अंतिम फेरीत पाकवर 5-3 गोलफरकाने मात, अरैजीतचे हॅट्ट्रिकसह चार गोल, जपानला तिसरे स्थान
वृत्तसंस्था/ मस्कत, ओमान
अरैजीत सिंग हुंदालने नोंदवलेल्या चार गोलांच्या बळावर भारताच्या कनिष्ठ पुरुष हॉकी संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5-3 अशा गोलफरकाने पराभव करून पाचव्यांदा कनिष्ठ आशिया चषक पटकावला. मागील वर्षीही भारताने ही स्पर्धा जिंकली होती. अन्य एका सामन्यात जपानने मलेशियाचा 2-1 असा पराभव करून तिसरे स्थान मिळविले. भारताचे हे एकूण पाचवे जेतेपद असून यापूर्वी 2004, 2008, 2015, 2023 यावर्षी स्पर्धेचे अजिंक्यपद मिळविले होते. 2021 मध्ये कोरोना महामारीच्या कारणास्तव ही स्पर्धा घेण्यात आली नव्हती. अरैजीतने तीन पेनल्टी कॉर्नर्सवर चौथ्या, 18 व्या व 54 व्या मिनिटाला गोल नोंदवले तर 47 व्या मिनिटाला त्याने मैदानी गोल नोंदवला. याशिवाय दिलराज सिंगने 19 व्या मिनिटाला एक गोल केला. पाकतर्फे सुफीयान खानने 30 व 39 व्या मिनिटाला असे दोन गोल पेनल्टी कॉर्नर्सवर नोंदवले तर हन्नान शाहिदने तिसऱ्याच मिनिटाला मैदानी गोल नोंदवला होता.
भारत व पाकिस्तान दोन्ही संघांनी या सामन्यात तोडीस तोड खेळ केल्याने त्यांच्यात फारसा फरक दिसत नव्हता. पहिल्या सत्रात पाकने बॉल पझेशनसाठी खूप संघर्ष केला. या सत्रातील वैशिष्ट्या म्हणजे दोन्ही संघांकडून आपल्या सहकाऱ्यांना हवेतून पास दिले जात होते. पाकनेच सर्वप्रथम यश मिळविले. तिसऱ्याच मिनिटाला शाहिदने मैदानी गोल करून पाकला आघाडी मिळवून दिली. पण काही सेकंदानंतरच भारताने पेनल्टी कॉर्नर मिळविला आणि अरैजीतने जबरदस्त ड्रॅगफ्लिकवर गोल नोंदवून भारताला बरोबरी साधून दिली.
दुसऱ्या सत्रात भारताने खेळ व वेग उंचावला आणि 18 व्या मिनिटाला दुसरा पेनल्टी कॉर्नर मिळविला. यावेळी अरैजीतने अचूक गोल नोंदवत भारताला 2-1 असे आघाडीवर नेले. एका मिनिटानंतर दिलराज सिंगने शानदार मैदानी गोल करीत ही आघाडी 3-1 अशी केली. मात्र पाकने ही आघाडी कमी करण्यात यश मिळविले. 30 व्या मिनिटला पेनल्टी कॉर्नरवर सुफियानने हा गोल नोंदवला. मध्यंतरानंतर पाकने भारतापेक्षा थोडी सरस कामगिरी केली आणि 39 व्या मिनिटाला त्यांनी आणखी एका पेनल्टी कॉर्नरवर गोल नोंदवून बरोबरी साधली. सुफियाननेच हाही गोल केला. 47 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर अरैजीतने मारलेला फटका पाकचा गोलरक्षक मुहम्मद जन्जुआने अचूक थोपवला.
मात्र अरैजीतने हॅट्ट्रिक पूर्ण करण्यास वेळ दवडला नाही. काही सेकंदानंतरच त्याने शानदार मैदानी गोल करीत भारताला पुन्हा 4-1 अशी आघाडी मिळवून दिली. शेवटच्या दहा मिनिटांत भारताने पाकवर दबाव वाढवला आणि काही पेनल्टी कॉर्नर्सही मिळविले. 54 व्या मिनिटाला अरैजीतने पेनल्टी कॉर्नरवर थोडासा बदल करीत संघाचा पाचवा गोल नोंदवून भारताचे जेतेपदही निश्चित केले.









