शिंदे- भाजप सरकारने तुमची स्माईल अँबेसिडर म्हणून नियुक्ती झाली हे चांगलंच झालं पण याच भाजपाने त्यांचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिशी घालत देशाच्या कुस्तीपटूंचं हसू हिरावून घेतले असल्याचा संदेश राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रवक्ते क्लाईड क्रॅस्टो यांनी सचिन तेंडुलकर याला दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सरकारकडून भारताचा सर्वात लोकप्रिय क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरची ‘स्माइल अँबेसिडर’ म्हणून नियुक्ती केली. राज्यात मुख स्वच्छता अभियान राबवण्यासाठी आणि मुखाच्या स्वच्छते संदर्भात जनजागृती करण्यासाठी या अभियानाचा ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर आपल्या ट्विटमध्ये क्लाईड क्रॅस्टो यांनी तेंडूलकरला हा उपरोधिक टोला हाणला आहे.
या नियुक्तीनंतर आता राजकिय प्रतिक्रिया उमटत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी आपल्या ट्विटद्वारे सचिन तेंडुलकरला उद्देशून लिहीलं आहे की, “प्रिय सचिन, हे ऐकून आनंद झाला की भाजपच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने राज्याच्या ‘स्वच्छ मुख अभियान’साठी ‘स्माइल अँबेसिडर’ म्हणून तुझी नियुक्ती केली आहे. पण, तुला माहितीय का, याच भाजपाने त्यांचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांना पाठिशी घालत देशाच्या कुस्तीपटूंचं हसू हिरावून घेतलं आहे.” असं लिहिले आहे.
पुढे लिहीताना क्रास्टो यांनी “सचिन, आपले कुस्तीगीर न्याय मागत आहेत…पण भाजपा त्यांच्या खासदाराला वाचवण्यासाठी कुस्तीगीरांच्या आंदोलनाकडे डोळेझाक करत आहे. जसा तू आमचा अभिमान आहेस, तशाच आपल्या देशातील महिला कुस्तीपटूही आमचा अभिमान आहेत. एक खेळाडू म्हणून तू तुझ्या बांधवांना पाठिंबा दिला पाहिजेस. हे आपलं कर्तव्य असून आम्हाला आशा आहे की, तू यावर बोलशील आणि आपल्या कुस्तीपटूंचा ‘स्माइल अँबेसिडर’ होशील.” असे आवाहन त्यांनी सचिन तेंडूलकरला केले आहे.