वृत्तसंस्था/ ग्वांगजू (दक्षिण कोरिया)
रविवारी येथे झालेल्या पुऊष कंपाऊंड तिरंदाजी सांघिक स्पर्धेत भारताने ऐतिहासिक कामगिरी केली. आठ वर्षांत पहिल्यांदाच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील पदकांच्या मानकऱ्यांमध्ये स्थान मिळवू न शकलेल्या महिला संघाच्या निराशेची भरपाई करताना भारताने सदर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले.
भारताच्या ऋषभ यादवनेही दुहेरी कामगिरी केली. अनुभवी ज्योती सुरेखा वेन्नमसह त्याने मिश्र सांघिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले. तर महिलांच्या आघाडीवर निराशा पाहायला मिळाली. कारण संघ प्री-क्वार्टरफायनलमध्ये पराभूत झाला आणि 2017 पासूनची पदकांची मालिका खंडित झाली. वैयक्तिक पात्रता फेरीत यादवने मिळविलेल्या आठव्या स्थानाच्या पार्श्वभूमीवर दुसरे मानांकन लाभलेल्या यादव, अमन सैनी आणि प्रथमेश फुगे या भारतीय पुऊष त्रिकुटाने पिछाडीवरून लढत देत फ्रान्सला 235-233 असा पराभव पत्करायला लावला. फ्रान्सने निकोलस गिरार्ड, जीन फिलिप बोल्च आणि फ्रँकोइस डुबॉइस यांना मैदानात उतरवले होते, परंतु भारतीय संघाने दबावाखाली उल्लेखनीय संयम दाखवला.
याचे बरेचसे श्रेय 19 व्या क्रमांकावर राहिलेल्या आणि भारताच्या पात्रता फेरीतील सर्वांत खालच्या क्रमांकावरील खेळाडू ठरलेला फुगेला द्यावे लागेल. कारण त्याने वेळीच स्वत:ला सावरले. या 22 वर्षीय खेळाडूने त्यानंतर सलग सहा परिपूर्ण 10 गुण नोंदविले, ज्यामध्ये निर्णायक अंतिम बाणाचा समावेश होता, ज्याने भारताचे ऐतिहासिक सुवर्णपदक निश्चित केले. ‘फक्त फुगेनच नव्हे, तर तिघांनाही धैर्य दाखवले आणि दबावाला बळी न पडता ते एकमेकांना पूरक ठरले’,. असे भारताचे मुख्य कंपाउंड प्रशिक्षक जीवनज्योत सिंग तेजा यांनी.
सुऊवातीला भारत 57-59 ने पिछाडीवर होता, परंतु त्यांनी नंतर सामना 117-117 असा बरोबरीत आणला. तिसऱ्या टप्प्यात दोन्ही संघांनी प्रत्येकी 59 गुण नोंदवत 176-176 अशी बरोबरी निर्माण केली. पण शेवटच्या टप्प्यात फ्रेंच संघ दबावाखाली डगमगला, तर भारत ठाम राहिला. फुगेच्या शेवटच्या बाणाने आणखी एकदा 10 गुण नोंदविण्याबरोबर ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकले.
प्रशिक्षक तेजाने खुलासा केला की, ऑस्ट्रेलियाविऊद्धच्या उपउपांत्यपूर्व फेरीत टर्निंग पॉइंट आला, कारण त्यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. सदर सामन्यात भारत सुरुवातीला पिछाडीवर होता. परंतु शूट-ऑफ जिंकण्यापूर्वी त्याने पुनरागमन केले. पुनरागमनासाठी उत्सुक असलेल्या तेजा यांनी नेमबाजी क्रम बदलला. या बदलानंतर संघाचे पारडे एकदम भारी ठरले. त्यांनी अमेरिका आणि तुर्की या पॉवरहाऊसना गारद करूप्न अंतिम फेरीत प्रवेश केला.









