वृत्तसंस्था / बायेल (स्वीस)
2025 च्या टेनिस हंगामातील डेव्हिस चषक विश्व गट-1 मधील लढतीत भारताच्या दक्षिणेश्वर सुरेश आणि सुमीत नागल यांनी आपले एकेरीचे सामने जिंकून यजमान स्वीसवर 2-0 अशी भक्कम आघाडी घेतली आहे.
या लढतीतील एकेरीच्या सामन्यात भारताच्या सुमीत नागलने स्वीसच्या मार्क अॅंड्रे हुस्टेरचा 6-3, 7-6 (7-4) अशा सरळ सेट्मध्ये पराभव केला. सुमीतच्या विजयामुळे भारताने यजमान स्वीसवर 2-0 अशी बढत मिळविली आहे. तत्पूर्वी दक्षिणेश्वर सुरेशने पहिल्या एकेरी सामन्यात स्वीसच्या किमचा सरळ सेट्समध्ये पराभव करत भारताला आघाडी मिळवून दिली.
यजमान स्वीस आणि भारत यांच्यात ही लढत खेळविली जात आहे. पुरूष एकेरीच्या पहिल्याच सामन्यात दक्षिणेश्वरने जेरोमिक किमचा 7-6 (7-4), 6-3 असा पराभव केला. या विजयामुळे भारताने स्वीसवर 1-0 अशी आघाडी मिळविली आहे. या स्पर्धेसाठी भारतीय डेव्हिस संघाचे नेतृत्व रोहीत राजपाल करत आहे. या स्पर्धेत आता पुरूष दुहेरीत एन. श्रीराम बालाजी आणि ऋत्विक बोलीपल्ली यांची लढत स्वीसच्या जेकुब पॉल आणि डॉमिनिक स्ट्रीकेर बरोबर होणार आहे. या दुहेरीच्या सामन्यानंतर उभय संघात परतीचे दोन एकेरी सामने खेळविले जातील.
डेव्हिस चषक स्पर्धेच्या इतिहासामध्ये भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी थोडीफार समाधानकारक असली तरी आशिया खंडातील उझ्बेकीस्तान आणि कझाकस्तान या संघांना भारतीय संघ पराभूत करु शकतो. पण 1993 साली कॅनेस येथे झालेल्या डेव्हिस चषक लढतीत भारतीय संघाने बलाढ्या फ्रान्सच्या 3-2 असा पराभव उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत केला होता.









