वृत्तसंस्था / पल्लेकेले (श्रीलंका)
आशिया चषक स्पर्धेत भारताचा सामना आज सोमवारी नेपाळशी सामना होणार असून यावेळी पावसाचा सामनाही करावा लागू नये अशीच इच्छा भारतीय संघ बाळगून असेल. ‘अ गटातून’ पाकिस्तान आधीच 3 गुणांसह ‘सुपर फोर’मध्ये पात्र ठरला असून शनिवारी या कट्टर प्रतिस्पर्ध्याविऊद्धच्या वाहून गेलेल्या सामन्यातून भारताला एक गुण मिळाला आहे. आजही पावसाने ग्रासले, तरी भारत दोन गुणांसह ‘सुपर फोर’मध्ये पोहोचू शकतो, परंतु रोहित शर्मा व त्याच्या नेतृत्वाखालील खेळाडूंना त्याऐवजी विजय मिळवून ‘सुपर फोर’मध्ये प्रवेश करणे अधिक पसंत असेल.

भारताला त्यांच्या पाकिस्तानविऊद्धच्या सामन्यातून काही उत्साहवर्धक संकेत मिळाले आहेत. पाकिस्तानचे वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी व हरिस रौफ यांनी 15 व्या षटकापर्यंत भारताची 4 बाद 66 अशी अवस्था करून टाकली होती. पण आपल्या कारकिर्दीत एकदिवसीय सामन्यात प्रथमच पाचव्या क्रमांकावर खेळलेला ईशान किशन आणि हार्दिक पंड्याने पाचव्या गड्यासाठी 138 धावा जोडल्याने भारताला 266 पर्यंत मजल मारता आली होती.
किशन त्याच्या फलंदाजीमध्ये आवश्यक ते बदल करून पाचव्या क्रमांकाला साजेसा दृष्टिकोन बाळगू शकेल की नाही याबद्दल शंका होती. पण दोन्ही बाबतीत त्याने उत्कृष्ट कामगिरी केली. सलामीला येऊन आक्रमक पद्धतीने खेळणाऱ्या किशनला येथे बचावात्मक बनावे लागले. रौफ, आफ्रिदी आणि नसिम शाह यांनी त्याची परीक्षा पाहिली, परंतु किशनने आपण धीरोदत्तपणे फलंदाजी करू शकतो हे दाखवून दिले. नेपाळकडे पाकिस्तानसारखी गुणवत्ता नाही, परंतु किशनला त्यांच्याविरुद्ध आणखी एक मोठा डाव खेळणे निश्चित आवडेल.
त्याचप्रमाणे किशनला चांगली साथ देताना पंड्याने दाखवलेला संयम आणि किशन बाद झाल्यानंतर बदललेला पवित्रा संघ व्यवस्थापनाला भावलेला असेल. पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांविऊद्ध अपयशी ठरलेले रोहित शर्मा, विराट कोहली, शुभमन गिल आणि श्रेयस अय्यर यांनी लवकरात लवकर ‘वनडे मोड’मध्ये येऊन त्यांना सूर गवसावा अशी इच्छाही संघ व्यवस्थापन बाळगून असेल. रोहित आणि कोहलीला वेस्ट इंडिजविऊद्धच्या एकदिवसीय सामन्यांसाठी विश्रांती देण्यात आली होती, तर श्रेयस दुखापतींतून सावरल्यानंतर पुनरागमन करत आहे. सूर गवसण्याच्या दृष्टीने नेपाळ त्यांच्यासाठी कदाचित योग्य प्रतिस्पर्धी ठरू शकतो.
गोलंदाजांना पाकिस्तानविरुद्ध त्यांचे कौशल्य दाखविण्याची संधी न मिळाल्याने भारतीय संघ व्यवस्थापन काहीसे निराश असू शकते. खास करून जसप्रीत बुमराह 10 षटके गोलंदाजी आणि 50 षटके क्षेत्ररक्षण कसे करतो हे पाहण्याची त्यांना उत्सुकता लागून राहिलेली असेल. त्यामुळे नेपाळविऊद्धच्या त्याच्या कामगिरीवर बारीक लक्ष असेल. स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानकडून 238 धावांनी पराभूत झालेला नेपाळ या लढतीत उत्साह तेवढा दाखवू शकते. लेगस्पिनर संदीप लामिछाने आणि कर्णधार रोहित पौडेल यांच्यावर त्यांची मदार असून ते या सामन्यात काही तरी प्रभाव पाडतील अशी आशा ते बाळगून असतील.
संघ : भारत-रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, संजू सॅमसन (राखीव).
नेपाळ : रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुर्तेल, आसिफ शेख, भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतित जीसी, मौसोम ढकल, संदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.
भारत-नेपाळ सामना रद्द झाल्यास टीम इंडिया सुपर 4 मध्ये
भारत व नेपाळ यांच्यात आज होणाऱ्या सामन्यात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पल्लिकेले येथे दिवसाची सुरुवातच पावसाने होणार आहे. दुपारच्या सत्रात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना तीन वाजता सुरु होणार आहे. दुपारी पावसाने विश्रांती घेतली नाही, तर नाणेफेकीला उशीर होईल. त्याशिवाय, दिवसभर पावसाने खोडा घातल्यास सामना रद्दही होऊ शकतो.
शनिवारी भारत-पाकिस्तान यांच्यातील सामन्याची मजा पावसाने खराब केली. सामना रद्द झाल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण देण्यात आला. यासोबतच आता पाकिस्तान 3 गुणांसह सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरला आहे. तर भारतीय संघाला नेपाळविरुद्ध सामना खेळायचा आहे. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना आज होणार आहे. दरम्यान, हा सामना श्रीलंकेतील पल्लिकेले येथे होणार असून या सामन्यावरही पावसाचे सावट आहे. आशिया कपमध्ये भारतासोबत पाकिस्तान आणि नेपाळ अ गटामध्ये आहेत. तर ब गटात श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान यांचा समावेश आहे. दोन्ही गटातील साखळी सामन्यांनंतर टॉप-2 संघ सुपर-4 फेरीसाठी पात्र ठरतील. भारत आणि नेपाळ यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी 1 गुण मिळेल. अशा प्रकारे भारताचे 2 गुण होतील व संघ सुपर चार मध्ये दाखल होईल. तर नेपाळ 1 गुणासह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर राहील. अर्थात, पाकिस्तानविरुद्ध नेपाळच्या गोलंदाजांनी सुरुवातीला भेदक मारा केला होता. त्यामुळे नेपाळ संघाला हलक्यात घेण्याची चूक टीम इंडिया करणार नाही. यामुळे सामना झाल्यास टीम इंडियाला विजय अनिवार्य असणार आहे.









