वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
दक्षिण कोरियातील जिन्जू येथे 3 ते 13 मे दरम्यान होणाऱ्या आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय वेटलिफ्टिंग संघाचे नेतृत्व मीराबाई चानूकडे सोपवण्यात आले आहे. तब्बल एक वर्षानंतर मीराबाई चानूचे आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पुनरागमन होत आहे. 2020 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत मीराबाईने पदक मिळवले होते.
2024 साली पॅरीस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी दक्षिण कोरियातील ही आगामी आशियाई वेटलिफ्टिंग स्पर्धा भारतीय वेटलिफ्टर्ससाठी दुसरी पात्रतेची स्पर्धा आहे. पॅरीस ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र फेरीची प्रक्रिया 28 एप्रिल 2024 रोजी समाप्त होणार आहे. मीराबाई चानूने 2022 साली कोलंबियात झालेल्या विश्व वेटलिफ्टिंग स्पर्धेत दुसरे स्थान मिळवले होते. दक्षिण कोरियातील या स्पर्धेत मीराबाई चानू 49 किलो वजनगटाचे प्रतिनिधीत्व करणार आहे. मीराबाईने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्ण तसेच विश्व वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत त्याचप्रमाणे ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदके मिळवली आहेत. 2020 च्या आशियाई चॅम्पियनशिप स्पर्धेत तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले होते.
भारतीय वेटलिफ्टिंग संघ : मीराबाई चानू, बिंदिया राणी देवी, पुरुष : शुभम तोडकर, जेरेमी लालरिनुंगा, अचिंता शेवुली, नारायण अजित.









