बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिप
वृत्तसंस्था/किंगडाव, चीन
भारताच्या बॅडमिंटनपटूंनी झुंजार खेळ केला, पण त्यांना बॅडमिंटन आशिया मिश्र सांघिक चॅम्पियनशिपमध्ये गट ड मधील दुसऱ्या लढतीत दक्षिण कोरियाकडून 2-3 असा निसटता पराभव स्वीकारावा लागल्याने गटात दुसरे स्थान मिळाले. मात्र भारताने याआधीच उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळविले आहे. बुधवारी पहिल्या लढतीत मकावला 5-0 असे एकतर्फी नमवित शानदार सुरुवात केली होती. कोरियाविरुद्धही त्यांनी ही चमक कायम राखली होती. पण कडवी झुंज देऊनही भारताला अखेर पराभव स्वीकारावा लागला. 2-2 अशा बरोबरीनंतर पुरुष दुहेरीच्या निर्णायक सामन्यात एमआर अर्जुन व सात्विकसाईराज यांना जिन याँग व एनए सुंग स्यूंग यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. मिश्र दुहेरीत ध्रुव कपिला-तनिशा क्रॅस्टो यांना 21-11, 12-21, 15-21 असा पराभव स्वीकारावा लागला. भारताची अव्वल मानांकित मालविका बनसोडलाही महिला एकेरीच्या सामन्यात सिम यु जिनकडून 9-21, 10-21 असा केवळ 27 मिनिटात पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईच्या सतीश करुणाकरनने मात्र भारताचे आव्हान जिवंत ठेवताना चो जीओनीओपवर 17-21, 21-18, 21-19 अशी संघर्षपूर्ण मात केली. त्यानंतर महिला दुहेरीत त्रीसा जॉली गायत्री गोपीचंद यांनी किम मिन जी व किम यु जुंग यांना 19-21, 21-16, 21-11 असे हरविले.









