आशिया चषक क्रिकेट : खेळाडूंना पडताळून पाहण्याची संधी
वृत्तसंस्था /कोलंबो
अंतिम फेरीत आधीच जागा निश्चित केल्यामुळे आज शुक्रवारी येथे आशिया चषक स्पर्धेच्या सुपर फोर सामन्यात जेव्हा भारताची गांठ आधीच स्पर्धेतून बाद झालेल्या बांगलादेशशी पडेल तेव्हा आपल्या काही खेळाडूंना पडताळून पाहण्याचा मोह त्यांना होऊ शकतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाला आपल्या पहिल्या पसंतीच्या खेळाडूंना जास्तीत जास्त खेळण्याच्या दृष्टीने वेळ द्यायचा की, पुढच्या महिन्यात मायदेशात होणाऱ्या विश्वचषकापूर्वी काही महत्त्वाच्या खेळाडूंना संधी देऊन पाहायची यावर सखोल विचार करावा लागेल. दुपारी 3 वाजता सामन्याला सुरुवात होईल. खेळण्याच्या ताणाच्या व्यवस्थापनाचा प्रश्न हा विशेषत: गोलंदाजांच्या बाबतीत लागू होतो. जसप्रीत बुमराहने आशिया चषक स्पर्धेत आतापर्यंत फक्त 12 षटके टाकली आहेत. त्यापैकी पाच त्याने पाकिस्तानविऊद्ध आणि सात षटके श्रीलंकेविऊद्ध टाकली. तो नेपाळविऊद्ध खेळला नाही. त्यामुळे बुमराहला आणखी एका सामन्यात खेळू द्यायचे की, थेट 17 रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यात परतू द्यायचे यावर त्याच्या पसंतीनुसार निर्णय होऊ शकतो.
दुसरीकडे, मोहम्मद सिराजने या स्पर्धेत 19.2 षटके आणि हार्दिक पंड्याने 18 षटके टाकली आहेत. ही संख्या जास्त नसली, तरी कोलंबोमधील आर्द्रता ऊर्जा कमी करणारी असून त्याचा विचार करून संघ व्यवस्थापन कदाचित त्यापैकी एकाला विश्रांती देऊ शकते. त्यामुळे बांगलादेशविऊद्ध सिराजच्या जागी शमीला स्थान मिळाल्यास मोठे आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. यामुळे 5 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या विश्वचषकाच्या आधी शमीला सामन्यात खेळण्याची संधी मिळेल. हे महत्त्वाचे आहे, कारण शमीचा आता बुमराह, सिराज आणि पंड्या यांच्या मागे ‘बॅकअप सिमर’ म्हणून वापर करण्यात आलेला आहे. परंतु अक्षर पटेलच्या गोलंदाजीचा घसरता आलेख संघ व्यवस्थापन चिंतीत करेल. सदर डावखुरा फिरकीपटू बळी घेऊ शकलेला नाही आणि धावांचा ओघही रोखू शकलेला नाही. अक्षर यावर्षी सात एकदिवसीय सामने खेळलेला आहे आणि फक्त तीन बळी घेण्यात यशस्वी झाला आहे. दुसरीकडे, के. एल. राहुल पूर्ण तंदुऊस्त झाल्याने संघ व्यवस्थापनाला दिलासा मिळाला आहे. त्याने येथे सहजपणे फलंदाजी केली आणि चपळाईने यष्टिरक्षण केलेले आहे. भारताचा प्रमुख यष्टिरक्षक-मधल्या फळीतील फलंदाज ही भूमिका त्याला संघ व्यवस्थापनाने दिलेली असून त्याबद्दल श्रीलंकेविऊद्धच्या सामन्यानंतर राहुलने विस्तृतपणे सांगितले होते. त्यामुळे बांगलादेशविऊद्धही त्याला खेळविले जाऊ शकते.
परंतु श्रेयस अय्यरच्या तंदुऊस्तीकडे लक्ष दिले जाईल. कारण त्याला पाठीच्या दुखण्यामुळे पाकिस्तान आणि श्रीलंकेविऊद्धचे सुपर फोर स्तरावरील सामने गमवावे लागलेले आहेत. तथापि, श्रेयसने गुऊवारी कोणत्याही अस्वस्थतेशिवाय फलंदाजी आणि गोलंदाजीचा सराव केलेला आहे. पण त्याला तंदुऊस्त होण्यासाठी अतिरिक्त वेळ द्यायचा असेल, तर संघ व्यवस्थापन इशान किशन आणि सूर्यकुमार यादव यांचा विचार करू शकते. एकदिवसीय सामन्यांमध्ये किशनने आतापर्यंत प्रभावशाली कामगिरी केली आहे, तर सूर्यकुमारची कामगिरी फारच निराशाजनक राहिलेली आहे. असे असूनही सूर्यकुमारकडे एकदिवसीय सामन्यांतील एक महत्त्वाचा खेळाडू म्हणून पाहिले जाते आणि ‘थिंक टँक’ त्याला आणखी एक संधी देऊ शकते. बांगलादेशचा विचार केला, तर या सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज मुशफिकुर रहीम खेळणार नाही. श्रीलंकेविऊद्धच्या सुपर फोर सामन्यानंतर रहीम मायदेशी परतललेला असून त्याच्या अनुपस्थितीत लिटन दास यष्टिरक्षण करेल, अशी अपेक्षा आहे. तथापि, त्यांचा कर्णधार शकिब अल हसन आपल्या कुटुंबासोबत काही वेळ घालवण्यासाठी मायदेशी परतल्यानंतर संघात पुन्हा सामील झाला आहे.
संघ
भारत: रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, के. एल. राहुल, शुभमन गिल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, इशान किशन, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा.
बांगलादेश : शकिब अल हसन (कर्णधार), अनामूल हक बिजॉय, नजमूल हुसेन शांतो, तौहीद ह्रदोय, अफिफ हुसैन ध्रुबो, मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, हसन महमूद, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, नसुम अहमद, शाक मेहेदी हसन, नईम शेख, शमिम हुसेन, तनजिद हसन तमिम, तनझिम हसन साकिब.
सामन्याची वेळ : दुपारी 3 वा.









