वृत्तसंस्था/ इंधोव्हेन (नेदरलँड्स)
आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या 2022-23 च्या हॉकी प्रो-लिग स्पर्धेत रविवारी येथे खेळविण्यात आलेल्या चुरशीच्या सामन्यात भारताने अर्जेंटिनाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव करुन गुणतक्त्यात आघाडीचे स्थान मिळवले आहे. या विजयाने भारताने या स्पर्धेतील आपली मोहिम यशस्वीरित्या संपुष्टात आणली.
या स्पर्धेत गेल्या शनिवारी झालेल्या सामन्यात यजमान नेदरलँड्सकडून भारताला 3-2 अशा गोलफरकाने पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान रविवारच्या सामन्यात मिळविलेल्या विजयामुळे भारताने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 30 गुणासह आघाडीचे स्थान पटकाविले आहे. रविवारच्या सामन्यात भारताला 3 गुण मिळले.
रविवारच्या सामन्यात भारतातर्फे आकाशदीप सिंगने 2 ऱ्या मिनिटाला तर सुखजित सिंगने 14 व्या मिनिटाला गोल नोंदविले. अर्जेंटिनातर्फे एकमेव गोल 58 व्या मिनिटाला लुकास टोस्केनीने केला.
या सामन्यात भारताने पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत 2 गोल करुन अर्जेंटिनावर भक्कम आघाडी घेतली होती. सामना सुरु झाल्यानंतर दुसऱ्याच मिनिटाला भारतीय संघातील आघडी फळीत खेळणारा अनुभवी हुकमी स्ट्रायकर आकाशदीप सिंगने अर्जेंटिनाच्या गोलरक्षकाला हुलकावणी देत भारताचे खाते उघडले. त्यानंतर अर्जेंटिनाने पुढील 10 मिनिटांच्या कालावधीत आक्रमक आणि वेगवान खेळावर भर दिला पण भारताच्या बचावफळीने अर्जेंटिनाला गोल करण्यापासून रोखले. 14 व्या मिनिटाला भारताचा दुसरा गोल सुखजित सिंगने केला. विवेक सागर प्रसादच्या पासवर सुखजित सिंगने भारताची आघाडी वाढविली. या सामन्यातील दुसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत कार्ति सेल्व्हम, आकाशदीप आणि मनदीपसिंग यांनी गोल करण्यासाठी प्रयत्न केले. पण त्यांना यश मिळू शकले नाही. सामन्याच्या तिसऱ्या 15 मिनिटांच्या कालावधीत भारतीय खेळाडुंनी संघाची आघाडी वाढविण्याची संधी गमावली. या कालावधीत अर्जेंटिनाला 2 पेनल्टी कॉनर्स मिळाले. पण भारताच्या गोलरक्षकाने भक्कम गोलरक्षण करुन अर्जेंटिनाला गोल करण्यापासून रोखले. शेवटच्या 15 मिनिटांच्या कालावधीतील केवळ 2 मिनिटे बाकी असताना म्हणजेच सामन्यातील 58 व्या मिनिटाला लुकास टोस्केनीने अर्जेंटिनाचे खाते उघडले. या सामन्यातील शेवटच्या 2 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांनी आक्रमक खेळ केल्याने कदाचित हा सामना बरोबरीत राहिल असे वाटत होते. पण भारतीय बचावफळी व गोलरक्षक श्रीजेश यांच्या शानदार कामगिरीमुळे भारताने हा सामना 2-1 अशा गोलफरकाने जिंकून 2022-23 च्या हॉकी प्रो-लिग हंगामाची यशस्वी सांगता केली.









