाष्य केले असून त्यांनी यापूर्वीच्या काही घडामोडींचाही दाखला दिला आहे. दिल्ली येथे आयोजित वार्षिक रायसीना संवादाच्या वेळी नाटो आणि काही भारतीय अधिकाऱ्यांमध्ये अनौपचारिक चर्चा झाल्याचे ते म्हणाले.
‘रायसीना डायलॉग्स’मध्ये चर्चा
नाटो निश्चितपणे भारताशी एक सहयोगी म्हणून जवळ येऊ इच्छित असल्याचे ज्युलियन स्मिथ यांनी म्हटले आहे. भारताला हा संदेश यापूर्वीही देण्यात आला होता. सध्या नाटोमध्ये 40 देश आहेत. 4 आणि 5 एप्रिल रोजी ब्रुसेल्समध्ये नाटो देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया आणि जपानलाही सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. भारतीय पॅसिफिक प्रदेशातील हे चार देश या महाआघाडीचे औपचारिक भागीदार आहेत.
सध्या भारताला बैठकीचे निमंत्रण नाही
ब्रुसेल्समध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी आणि संघटनेचा सदस्य होण्यासाठी भारतालाही आमंत्रित करण्यात आले आहे का? अशी विचारला केली असता स्मिथ यांनी ‘भविष्यात नाटोमध्ये सामील होण्यासाठी भारतासाठी दरवाजे खुले आहेत. पण भारतालाही त्यात रस असायला हवा. जोपर्यंत भारताचे हित कळत नाही तोपर्यंत भारताला मंत्रीस्तरीय बैठकीचे निमंत्रण मिळू शकत नाही, असे स्पष्ट केले. मुक्त आणि मुक्त इंडो-पॅसिफिक प्रदेश सुनिश्चित करण्यात भारताची महत्त्वाची भूमिका आहे, असा विश्वासही स्मिथ यांनी व्यक्त केला.
रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची टिप्पणी
गेल्या वर्षभरापासून रशिया-युव्रेन युद्ध सुरू असतानाच ज्युलियन स्मिथ यांनी भारताच्या नाटोमधील समावेशाबाबत टिप्पणी केली आहे. आसियानपासून भारतापर्यंत चीनच्या आक्रमकतेची चर्चा सुरू आहे. चीनच्या आक्रमकतेचा परिणाम म्हणजे युरोपपासून इंडो-पॅसिफिक प्रदेशापर्यंत मोठे भू-राजकीय बदल होताना दिसत आहेत. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी युव्रेन युद्धासाठी नाटोला जबाबदार धरले आहे. मात्र, नाटोने हे मान्य करण्यास नकार दिला आहे. नाटोमध्ये सामील होण्यासाठी भारताला अनेकवेळा विचारणा केली जात आहे परंतु आजपर्यंत भारत सरकारने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. आता आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा नावलौकिक वाढत असतानाच पुन्हा बलाढ्या अमेरिकेने यात पुढाकार घेतल्याने भारत कोणता पवित्रा घेतो हे पहावे लागेल.









