आफ्रिकन महासंघाला जी-20 चे सदस्यत्व
जी 20 संघटनेत आफ्रिकन महासंघाला सामील करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला एकमताने स्वीकारण्यात आल्याने भारत ग्लोबल साउथचा नेता म्हणून उदयास येणार आहे. साउथ ग्लोबलचा प्रमुख समूह आफ्रिकन महासंघ जगाच्या आघाडीच्या अर्थव्यवस्थांचे व्यासपीठ जी-20 मध्ये सामील झाला आहे. यामुळे भारताचा जागतिक स्तरावरील वाढता प्रभाव दिसून येतो.
सकारात्मक परिणाम दिसणार
भारताच्या या कूटनीतिक प्रयत्नाने देशाच्या प्रतिमेला नवी उंची मिळणार आहे. तसेच आफ्रिकन देशांमध्ये भारताला वाढीव भागीदारी प्राप्त करणार आहे. चीनने 10 वर्षांमध्ये व्यापाराप्रकरणी आफ्रिकन देशांमध्ये स्वत:चा जम बसविला आहे. चीन तेथील गुंतवणूक वाढवत आहे. चीनचा तेथील वाढता प्रभाव पाहता भारताने आफ्रिकन महासंघाला जी-20 च्या व्यासपीठावर स्थान मिळवून देत जोरदार पाऊल उचलले आहे. यामुळे आफ्रिकन देशांमधील भारताचा प्रभाव निश्चितपणे वाढणार आहे.
80 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व
आफ्रिकन महासंघाला सदस्यत्व भारतासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विकसनशील आणि विकसित देश म्हणजेच ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साउथ देशांमध्ये मोठी आर्थिक दरी आहे. परंतु आफ्रिकन महासंघाला जी-20 मध्ये आणले गेल्यावर ही दरी काही प्रमाणात दूर होणार आहे. एकीकडे कालौघात संयुक्त राष्ट्रसंघ अनेक मुद्द्यांवर निष्प्रभावी ठरला आहे, अशा स्थितीत आगामी काळात जी-20 महत्त्वाची भूमिका बजावणारी संघटना ठरणार आहे. आफ्रिकन महासंघाच्या समावेशामुळे जी-20 80 टक्के लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणार आहे. आतापर्यंत जी-20 मध्ये ग्लोबल नॉर्थचेच म्हणणे ऐकले जात राहिले आहे. परंतु आफ्रिकन महासंघाला सदस्यत्व मिळाल्याने ग्लोबल साउथचे प्रतिनिधित्व वाढेल. यामुळे ग्लोबल साउथच्या समस्यांवर उपाय याच व्यासपीठावर शोधण्याचा प्रयत्न होईल. चीनच्या विकासाने जागतिक स्थिती बदलली आहे. एकीकडे चीनचा गट आहे, तर दुसरीकडे जी-7 गट आहे. अशा स्थितीत तिसऱ्या गटाचे नेतृत्व भारत करू पाहतोय.









