वृत्तसंस्था/ केपटाऊन
रविवारी येथे झालेल्या सामन्यात नेदरलँड्सने भारतीय पुरूष हॉकी संघाचा 5-1 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. भारतीय पुरूष हॉकी संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा पराभवाने समाप्त झाला.
भारत आणि नेदरलँड्स यांच्यातील सामन्यात नेदरलँड्सने सुरूवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळ करत भारतीय बचावफळीवर दडपण आणण्यात यश मिळविले. 10 व्या मिनिटाला नेदरलँड्सचे खाते जिप जेनसनने उघडले. 16 व्या मिनिटाला नेदरलँड्सचा दुसरा गोल ड्युको तेलजेनकॅम्पने केला. 21 व्या मिनिटाला हुडेमेकर्सने नेदरलँड्सचा तिसरा गोल केला. 28 व्या मिनिटाला जेनसनने संघाचा चौथा तर वैयक्तिक दुसरा गोल नोंदविला. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत नेदरलँड्सने भारतावर 4-0 अशी आघाडी मिळविली होती. नेदरलँड्सचा पाचवा गोल कोएन बीजेनने 35 व्या मिनिटाला नोंदविला. भारतातर्फे एकमेव गोल अभिषेकने 39 व्या मिनिटाला केला. या सामन्यात भारतीय संघाने पेनल्टी कॉनर्स अधिक गमाविल्याने त्यांना अधिक गोल नोंदविता आले नाहीत. नेदरलँड्सची बचावफळी भक्कम असल्याने भारताच्या चढाया फोल ठरल्या. नेदरलँड्सने अखेर हा सामना एकतर्फी जिंकला.









