वर्ष 2022 मधील आकडेवारीचा समावेश : यादीत बेंगळुरू आघाडीवर
नवी दिल्ली
मागील काही वर्षांच्या प्रवासामध्ये डिजिटल व्यवहारांच्या संदर्भात भारताने झपाट्याने प्रगती केली असल्याचे चित्र आहे. या सकारात्मक कामगिरीच्या जोरावर भारताने डिजिटल पेमेंट्समध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. भारताने वर्षभरात युपीआय आणि कार्ड्समध्ये विक्रमी वाढ नोंदवली आहे. यामध्ये सर्वाधिक डिजिटल पेमेंट करणाऱ्या देशातील सर्व शहरांच्या यादीत बेंगळुरू आघाडीवर राहिले आहे.
सिलिकॉन व्हॅली म्हणून ओळखले जाणारे बेंगळुरू हे देशातील डिजिटल व्यवहारांच्या बाबतीत भारतीय शहरांच्या यादीत अव्वल स्थानावर आहे. फ्रान्सच्या पेमेंट अॅण्ड ट्रान्झॅक्शनल सर्व्हिसेस कंपनीने आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे.
द हिंदूने वर्ल्डलाइनच्या अहवालाचा दाखला देत प्रकाशित केले आहे की 2022 मध्ये बेंगळुरूमध्ये 6,500 कोटी रुपयांचे 29 कोटी डिजिटल व्यवहार झाले आहेत. या यादीत दिल्ली दुसऱ्या स्थानावर आहे. दिल्लीकरांनी 5000 कोटी रुपयांचे 1.96 कोटी डिजिटल व्यवहार केले, त्यानंतर मुंबईत 4950 कोटी रुपयांचे 1.87 कोटी व्यवहार झाले.
अहवालानुसार, चौथ्या क्रमांकावर 3,280 कोटी रुपयांच्या 1.5 कोटी डिजिटल व्यवहारांसह पुणे आणि 3,550 कोटी रुपयांच्या 1.43 कोटी व्यवहारांसह चेन्नई आहे. ‘इंडिया डिजिटल पेमेंट्स अॅन्युअल रिपोर्ट’ शीर्षकाच्या अहवालात, युपीआय, डेबिट आणि क्रेडिट कार्ड्स, प्रीपेड पेमेंट इन्स्ट्रुमेंट्स, मोबाइल आणि प्रीपेड कार्ड यांसारख्या पेमेंट पद्धतींनी 149.5 ट्रिलियन रुपयांचे 87.92 अब्ज व्यवहार करण्यात आल्याची नेंद केली आहे.
अव्वल कामगिरीत खालील राज्ये
देशातील टॉप 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी 2022 मध्ये फिजिकल टच पॉइंट्सच्या बाबतीत सर्वाधिक पैसे दिले. त्यात केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, दिल्ली, तेलंगणा, गुजरात, पश्चिम बंगाल आणि पंजाब आहेत. बंगळुरू, नवी दिल्ली, मुंबई, पुणे, चेन्नई, हैदराबाद, एर्नाकुलम, तिरुअनंतपुरम, त्रिशूर आणि कोईम्बतूर या शहरांचा समावेश राहिला आहे.









